Wednesday, 13 April 2016

या ताणाचं काय करायचं ?

   

    हातात एक रबर बॅंड घ्या. एका बॉक्सला तो बसतोय का पहा. मग आणखी थोडा मोठा बॉक्स घ्या. त्याला बसतोय का पहा. एका ठराविक आकारापेक्षा जास्त मोठ्या बॉक्सला तो रबर बॅंड बसत नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तरीही कधी कधी आपण आणखीन ताणतो आणि बॉक्सवर बसवायचा प्रयत्न करतो. तटकन तो तुटतो. वाजवीपेक्षा जास्त ताण झाला की तुटणारच. निर्जीव रबर जिथे ताण सहन करू शकत नाही तिथे शरीर आणि मन ही संवेदनशील आयुध ताण कशी सहन करणार? फक्त ते कुठवर ताणायचे हे आपल्याला कळले पाहिजे. खरेतर कुठलीच गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताणायची नसते. पण आपण सगळ्याच गोष्टींचा अंत पहात असतो.
    ताण तणावाचे व्यक्तिनुरूप, परिस्थितिनुरूप अनंत प्रकार आहेत. प्राप्त परिस्थितीत योग्य तो निर्णय घेणे आणि ताण हलका करणे हे त्या व्यक्तीलाच साधत असते. पण प्रामुख्याने दोन भाग पडणार्‍या तणावाला सगळ्यानाच सामोरे जावे लागते. शारीरिक आणि मानसिक. दोन्ही एकमेकांवर इतके अवलंबून असतात की, जेव्हा शारीरिक ताण आलेला असतो, आपण दमतो तेव्हा मन काही नवीन गोष्टी करायच्या मूडमध्ये नसते. आणि जेव्हा मनाला मरगळ येते तेव्हा शरीर काही करायच्या तयारीत नसते. म्हणून दोन्हीलाही जपणे तितकेच महत्वाचे.
     विद्यार्थी दशेत अभ्यासाचा ताण, तारुण्यात नोकरी, व्यवसायाचा ताण, कधी लोक काय म्हणतील याचा ताण. ज्या गोष्टीचे टेन्शन येणार असते ती टाळण्याकडे कल दिसून येतो. मग आणखीनच अवघड होत जाते. त्यापेक्षा पहिल्या झटक्यालाच ताण येणारी गोष्ट करून टाकली की मन हलके होऊन जाते. हो. टांगती तलवार कशाला ठेवायची? विद्यार्थी असताना रोज नियमित वेळ अभ्यास केला की परीक्षेचे टेन्शन कशाला येणार? मग परीक्षेत आठवेल की नाही याची चिंता करायची नाही. ते काम आपल्या तल्लख मेंदूवर सोडून द्यायचे. अभ्यासाची नोंद तिथे झालेली असते. मेंदू अगदी व्यवस्थित काम करतो. अगदी संगणकापेक्षाही चांगले. ते कधी आणि कसे आठवेल याची तुमच्या मनाला सुतराम कल्पना नसते.  
      आपण एखादी वस्तु शोधत असतो. ती कितीही शोधली तरी सापडत नाही. नेहमीच्या ठिकाणी पाहिली, सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी पाहिली तरी सापडत नाही. झालं, मनावर लगेच ताण येतो. इतकी महत्वाची वस्तु, अशी कशी सापडत नाही? कुठे ठेवलीय काही केल्या आठवत नाही. अशावेळी शांतपणे तो विषय सोडून आपल्या कामाला लागले की काही वेळाने आपोआप ती सापडते. जेवढे एखाद्या गोष्टीच्या मागे टेन्शन घेऊन लागाल तेवढी ती दुर्लभ होत जाते. सहज जाता जाता केली तर पटकन होऊन जाते.  
      बारा चौदा तास काम केल्यानंतर शरीराला थकवा आलेला असतो. मनालाही मरगळ आलेली असते. थोड्याशा ब्रेकने ही मरगळ झटकली जाते. कामाच्या सातत्यात मध्ये मध्ये थोडीशी विश्रांति हवीच. तरच पुढचे काम अधिक जोमाने होऊ शकते. मन पुन्हा ताजे तवाने होते आणि काम हे काम न रहाता ती आवड बनून जाते. केव्हा एकदा अभ्यास उरकून टाकतो असे मनात आले की ती एक उरकण्याची क्रिया होते. त्यात आनंद रहात नाही. आणि उरकणे ताणले जाते, किती ते आपल्याला कधी कधी समजतच नाही. कुठलेच काम मनाविरुद्ध केले की ते चांगले होत नाही. 
         एकदा दोन बुद्ध भिक्षू नदीच्या काठावरून चाललेले असतात. त्यांना एक तरुणी भेटते. त्या दोघांना आणि तिलाही नदी ओलांडून जायचे असते. एक भिक्षू तिला खांद्यावर घेतो. तिघेही नदी ओलांडून पलीकडे येतात. तरुणी आभार मानून निघून जाते. भिक्षू बराच वेळ चालत आपल्या मुक्कामाला पोचता पोचताच ज्याने खांद्यावर तरुणीला घेतलेले असते त्याला दूसरा विचारतो, तू तिला काठावर कसे काय आणलेस? तुझ्या मनाला खूप अपराधी वाटत असेल. तो चमकून विचारणार्‍याकडे पाहतो आणि हसून म्हणतो, मी तिला खांद्यावरून केव्हाच उतरवले. मी विसरलो देखील. पण तू मात्र तिचे ओझे अजूनही तुझ्या खांद्यावरून घेऊन जात आहेस.
        आपल्या मनावरच्या ताण तणावाच असच आहे. आपण नको ते ओझे विनाकारण मनावर बाळगत असतो. यासाठीच मनाशी संवाद साधण्याची गरज असते. शांतपणे मनाशी बोललात तर कसलाच ताण रहात नाही. लहानपणी चतुर बिरबलाची वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट आठवा. भाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली. उत्तर एकच. न फिरवल्यामुळे. एकाच जागी सतत राहिल्याने बाकीच्या भागाला आच लागत नाही. तणाव मनाला स्थितीशील करतो. स्थितीशीलता अशीच शरीराबरोबर मनालाही जडत्व आणते. आणि सर्जनशीलता लोप पावते.   कवि केशवसुतानी म्हटल्याप्रमाणे, प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेदा !!” 
          ..............................सविता नाबर 
   published in Maharashtra times, Kop ed. on 10th Feb 2016

No comments:

Post a Comment