एक
छोटीशी क्लिप बघितली. एक झोपडपट्टीतला चारपाच वर्षांचा मुलगा रस्त्यावर गाडीच्या
शेजारी उभा आहे. काचेवर टकटक केल्यावर गाडीतला माणूस त्याला खेळतली एक टेबल
टेनिसची रॅकेट आणि बॉल देतो. गाडी निघून जाते. तो मुलगा दिलेले खेळणे पायात टाकतो.
चालत चालत एका हॉटेलच्या बाहेर उभा राहतो. काचेतून पलीकडे पाहतो. एक उमदा तरुण
खाण्याची ऑर्डर देत असतो. त्याची नजर या मुलाकडे जाते. तो तरुण बाहेर पडतो. त्या
छोट्या मुलाला आत आणतो. खुर्चीवर बसवून आपले खाणे त्याला खायला घालतो. या
प्रसंगाने माणुसकी दिसते आणि मनाची शांती
वाढते. चोवीस तासांच्या कामाच्या धाबडग्यात आयुष्यात असा एखादा समाधानाचा क्षणही
मनाला मोठा विरंगुळा देऊन जातो.
सतत परिश्रम करून दमणारे शरीर आणि
मन यांच्यासाठी विश्रांतीचीही तेवढीच आवश्यकता आहे. या विश्रांतीमुळे किंवा
करमणुकीमुळे मनावरचा ताण हलका होतो. योगसाधनेत आरोग्याचे आहार, विहार, आचार, विचार हे चार
महत्वाचे स्तंभ सांगितले आहेत. यापैकी विहार म्हणजे विश्रांति, करमणूक. याला कामाइतकेच किंवा थोडेसे जास्तच महत्व आहे. त्यामुळेच माणूस
ताजा तवाना होतो. कामावर एकाग्रता वाढते.
एकदा
भगवान बुद्ध आपल्या शिष्यांबरोबर जात असता त्यांना तहान लागली. जवळच्या तळ्यातून शिष्य पाणी आणायला गेला. पण त्या
तलावात एक बैलगाडी शिरली आणि पाणी गढूळ झाले. चिखलमय झालेले पाणी कसे द्यायचे या
विचाराने तो गुरुकडे आला. पुन्हा थोड्या वेळाने बुद्धानी त्याला जायला सांगितले.
आता पाणी स्वच्छ, नितळ झाले होते. ते हलकेच त्याने
भांड्यात भरले. आणि गुरूंना प्यायला दिले. बुद्धानी एकवार पाण्याकडे पाहिले आणि
शिष्यांना ते म्हणाले, “आपले मन या पाण्यासारखेच आहे.
मनातल्या विचारांचा गोंधळ जेव्हा खाली बसेल तेव्हाच आपले विचार आपल्याला कळतात.” कामाच्या
सातत्याने आपले विचार असेच गढूळ होऊन जातात. त्यासाठी काही अवधि आपल्या मनाला शांत
होण्यासाठी दिला पाहिजे. यासाठी विश्रांति, आत्मसंवादाची गरज
आहे.
विनोद, क्रीडा, संगीत या सर्वातून मिळणार्या निखळ आनंदाबरोबरच जर
एखादा छंद जोपासला तर त्यातूनही अगणित
आनंद मिळू शकतो. काही वस्तु जमवण्याचा,
नवीन शिकण्याचा, भटकण्याचा, पाक क्रियेचा, बागकाम,
पक्षी निरिक्षण असे अनेक छंद विकसित करता येतात. स्वान्त सुखाय आनंद मिळतो. या
छंदातून मिळणारा आनंद, शांती आपल्याला मन:पूत समाधान देऊन जाते. त्यामधून
आपल्याला खूप ऊर्जा मिळत असते.
विद्यार्थी दशेत अभ्यास करताना एकदम
परीक्षेच्या वेळी रात्रंदिवस जागून करण्यापेक्षा रोजच्या रोज जर केला तर परीक्षेच्या
वेळी मनावर ताण येत नाही. आधीपासून अभ्यास केल्यामुळे ज्या शंका कुशंका असतात त्या
वेळच्या वेळी शिक्षकाना विचारता येतात. आधीपासून वाचन केल्यामुळे डोक्यात अभ्यास
पक्का रहातो. तेच जर परीक्षेच्यावेळी अभ्यास करायचा तर इतक्या थोडक्या वेळात
पुर्णपणे कव्हर होत नाही. मग हे वाचू का ते वाचू असा संभ्रम निर्माण होतो. परीक्षेच्यावेळी
मन एकदम कोरी पाटी होऊन जाते.
जर
तुम्ही ठरवले दोन्ही वेळचे जेवण एकदमच जेवायचे तर पचेल का? ते त्या त्या वेळीच केले पाहिजे. एकाचवेळी दोन तीन दिवसाची झोप घेतली तरी
चालेल काय? रोज रात्री ठराविक तास झोप घ्यायला पाहिजेच. तसेच
दर काही तासांनी विश्रांति ही घेतलीच पाहिजे. सतत काम आणि काम करत राहिलात तर अंग
आणि मन आंबुन जाईल. मनाला विरंगुळा पाहिजेच. नाहीतर काम एकसूरी झाल्याने त्यातला
रस कमी होइल. पुन्हा काम करण्यास मन कंटाळून जाईल. कार्यक्षमता आपोआपच कमी होईल.
यासाठी दैनंदिन कामाला महत्व आहेच. त्या दरम्यान विहाराला,
विश्रांतीला महत्व आहे.
अनेक
लोकांना चरितार्थासाठी एकाच प्रकारचे काम करावे लागते. तेच तेच काम करून कंटाळा
येत असतो. म्हणून कामातही नावीन्य हवे असते. एकाच प्रकारच्या कामात नावीन्य काय
असणार म्हणून त्याला काही छंद, विरंगुळा पाहिजे असतो. जर
आवडीचे काम आणि व्यवसाय हे एकच असेल तर सोन्याहून पिवळे. एक विरंगुळा म्हणून, मित्र मैत्रीण यांच्याशी गप्पा मारणे, वाहते खळाळते
पाणी पहात रहाणे, लहान मुलाबरोबर खेळणे, संगीत ऐकणे, लेखन करणे हे चांगले मार्ग आहेत.
यामुळे मनावर असलेले ताणाचे सावट जाऊन मन अगदी ताजेतवाने व्हायला मदत होते.
आठवड्यात एक रविवार का
असतो? सहा दिवस एकाग्रतेने पूर्ण काम केल्यानंतर एक दिवस विश्रांतीचा. पाश्चात्य देशात पाच दिवसांचा आठवडा असतो. ते पाच दिवस अंग झटकून मेहनत
करतात. आणि दोन दिवस विश्रांतीचे असतात.
यासाठी आवश्यक असते कार्यरत रहाणे. आणि वेळेवर विश्रांति घेणे. शवासनाने शरीराला
आणि मनाला दोन्हीला विश्रांति मिळते. कामातला बदल हासुद्धा विरंगुळा ठरतो.
विश्रांतीसाठी हवा असतो एक छोटासा break.
-------------------------------------सविता नाबर
published in Maharashtra Times kop ed. on 2nd march 2016
No comments:
Post a Comment