Wednesday, 13 April 2016

क्षण एक पुरे स्वत्वाचा ..........



        
    त्तर ध्रुवावरचे अस्वल हिमवर्षावाच्या काळात सहा महीने प्रगाढ निद्रेत असते. या थंडीच्या काळात त्याला खाण्यासाठी पुरेसे आणि योग्य असे अन्न उपलब्ध होत नाही आणि तो मोसम सरला की दीर्घ निद्रेतून जागे झाल्यावर ते ताजेतवाने होऊन कामाला लागते. सहा महीने मस्त तुडुंब खाते. जीवनाच्या युद्धनौकेवर स्वार होऊन नव्याने आयुष्याला सुरुवात करते. तो जणू त्याचा पुनर्जन्मच असतो. त्याच्या निद्रेच्या काळाला हायबरनेशन काळ म्हणतात. एखाद्या लेखकाचा सुद्धा असा मोठा काळ चिंतन, मनन, लेखनात जातो आणि एक अत्युत्तम कलाकृती घेऊन तो नव्या दमाने वाचकांसमोर येतो, तो हायबरनेशनच्या काळातून बाहेर येऊन ताजा तवाना होतो. तसाच  आपला जागृतीचा काळ असतो आत्मभानाचा.
     बोरिवलीला, सेंट फ्रान्सिस मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये, एमबीए च्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, माझी एक विद्यार्थिनी होती. खूप हुशार आणि चुणचुणीत. पण तिच्या उंचीने तिचा घात केला होता. शाळकरी वयापासून तिचे मित्र आणि मैत्रिणी तिला उंचीवरून खिजवत होते. त्याचा तिच्या मनावर खूपच परिणाम झाला होता. खरतर तिच्यात उणीव होती ती फक्त उंचीची. धारदार आणि तल्लख असलेली बुद्धी निव्वळ शारीरिक ऊंची कमी म्हणून मनावर आघात करत होती. कुठेतरी काहीतरी चुकत होत. त्यामुळे तिचा आत्मविश्वास लयाला गेला होता. तिच्यातले आत्मभान उंचीच्या न्युनगंडाने खच्ची केले होते. माझ्यात आणि तिच्यात झालेल्या संवादावरून तिच्या खचलेल्या आत्मविश्वासाचे कारण कळले. आणि तिला मी फक्त तिच्यातील प्लस पॉईंट्सची जाणीव करून दिली, तिच्याच तोंडून! काही वर्षानंतर मी तिला पाहिले एका सभेत बोलताना, खूप आत्मविश्वासाने ती बोलत होती. यशाची अनेक  शिखरे पादाक्रांत केल्याचा सार्थ अभिमान तिच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता. चेहर्‍यावर आत्मविश्वासाचे तेज लखलखत होते. चेहर्‍यावरची आपण कुठेतरी कमी असल्याची भावना नावालाही उरली नव्हती. संवादाच्या एका ठिणगीने आणि आठवडाभराच्या हायबरनेशन काळाने तिच्यातले आत्मभान जागृत केले होते.  
     उन्हाळ्याच्या सुरूवातीला सुरू होणार्‍या जाहिराती पहा. पाण्यातून बाहेर पडल्यावर चेहर्‍यावर येणार्‍या तरो  ताजगीची कल्पना तुम्हाला येईल. पाण्याने निथळणारा चेहरा म्हणजे आत्मभान. एक क्षण, केसांवरचे आणि चेहर्‍यावरचे पाण्याचे लोट झटकून, शरीर आणि मन पुरेपूर प्राणवायूला आसुसलेले असताना, मोकळ्या हवेचा दीर्घ श्वास घेणे म्हणजे आत्मविश्वास आपल्या आतमधे भरून घेण. शरीरावर कुठेही उदासीचे घर्म बिन्दु न ठेवता स्वच्छ पाण्याने शूचिर्भूत झालेल शरीर म्हणजे आत्मभानाचे महाद्वार.   
     लिंबू कापले, किंवा संत्रे , मोसंबी सोलल्यावर जो स्वाद येतो, किंवा पुदिन्याची पाने खुडल्यावर जो आसमंत भरून व्यापणारा गंध ज्याला इंग्रजीत फ्रॅग्रन्स म्हटले की चपखल वर्णन वाटावे असा, त्या गंधामधे दडलेला ताजेपणा सांगता येतो का? तसाच आपल्यात दडलेला हा आत्मभानाचा धुंद गंध. अस्तित्वाची जाणीव देणारा, पण कुठेही दृश्य स्वरुपात न दिसणारा. त्याचा दरवळ आपल्याला स्वत:ला उत्तेजित तर करतोच, पण दुसर्‍यानाही ताजेतवाने करतो. मनातल्या कुपीमध्ये लपलेले हे आत्मभानाचे अत्तर दरवळते केव्हा तर जेव्हा तुम्ही मनाची कुपी उघडाल तेव्हाच !
      वयाच्या, परिस्थितीच्या कुठल्या टप्प्यावर हे आत्मभान येईल याचा अंदाज कुणालाच नसतो. I am what I am हे ठासून सांगायला मी कुणीतरी आहे ही जाणीव महत्वाची असते. कधी परिस्थिति सांगते, कधी समाजातून तुमच्या गुणांचे कौतुक होते, तर कधी पाण्यात चोरून पाहताना आपण बदकाचे कुरूप पिल्लू नसून एक राजहंस आहे हे आपल्याच लक्षात येते. महत्वाचा असतो तो आत्मभानाचा क्षण. बाह्य परिस्थितीचा आणि अंतर्गत द्वंद्वाचा आपल्यावर परिणाम होऊ न देता अविचल राहते ते आत्मभान. लोकांनी केलेल्या तुमच्या खोट्या कौतुकपासून ते तुमच्या अंगच्या चांगल्या गुणांनाही दोषरूपात पाहणार्‍या तुमच्या हितशत्रूंच्या कारवायांना बळी न पडणे आपल्या हातात असते.
    चित्रपती व्ही. शांताराम यांचा दो आंखे बारह हाथ हा सिनेमा आठवतो? जगाने अव्हेरलेले खूनी, गुन्हेगार. स्वत;च्याच विश्वात, निराशेच्या गर्तेत जगत असतात. त्यांच्या स्वत:च्याच नजरेत आपण एक हीन व्यक्ति अशी इमेज असते. जगण्याचा मक्सद नसताना एक जेलर त्यांच्या मनामधे इवलीशी सद्भावनेची आणि माणुसकीची ज्योत पेटवतो. जगण्याला आत्मबळ देतो. गुन्हेगार म्हणून जगत असताना आपणही माणूस आहोत हे जगण्याचे आत्मभान देतो. ही प्रत्यक्ष घडलेली, वास्तवातली गोष्ट औंधजवळ स्वतंत्रपूर नामक गावात घडलेली. त्यांनी कैद्यांच्या माणुसकीसाठी केलेला तो एक अभिनव प्रयोग होता. त्यावर गदिमानी या सिनेमासाठी कथा लिहिली. समाजातील जवळजवळ वाळीत टाकलेला घटक कैदी. त्यांना असेच आत्मभान देण्याचे काम किरण बेदी यांनीही केले आहे. तुम्हा आम्हा सर्वांना या स्वत्वाच्या जाणिवेसाठी आवश्यक असतो तो हाच आत्मभानाचा एक क्षण!!
               --------------------------------सविता नाबर 
published in Maharashtra Times Kop ed. on 17th Feb 2016


No comments:

Post a Comment