Saturday, 9 April 2016

तोल सांभाळताना

 

  हान मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला लागते तेव्हा त्यांची गोड गुलाबी गुबगुबीत पावले जमिनीवर ठरतच नाहीत. जमिनीच्या धुळीचा किंचितसा स्पर्शही न झालेले पाऊल, त्याचे तळवे जमिनीवर टेकण्याइतके सपाटही नसतात. एक पाऊल टेकले न टेकले तोवर पुढचे पाऊल पडलेले असते. त्यांचे चालणे नसतेच मुळी. ते असते दुडुदुडू धावणे. चालताना ब्रेक तर लागतच नाही. मग धप्पा. कुणीतरी उचलून घेते. पण तरीही खाली उतरुन पुन्हा धावण्यासाठी धडपड चाललेली असते. हे असं का असतं? त्या बाळाला पाय फुटलेले असतात. त्याला चालण्यातली गंमत कळलेली असते. मग किती चालू आणि कुठे जाऊ असं त्याला होऊन जातं. हेच असते आपल्या पायावर उभे राहण्यातले सुख. पडल्यानंतरच सावरून घेणं थोडा वेळ असतं, पण चालणे मात्र असच मजा देत असत.
    वयाच्या साधारण तिसर्‍या वर्षी येते तिचाकी सायकल. मग तर वेगवेगळ्या काल्पनिक गावांना भेटी देण होत. आभाळ कवेत घेण्याइतके मुलाचे विश्व त्याच्या दृष्टीने अफाट मोठे होऊन जाते. सायकल कुठेतरी अडते. सोडवायला कुणी वडीलधारे असतेच. पुन्हा स्वारी दुसर्‍या गावाला जायला तयार. दुचाकी सायकलची तर मजा काही औरच. हल्ली स्टँड असलेल्या सायकली असतात. पण आम्ही शिकलो ते जेंट्स सायकलवर आत पाय टाकून. जेमतेम वीस फुटाचे अंतर. सायकल शिकून झाल्यावर खरी परीक्षा असते ती रस्त्यावर चालवायची. मागे कुणी धरलेले आहे. आपण पडणार नाही हा विश्वास असतानाच, मागचा आधार केव्हातरी सुटतो. आपला तोल आपणच सांभाळला, तो क्षण आनंद देऊन जातो, जग जिंकल्याचा!! कॉलेजात बाईकवरुन जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले की खरोखरीचे पंख लाभल्याचा साक्षात्कार होतो. कानात वारे भरलेल्या वासरासारखे हुंदडताना आपला तोल सांभाळता सांभाळता आजूबाजूच्या जगाचेही भान ठेवायला लागते. आत्मविश्वास दुणावतो. कधी तरी क्षणभरची बेपवाई नडते आणि समोरच्या बाइकबरोबर गळामिठी होते. तेव्हा सावरायला येतात काही हात. तोही असतो दिलासा. पण काही वेळाचा.  
       कधी कधी बोलाफुलाला गाठ पडते. तसा माझ्या मनात हा विचार यायला आणि समोर घडलेही अगदी तसेच. सध्या परीक्षा चालू असण्याचा, संपण्याचा हंगाम आहे. काहींच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. सकाळच्या आल्हादक वातावरणात आपल्या सवंगड्यांबरोबर, मनमोकळी सफर करायला बच्चे कंपनी सायकलिंग करायला आली. थोड्याशा खडकाळ रस्त्यावर एका मुलीची सायकल तिच्यासकट जमिनीवर झोपली. मी तिला उठवले. सायकल उभी केली. पाण्याची बाटली तिने पुन्हा होती तशी सायकलला अडकवली. कोपरा ढोपराची धूळ झटकून ती निघाली.  
      प्रवास सायकलवरचा असो, चालण्याचा असो, बाईकचा असो, कारचा असो, करायचा असतो स्वत:लाच. वाटेत येणार्‍या अडचणीत कुणीतरी साथ देते, मार्ग दाखवते, तेही थोडक्या काळापुरतेच. पुन्हा उठून मार्गाक्रमण आपल्यालाच करायचे असते. सगळ्या अर्जुनाना श्रीकृष्णासारखा सारथी मिळेलच असे नाही. स्वत;चा मार्ग स्वत;च शोधावा लागतो. एकलव्याची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याने प्रत्यक्ष गुरुकडून ज्ञान न घेताही तो धनुर्विद्येत पारंगत झाला. तो स्वत:च्या जोरावरच. शिवाजी महाराजाना राजनीति कुणी शिकवली? त्यांनी स्वत:च परिस्थितीतून मार्ग काढत ती प्राप्त केली. भगवान गौतम बुद्धांचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिरोधार्य मानला आणि ते स्वत: एक स्वयंदीप झाले. आणि जगालाही त्यांनी संदेश दिला अत्त दीप भव! स्वत:च स्वत:चा  मार्गदर्शक हो. डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम, एक नावाड्याचा मुलगा, देशाचा राष्ट्रपति झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर चहाच्या टपरीवर काम करण्यापासून दिवस काढले. परिस्थिति कशीही असली तरी रस्ता आपल्यालाच निवडायचा असतो. कितीजण दिवसा नोकरी करून रात्रशाळेत शिकतात. आर्थिक, सामाजिक, शारीरिक, कौटुंबिक परिस्थिति ज्याची त्यालाच माहीत असते. म्हणून त्यातून मार्ग काढणे हे त्यात्या वेळी ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. दूसरा कोणी फक्त थोडेसे मार्गदर्शन करू शकतो.
     तो पोरका होता. आई पळून गेली. बापाने दुसरे लग्न केले. अन्नाची वानवा होती. चोरी करताना पकडला गेला. त्याची रवानगी आश्रमात झाली. अधीक्षक बाईंनी चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. बस्स, त्या चार उपदेशाच्या वाक्यांनी त्याला आधार दिला. त्याने मनाशी ठाम ठरवले. काही झाले तरी चोरी करायची नाही. त्याचे चांगले वर्तन बघून त्याच्यावर जबाबदारीची कामे सोपवण्यात आली. मनाने शहाणे व्हायचे ठरवले होते त्याने. गरिबीच्या न्युनगंडावर त्याने विश्वासाने पाय रोवले. स्वत: दीप होण्यासाठी न्युनगंडातून जळणेही आलेच. हळूहळू त्याने भाजी विकण्याचा धंदा सुरू केला. कामात प्रामाणिकपणा होताच. आज तो दोन ट्रक बाळगणारा मोठा व्यापारी झाला.
       भगवान बुद्धांच्या निर्वाणाची वेळ जवळ आली. तेव्हा त्यांचा एक शिष्योत्तम त्यांच्या जवळ आला आणि रडायला लागला. आता माझे कसे होणार? तेव्हा बुद्धानी त्याला सांगितले. “कुणीच कुणाच्या जन्माला पुरलेला नसतो. ज्याचा त्याचा मार्ग त्याने स्वत;च आखायचा असतो. तू स्वयं दीप हो.”
                 -------------------सविता नाबर
   
    
           
 published in Maharashtra Times Kop.ed. on 16th March 2016

No comments:

Post a Comment