एक
पाच सहा वर्षांची मुलगी हातातून एक काचेचे बाउल नेते आहे. जवळच सोफावर तिची आई
तिच्या छोट्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. ममा, मी हे ओट्यावर ठेवते असे
म्हणून ती ते बाउल आत घेऊन जायला निघते आणि आईकडे बघता बघता ती समोरच्या दरवाजाला
आपटते. बाउल हातातून निसटते. त्याचे तुकडे तुकडे होतात. मुलीचा चेहरा रडवेला. आता
आई रागवणार या भीतीने. पण तिच्या आईच्या चेहर्यावर एक हलकीच स्मितरेषा. मुलीचा
चेहरा आपसूकच हसरा होतो. चेहर्यावर निश्वास सोडल्याचा आविर्भाव आणि आईविषयी
डोळ्यात ममत्व भरलेले. आई जवळ बोलावते. मुलीच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते,
“राणी, असू दे. पडलं तर पडलं. तू काही मुद्दाम केल नाहीस. पुन्हा
करताना जपून कर.” माझ्या मनासमोर एक घटना तरळून गेली. याची मी शॉर्ट फिल्म केली. हा
दिलासा, क्षमा करण्याची वृत्ती मुलीला आत्मविश्वास देऊन जाते. मोठेपणी
आपणच आपल्याला बर्याच गोष्टीत क्षमा करत नाही आणि न्यूनगंडाच्या ओझ्याखाली जीव
गुदमरतो. व्यक्तिमत्वाची सुरुवात इथूनच, या भित्रेपणातून होते.
अल्प शिक्षित माता,
कौटुंबिक समस्येने ग्रासलेली आई आपल्या पाल्याला घेऊन रस्त्यातून जात असते .
आपल्याच गतीने त्या लहान बाळालाही चालवत असते. मधेच दगडाला अडकून किंवा मुलाचे चालण्याकडे
लक्ष नसल्यामुळे ते पडते. ते पडल्यावर त्याला काय आणि कुठे लागले पाहण्याआधी त्या
मुलाच्या पाठीत धपाटा बसतो, कसा पडलास? आता हे जर त्या मुलाला माहीत असते तर ते आईबरोबर
तिचे बोट धरून कशाला आले असते? पडणे हा त्याचा गुन्हा असतो का?
पण मुलाच्या मनात अपराधीपणाची भावना खोलवर रुजते ती अशावेळी. कारण नसताना आपले
काही चुकले हे त्याच्या मनाला कमकुवत बनवते.
एखादी क्षुल्लक चूक,
आयुष्याच्या पटावर नगण्य असताना त्याबद्दल स्वत:ला दोषी किंवा अपराधी समजलात तर
उभे रहाण्याचा पायाच खचतो. यशाची चव कळते अपयशाची
चव घेतल्यावर. जेव्हा आपण कुठेतरी कमी पडतो बाकीच्यांच्या मानाने स्पर्धेत मागे
आहोत हे लक्षात आल्यावर न्यूनगंड मनावर स्वार होतो. आपण स्वत:ला क्षमा करत नाही.
त्यातून बाकीचे डिवचणारे असतातच. त्या डिवचण्याने आपली मान खाली जाते.
जे व्यसनाधीन होतात,
कशाची तरी वाईट चटक लागते. त्यातून बाहेर पडल्यावरही त्यांना स्वत;विषयी
उगाचच कमीपणा वाटत असतो, आणि त्यातून जर कुणी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल
काही चिडवले तर धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे वाटते. अशावेळी झाले गेले
विसरून, मी आज जो आहे तो खरा असे विचार मनात यायला हवेत. त्या
क्षणापासून नव्याने सुरुवात केली तरच जगण्याला नवा अर्थ मिळेल. अन्यथा न्यूनगंडाच्या
ओझ्याखाली दबून राहायला होईल.
स्वत:ला
जाणीवपूर्वक क्षमा करणे, मागच्या चुकीचा पुढच्या ध्येयावर परिणाम होऊ न
देणे अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजीत याला let
go अशी संज्ञा आहे. जुने जाऊ द्या मरणालागूनि,
जाळूनि किंवा पुरुनि टाका. भूतकाळात फार अडकले की भविष्यकाळ अंध:कारमय होतो. झाल्या
गेल्या प्रसंगावर मात करून पुढे जाणे योग्य. आपण त्यातच अडकतो. आणि अगदी बारीकशा
गोष्टीचा बाऊ करतो.
सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या तिने आपल्या
मर्जीने आवडीच्या मुलाशी विवाह केला. तो दोन चार वर्षे कसातरी टिकला. मुलगा
व्यसनाधीन झाला. तिच्या नोकरीने तारले होते. पण एक दिवस कळले की तिने जीव दिला.
सासर माहेर तुटलेले. ज्याच्यावर विश्वास ठेवला तो कुचकामी ठरला. पण या गोष्टीसाठी
तिने जीव का पणाला लावावा? कधीतरी अशा समस्येवर काळ हे औषध असू शकते.
जगण्याला आवश्यक भक्कम आधार लागतो पैशाचा. तो तर तिच्याकडे होता. मग स्वत:ला दोषी
समजण्याइतकी मनाची अपराधी अवस्था करून जीवाचे मोल का द्यावे?
आपल्या हातून चूक होते कधी कळत कधी नकळत. नकळत
आपल्याकडून कोणी दुखावले जाते. कधी आपण आपल्यालाच दुखवलेले असते. केलेली चूक कधी लगेच
जाणवते, कधी बर्याच उशिरा. एक दोन विषयात नापास झाल्यावर इयत्ता
पाचवीतला मुलगा आत्महत्या करतो, कधी आपण परीक्षेत नापास होणार या भीतीनेच जिवाची
बाजी लावली जाते. वडिलांनी मोबाइलचा हट्ट पुरवला नाही म्हणून आयुष्य संपवले जाते. वाढदिवसाला
अमुक एक मनासारखी गोष्ट पालकांनी घेऊन दिली नाही म्हणून जीवन संपवले जाते. जीवनातल्या
हजारो लहान मोठ्या चुकांच्या तुलनेत आपले आयुष्य कोट्यावधी रुपयांचे,
अनमोल असते.
स्वत:ला क्षमा करणे आयुष्याची दिशा बदलते.
क्षमाशीलता ही एक प्रक्रिया आहे. प्रत्येकाच्या बाबतीत ती वेगळी असू शकते. हे एका रात्रीत
घडणेही शक्य नसते. पण एकदा मनावर घेतले की किती वेळ लागतो?
भूतकाळ तर आपण बदलू शकत नाही. तो स्वीकारून पुढे जाणेच आपल्या हातात असते. म्हणून स्वीकारार्हता
खूप मोठी देणगी ठरते. ती करुणा, प्रेम स्वत:बद्दलचा आदर वाढवण्यास मदत करते.
-----------------------सविता
नाबर
Published in Maharashtra Times Kolhapur ed. on 20th April 2016
No comments:
Post a Comment