Tuesday, 7 March 2017

अन्न हे पूर्णब्रम्ह

     

       रवाच एक बातमी वाचली. बातमीतली बातमी अशी होती की एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या भिंतीवर एक पोस्टर लावले होते, पदार्थाबरोबर देण्यात येणारे सांबार जो ग्राहक टाकून उठेल त्याच्यावर दंड आकारण्यात येईल. पुण्यातील एका उपहारगृहात असाच एक फलक लावला होता. कृपया ग्राहकांनी कोणताही पदार्थ पानात टाकू नये. ग्राहकाने मागितलेले पदार्थ पुर्णपणे संपवून उठावे. ज्याची प्लेट स्वच्छ दिसेल अशा ग्राहकाला बिलामध्ये दहा टक्के सूट मिळेल.
      हॉटेलमध्ये फुकट जाणारे अन्न. त्याची विल्हेवाट कशी लावावी हाही खूप मोठा प्रश्न असतो. लग्न कार्यात पूर्वी आग्रह करून वाढण्याची पद्धत होती. पंगतीवर पंगती उठायच्या तेव्हा किती जिलब्या खाल्ल्या, किती लाडू खाल्ले हे अहमहमिकेने खाल्ले जायचे. मोजले जायचे. पण आता खाण्यार्‍याचीही तेवढी ताकद राहिली नाही आणि वाढणार्‍याचीही नाही. आता बुफे पद्धत आली. त्यामागची कल्पना खरेतर फारच भन्नाट. तुम्हाला पाहिजे तेच आणि तितकेच खावे हा त्यामागचा उद्देश. पण या पद्धतीतही लोकांना आपल्या पोटाचा अंदाज येत नाही. काहीही आणि कितीही पानात घेतात आणि टाकतात.
      सुखवस्तू लोकांना अन्नाची किंमत नसते. पण ज्याला एक घास मिळवायला शारीरिक , मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्याला अन्नाची किंमत विचाराल तर कळेल. सुखासुखी मिळणारे, सहज आपल्या पानात पडणार्‍या  त्या ताज्या अन्नासाठी गरीब किती मोताद असतात. तुरडाळ महाग, तांदूळ महाग, कांदा तर न चिरताही डोळ्यात पाणी आणतोय, गरिबाचे अन्न भाकरी आणि कांदा हेसुद्धा त्याच्या तोंडात पडत नाही अशा पार्श्वभूमीवर अन्नाची नासधूस मनाला घरे पाडते.
      समोर आलेल्या ताटातले थोडेसे अन्न टाकणे, पेयातले थोडे पेय शिल्लक ठेवणे याला शिष्टाचार समाजाला जाई, किंबहुना तो अजूनही समजला जातो. बड्या घरच्या बेटयांना हॉटेलात भरपूर मागवून थोडेसे खायचे आणि उरलेले प्लेटमध्ये टाकायचे यात मोठी प्रौढी वाटते. भारतासारख्या संपत्तीची असमान वाटणी असलेल्या देशात एकीकडे गरीबांना खायला अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे अन्नाला तोंड लागत नाही म्हणून ते फुकट जाते ही सत्य परिस्थिती आहे. बर्‍याच ठिकाणी ग्राहकाला पाण्याचा पेला पुर्णपणे भरून दिला जातो. वास्तविक पाहता एवढे पाणी प्रत्येकाला पिण्यासाठी लागतेच असे नाही. मोटारगाडी, दुचाकी क्लोरीनेटेड पेयजलाने धुणार्‍या लोकांना कशी कळावी प्यायला पाणी मिळणे मुश्किल असलेल्या गावात कित्येक मैल अंतरावरून डोक्यावरून हंडे भरून आणावे लागतात, अशा लोकांची व्यथा?
      पर्जन्याचे असमाधानकारक बरसणे, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षसंहार, सिमेंटची वाढती जंगले, सगळ्याच प्रकारचे प्रदूषण त्यात त्यामध्ये जल, वायु, ध्वनिप्रदूषण सगळेच आले. या आणि अशा अनेक कारणांमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे. शेतकरी राजा हवालदिल झालाय. कसेतरी जीवन धकवतोय. या सगळ्याचा साकल्याने विचार करून स्वत:पासून सुरुवात करू या. अन्नाची नासाडी करायची नाही, ते वाया जाऊ द्यायचे नाही पाणी वाया घालवायचे नाही. हे मनापासून ठरवूया. श्री. वसंतराव नार्वेकर यांच्यावरील पुस्तकाचे काम करताना त्यांच्या वडिलांच्या सत्यशोधक चळवळीशी तोंडओळख झाली. त्यामुळे सत्यशोधक समाजाची तत्वे समजली. कोणत्याही सबबीखाली तांदळाच्या अक्षता वापरायच्या नाहीत. अन्न हे परब्रम्ह आहे. अन्न पायाखाली तुडवून त्याचा नाश करणे योग्य नाही. अक्षतांसाठी फुलांचा उपयोग करावा. कसलीही फुले चालतील. मुंडावळया पाहिजे असल्यास फुलांच्या बांधाव्या. नार्वेकरांच्या चरित्रातील त्यांचे वडील आमदार कै. डी. एस. नार्वेकरांच्या विचारसरणीतील हे काही मुद्दे. तांदळाची नासधूस टाळण्यासाठी अक्षता फुलांच्या असाव्यात. जेणेकरून तांदूळ पायदळी न तुडवता कुणाच्या तरी मुखी लागावा. कमीत कमी खर्चात विवाह व्हावा. विवाहाच्या वेळी मोजकेच लोक जेवणासाठी बोलवावेत. विवाहाचा खर्च संसारोपयोगी वस्तूंसाठी करावा. बॅंड, वरात यापेक्षा गरीबांना अन्न द्यावे. किती उदात्त विचार आहेत हे! फार त्याग करण्याची आवश्यकता नाही. गरज आहे फक्त आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावण्याची आणि मन थोडेसे संवेदनक्षम करण्याची.
                   ..........................सविता नाबर      

अपेक्षांचे ओझे

     

        कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन! म्हणायला किती साधे सोपे शब्द आहेत हे ! पण खरेच फळाची अपेक्षा न ठेवता आपण काम करतो का? नाते कुठलेही असले तरी कळत नकळत अपेक्षा मनात येतातच. पतीपत्नी, सासू सुन, नणंद भावजय, जावा जावा, मित्र मैत्रिण, भाऊ बहिण, नाते आले की अपेक्षा आलीच. ती कुणी करावी याला काहीही अर्थ नसतो. एकजण काम करत गेला की त्याच्याबद्दल दुसर्‍याची अपेक्षा वाढतेच. यालाच गृहीत धरणे असे म्हणायला हरकत नाही. लहानपणापासून ही मनोधारणा आपसूकच आपल्या मनात तयार होत असते.
   जेव्हा कुठलीही अपेक्षा नसते तेव्हा अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी येत नाही. मुलांच्या पालकांकडून आणि पालकांच्या मुलांकडून अशाच अपेक्षा असतात. मुलाने आज्ञाधारकपणे वागावे. अभ्यास भरपूर करावा. चांगले मार्क्स मिळवून उत्तम करियर करावे ही जशी आई वडिलांची अपेक्षा असते, भलेही मुलाला पालकांनी ठरवलेल्या करियरमध्ये रस असो वा नसो. तशीच अपेक्षा मुलांची पालकांकडून असते. मुलांच्या तोंडातून काही बाहेर पडायचा अवकाश की त्यांच्या समोर ती गोष्ट हजर पाहिजे ही इच्छा असते. बर्‍याच वेळेला त्यासाठी आईवडिलांना काय आणि किती कष्ट पडतात याची जाणीव नसते. आणि जेव्हा पालक त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाहीत तेव्हा अपेक्षाभंगाचे दु:ख मुलांच्या पचनी पडत नाही. कधी संवेदनशीलतेचा अतिरेक होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबला जातो. मित्रांमधले एकमेकावर असणारे पियर प्रेशर हाही एक अपेक्षा ठेवण्याचाच प्रकार. त्यावेळी त्या व्यक्तीने सजग आणि सावध असणे  महत्वाचे. विशेषत: शाळेमध्ये सगळ्या मुलांकडे असणारी वस्तु आपल्याकडे असलीच पाहिजे असा अलिखित नियम होऊन जातो आणि त्याची पूर्ती झाली नाही की निराशा मुलांच्या पदरी येते. मित्रांमध्ये वावरणे आपल्याला कमीपणा आणणारे ठरू नये ही धडपड असते.
      एक दुकानदार रात्री दुकान बंद करत असतो. एवढ्यात तोंडात पाकीट धरलेला कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवरच्या पिशवीत दुकानदार सांगितलेले सामान भरतो. तो कुतुहलापोटी कुत्र्याच्या मागोमाग जातो. कुत्रा बस स्टॉपवर थांबतो. त्याला पाहिजे ती बस मिळाल्यावर कुत्रा बसमध्ये चढतो. त्याच्या गळ्याच्या पट्ट्यात त्याला कुठे उतरायचे त्याची चिठ्ठी आणि पैसे असतात. आश्चर्यचकित झालेला कंडक्टर कुत्र्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्टरला खुणावतो आणि बस थांबल्यावर उतरतो. दुकानदार त्याच्या मागोमाग असतोच. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोनतीन वेळा वाजवल्यावर दार उघडले जाते. बाहेर आलेला मालक कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालतो. कुत्रा बिचारा शेपूट घालून दूर कोपर्‍यात जाऊन बसतो. दुकानदार मालकाला याबद्दल विचारतो, तो संतापून सांगतो, “शेवटी या कुत्र्याने मला उठायला लावलच. दाराची किल्ली विसरला.” तुम्हाला हसू आले असेल ना! कथा आंतरजालावरची. रुपकात्मक असली तरी माणसाच्या स्वभावात असणारी अपेक्षांची मांदियाळी वास्तवात किती खरी असते याचे अगदी जिवंत उदाहरण आहे. दुसर्‍याकडून अपेक्षा ठेवणे जितके बरोबर नाही तितकेच लोकांच्या खुषीसाठी आपणही त्यांची अपेक्षापूर्ती करत रहाणे बरोबर नाही अन्यथा गोष्टीतल्या कुत्र्यासारखी गत होते.
      कार्यालयात कितीही काम केले तरी वारिष्ठाची अपेक्षापूर्ती होणे कठीण असते. सहकार्‍याला प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणार्‍या कनिष्ठाचा विरस होतो. याचा परिपाक म्हणून काम करताना ढिलाई, दिरंगाई, कामचुकारपणा होऊ शकतो. जिथे अपेक्षा नसतात. तिथे मनाचा मोकळेपणा, प्रेम , विशालपणा छान काम करतो. नात्याचे बंध मजबूत होतात. अपेक्षांच्या नाजुक धाग्यावर उभे ठाकलेले नात्यांचे बंध मात्र तकलादू ठरतात. आपल्या मनाच्याही नकळत, अपेक्षा निर्माण होतात. कधी दुसर्‍याकडून तर कधी स्वत:कडूनही. म्हणूनच एकदा का पहिल्या नंबराची चटक लागली की दरवेळी पुरी व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. अपयशाची चव चाखल्याशिवाय यशाचे गमक काय हे कळत नाही. कधी कधी अवास्तव अपेक्षा आपण स्वत:बद्दल ठेवतो आणि त्या ओझ्याखाली स्वत:च दबून जातो. मग प्रश्न उभा राहतो जग काय म्हणेल याचा. आपण स्वत:ला जराशीही उसंत, सवड न देता एका दडपणाखाली आयुष्य पार पाडत राहतो. कशाला बाळगायचे हे अपेक्षांचे ओझे?
     .....................................सविता नाबर

असावे घर ते आपुले छान

      

     र्‍हाड निघालय लंडनला हा एकपात्री प्रयोग पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. पाश्च्यात्य संस्कृतीतला जॉन बहिर्दिशेला जातो तेव्हा आपला ग्रामीण बबन्या त्याला सांगतो, ऑल वावर इज अवर. गो एनिवेअर. ही आपल्या कडची मोकळी ढाकळी कल्पना. गंमत म्हणून खूप हसू येते. पण वास्तवात हे बरोबर आहे का? राकट आणि कणखर दगडांच्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर जीवनावश्यक सुविधेपासून सुरुवात करायला पाहिजे.
      स्वच्छ भारत अभियान सरकारने अमलात आणायला सुरुवात केली आणि शौचालयाचा प्रश्न बर्‍यापैकी धसास लागला. विषय चर्चेला फारसा चांगला नाही. पण अत्यावशयक आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासारखीच अत्यंत निकडीची गोष्ट म्हणजे शौचालय. ते घरात असणे, किंबहुना बंदिस्त असणे महत्वाचे. पण आपल्याकडे त्या गोष्टीला अतिशय गौण स्थान दिले आहे. कोणताही शारीरिक विधी उघड्यावर करणे, मनुष्यप्राण्याला शोभा देत नाही. अगदी कुत्री मांजरे सुद्धा आपल्या विष्ठेवर माती टाकतात. मग सर्व प्राणिमात्रात माणूस हा बुद्धीचा उपयोग करणारा आहे तरीही पशुवत वागणे का? अजूनही शौचालय नसणे हा काही फार मोठा प्रश्न वाटत नाही. ग्रामीण भागात स्वत:ची घरे बांधली जातात पण त्याबरोबरची शौचालयाची निकड लक्षात येत नाही. हा प्रश्न महिलांच्या दृष्टीने तर फार महत्वाचा आहे. तोंड लपवून किंवा अंधाराचा आधार घेऊन नैसर्गिक विधी उरकणे यापरते दु:ख ते कोणते? त्यातून स्त्री तरुण असेल, वयात येणारी मुलींसाठी तर ही अगदी नामुष्किची गोष्ट असते. त्यामुळे योग्य वेळेसाठी वाट बघता बघता शरीरावर अत्याचार होतो आणि यातूनच व्याधी सुरू होतात.
       खाजगी बाबतीत ही  समस्या आहेच. पण ज्या सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये स्वच्छ प्रसाधन गृहांची आवश्यकता असते तिथे बर्‍याच ठिकाणी त्यांचा अभाव असतो किंवा ती इतकी अस्वच्छ असतात की विद्यार्थिनी शाळेतच जायला राजी होत नाहीत. बर्‍याच वेळा शाळांना स्वच्छतागृह नसल्याने मुलींची शाळा दहाव्या बाराव्या वर्षी बंद होते. ही आहे आपल्या सावित्रीच्या लेकींची शोकांतिका. या पार्श्वभूमीवर तिघी स्त्रियांनी उचललेले पाऊल धीराचे आणि प्रगतीचे आहे. स्वच्छतेचे तर आहेच आहे.
    चैताली राठोड हिने सासरी शौचालय नाही म्हणून लग्नातील रुखवताला नकार देऊन आईवडिलांनी शौचालय द्यावे अशी गळ घातली. मागणी विचित्र होती पण रास्त होती. त्यांनी चैतालीला रेडिमेड शौचालय देण्याचा निर्णय घेतला. सुवर्णा लोखंडे घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बचतगटाकडून शौचालयासाठी कर्ज काढले. आपल्या वाट्याला आलेली कुचंबणा मुलीच्या वाट्याला येऊ नये आणि स्वच्छता राहावी हा तिचा दृष्टीकोन. तर वाशिम मधील सायखेडा इथल्या संगीता आव्हाडे हिला त्यासाठी 13 वर्षे संघर्ष करावा लागला. विवाहानंतर सासू सासर्‍यांना सांगूनही परिस्थितीत फरक पडला नाही. तिने मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. आपल्या 12 वर्षांच्या मुलीला आपण सहन केलेली कुचंबणा भोगावी लागू नये हा त्यामागील हेतु. स्वच्छ अभियान अंतर्गत घर तेथे शौचालय उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागात जिथे घरे लहान आहेत तिथे घरामधे शौचालय असणे अवघड असते. लहान घरांची संख्या जास्त. त्यामुळे एकापेक्षा जास्त कुटुंबांनी एकत्र येऊन शौचालय बांधण्यास अनुदान देण्यात येणार आहे.
     इचलकरंजीसारख्या ठिकाणी विविध प्रांतातील लोक रोजगारासाठी येतात. अनेक यंत्रमाग कारखान्यात शौचालय आणि मुतारीची सोय नाही. त्यामुळे कामगार उघडयावर शौचाला जातात. बांधकामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात, त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनीही कामगारांसाठी शौचालयाची सोय करावी अशी नोटिस आता स्थानिक संस्थांनी काढली आहे. शहरात, गावात, लांबच्या प्रवासात सार्वजनिक स्वच्छतेच्या चांगल्या सोयी नसतात. मूलभूत स्वच्छता ही तिथूनच येते. या कामांसाठी निधि उभा करण्याची गरज आहे. प्रसाधनाची सुविधा असणे ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. आता ते अभियान नसून एक चळवळ बनली आहे.
       बर्‍याच ठिकाणी प्रभातफेर्‍या, निबंध स्पर्धा घेऊनही उपयोग झाला नाही. लोक उघड्यावर जातात. म्हणून मग आणखीन अभिनव कल्पना काढली. गुड मॉर्निंग पथकाची. पहाटेपासून पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कारवाई केली. शौचास उघड्यावर बसणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर अशा व्यक्तीची घरापर्यंत हलगीच्या आवाजात वाजत गाजत वरात काढली जाते.
   .............................सविता नाबर

अवघा आनंदी आनंद

      

         एका  माणसाला देव प्रसन्न झाला. तुला हवे ते माग असा वर मिळाल्यावर, त्याने सोने मिळण्यासाठी मला वर दे त्यामुळे मी श्रीमंत होईन. देवाने, तुला परीस मिळेल आणि तुझ्याकडे जे लोखंड असेल, दिवसभरात त्याला परीसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोन्यात रूपांतर होईल. तू श्रीमंत होशील असे सांगितले. तो माणुस परीसाच्या शोधात निघाला. लोखंड प्रत्येक दगडाला लावून तो पहात होता. अस करता करता संध्याकाळ झाली. सूर्यास्त होता होता त्याला वाटलं अरे,आपल्याला परीस तर मिळालाच नाही! फक्त एक क्षणभर त्याची नजर हातातल्या लोखंडाकडे गेली. त्याचे पुर्णपणे सोने झाले होते. पण परीस कुठे येऊन गेला तेच लक्षात आल नाही. आनंदाचंही असच आहे. आयुष्यात जाताजाता ,लहान सहान प्रसंगातून आपल्याला आनंद मिळत असतो. फक्त त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल पाहिजे.
          बर्‍याच दिवसानी आज खूप खरेदी केली. अगदी मनासारखी. आनंद झाला. खरेदी करण हाही आनंदाचा एक प्रकार. आयुष्यात आपण नेहमी कुरकुरतच असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यन्त फक्त आपल्याला दिवस भरात काय कमी पडलं हेच डाचत असत. पण काऊंट युवर ब्लेसिंग्स म्हणतात तस करायच ठरवल तर अगणित सुखं आपल्याला दिसू शकतील. जेव्हा तुम्ही दु:खात आहे अस तुम्हाला वाटत. तेव्हा फक्त आनंदाचे प्रसंग आठवा.
       योगा इंस्टिट्यूट , मुंबईला योग प्रशिक्षण घेत असताना प्रथम मी सात दिवसांचा बेसिक कोर्स केला होता. तो निवासी कोर्स होता. त्यामध्ये रोज रात्री पाच सकारात्मक गोष्टी लिहायला सांगायचे. पहिले दोन दिवस आठवून आठवून लिहिल्या. चांगल्या गोष्टीही आठवाव्या लागतात हे त्यावेळी कळलं. नंतरच्या दोन दिवसात फारसे प्रयास पडले नाहीत आठवायला. शेवटच्या दिवशी मात्र किती लिहू आणि काय लिहू असे झाले. बागेत जमिनीवर पडलेली, झाडांची वाळलेली पान उचलून कचर्‍याच्या टोपलीत टाकण हे सुद्धा किती आनंद देणार आहे, हे त्यावेळी कळल.किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. पण आपण त्याकडे कानाडोळा करत  असतो. लक्षात आल न आल अस करून नजरअंदाज करत असतो. कोकीळ पहाटे पंचम लावतो तेव्हाचा स्वर मोबाईलच्या रिंग टोनवरही नाही मिळणार. आनंददायी सुप्रभातीचा स्वर. जेव्हा आपण स्वत:साठी वेळ देतो, काही वेळ खरोखरीच एकांतात बसतो. तेव्हा बाहेरची प्रलोभन काही काळासाठी मोह निर्माण करण थांबवतात. आपण फक्त स्वत:वर आणि स्वत:वरच मन केन्द्रित करू शकतो. जेव्हा मनात विचारांची मालिका निर्माण होते तेव्हा जाणीवपूर्वक कोणते विचार मनाच्या आधीन ठेवायचे हे ठरवता येते. अशावेळी फक्त सकारात्मक, आनंदी विचारच मनात आणले, तर मनाची स्थिती प्रसन्न रहाते.
       शालांत परीक्षेचा निकाल लागताना किती हुरहूर वाटत असते ! कुठल्याही कसोटीला उतरताना त्याच्या निकाला विषयी मनात उगाचच धाकधूक असतेच. त्या हुरहुरीतही एक वेगळाच आनंद लपलेला असतो. रिझल्ट लागल्यानंतर पुढची ,आयुष्याची दिशा ठरवणारी शाखा निवडण ,त्या निर्णयातही एक आनंद असतो. कॉलेजच वातावरण म्हणजे मोहमयी दुनियाच असते. अभ्यासूपणाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते . माझ्याकडे गाडी, बाइक, आय फोन आहे ,तुझ्याकडे काय आहे विचारल्यावर , माझ्याकडे माझ मेरीट(कौशल्य) आहे. (दीवार चित्रपटातला संवाद आठवा. मेरे पास मा है या धर्तीवर) हे सांगताना होणारा आनंद , एखादी वर्गमैत्रीण किंवा वर्ग मित्र यांच्याशी होणार्‍या दिलखुलास गप्पा ,कॉलेज बंक करून पाहिलेले सिनेमा आणि झाडाखालच्या गप्पा. खूप खपून रांधलेल जेवण पाहुण्यांनी स्तुति करून खाल्लं त्याचा अवर्णनीय आनंद. वाढदिवसाला मिळालेल सरप्राइझ गिफ्ट. खूप लांबवर अचानक केलेली ड्राइव्ह. समुद्राची गाज ऐकत बिचवर घालवलेला शांत संध्यासमय. तापलेल्या मातीत पडलेल्या पाहिल्या पावसाने येणारा मातीचा सुगंध. मनभर आनंद देणारा. आनंदी आनंद गडे , जिकडे तिकडे चोहीकडे, या बालकवींच्या ओळी आठवतात. जगात मोद सगळीकडेच भरलेला आहे. मग आपल्या आतमध्ये आनंद का असू नये? आनंद म्हणजे ओठांच्या महिरपीचा विस्तार. ओठ मुडपले तर त्रासच. त्यापेक्षा विनासायास ओठावर हसू येऊ द्या.
                         ------------------सविता नाबर