Tuesday, 7 March 2017

खांद्यावरती जड झाले ओझे........

      

      लिकडेच वाळवंटात एक हिरवळ दिसली. मध्यंतरी ऐकले विना दफ्तर शाळा उपक्रम. तिथे भरपूर वाचन, मनोरंजनातून शिक्षण असे अनेक उपक्रम राबवले होते. बालसाहित्याचे वाचन, चित्रकला, मुक्तचित्र रेखाटन, रंग भरणे, मैदानी खेळ यांना प्राधान्य दिले होते. आकाशकंदील, मेणबत्ती तयार करण्याची प्रात्यक्षिके झाली. कवायत प्रकार झाले. विज्ञान, गणित विषयक कोडी, आरोग्यविषयक माहिती, शैक्षणिक चित्रपट असे अनेक कार्यक्रम पार पडले. मुलांना नक्कीच स्वप्नमय जगात आल्यासारखे वाटले असणार.
    हसत खेळत ,झाडाखाली बागडत, पक्ष्यांचा किलबिलाट, छान छान गाणी ऐकत, नाचत, गात, गप्पा मारत शाळा किती छान वाटेल. डेरेदार वृक्षाखाली, फळाफुलांच्या संगतीत, निसर्गाच्या सानिध्यात, आयुष्य कस भरभरून जगावे हा तर जीवनाचा पाया. बंगळुरू जवळील व्हॅली स्कूलमध्ये जायचा योग आला तेव्हा मन असेच हरखून गेले होते. शांतिनिकेतन शाळेची संकल्पना रविंद्रनाथ टागोरांनी काढली. निसर्गाच्या सानिध्यात मुक्त विहार करत जीवनाच्या संकल्पना शिकणे , किती विहंगम कल्पना होती ती! समाजाच्या बाह्य घटकांचा प्रभाव न पडता, मुलांच्या अंतर्मनातून आलेला प्रतिसाद महत्वाचा. आत्मशक्ती म्हणजे जगण्याचे बळ. ही अंत:शक्ति आज कुठून मिळते? आज शाळेचे बाजारीकरण झालेय. त्यातली गोडी, गम्मत निघून जातेय. मुलांना शाळेचे आकर्षण वाटावे असे काय राहिलेय शाळेत? फ्लॅट संस्कृतीमुळे घरांना अंगण नसते. शाळेला तर कधी पटांगण असते, कधी नसते, एकावर एक मजले मात्र चढलेले असतात. शारीरिक कवायतीला वाव फारसा असतोच असे नाही. 
      प्राथमिक शाळेतील पाच वर्षाच्या एका मुलीची मुलाखत वाचली. मुख्याध्यापिकेने सरिताला विचारले, तुला काय येते ते म्हणून दाखव, त्यावर छोटीचे उत्तर, मला बरेच काही येते तुम्हाला मी काय म्हणून दाखवू? “तुला एखादी कविता, गोष्ट काहीही येत असेल ते सांग.” “तुम्हाला नक्की काय हवे आहे, गोष्ट की कविता?” “बरं, गोष्ट सांग.” “ मी ऐकलेली सांगू की लिहिलेली?” आता चक्रावायची पाळी मुख्याध्यापिकेची. “तू गोष्ट लिहितेस?” “मला का लिहिता येऊ नये!” “ठीक आहे तू लिहिलेली सांग” सरीताने हनुमान सीतेची सुटका करतो ती कथा सांगितली, तो बरोबर स्पायडर मॅनला घेऊन जातो असेही सांगितले, कारण भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये खूप पर्वत आहेत ना मग एका हातात द्रोणागिरी पर्वत पकडणारा हनुमान एकटा कसा जाणार. पण स्पायडर मॅनच्या दोरखंडामुळे सहज जाऊ शकतो. सीतेला घेऊन येताना तो सरिताचा मित्र अक्षय याला भेटतो. असे का विचारल्यावर ती सांगते ही माझी गोष्ट आहे. त्यामध्ये माझे मित्र मैत्रिणी, डोरा बाहुली सगळेच आहेत. सरिताच्या कॉलनीमध्ये असणार्‍या सीतेच्या घरी तिला घेऊन येतात . सीता म्हणजेच मी म्हणजेच सरिता असे गोष्टीचे आकलन मुलाखत घेणारीला, ऐकणार्‍या सगळ्यांनाच होते. सगळीच लहान मुले कल्पनेच्या साम्राज्यात भरारी मारणार्‍या सरितासारखी असतात. वेळोवेळी त्यांच्या कल्पनेला खतपाणी घालणे आपल्या हातात असते. पण व्यवहारी जगात त्यांच्या सृजनशीलतेचे पंख कापले जातात. डोळ्यांच्या बाजूंना घोड्यासारखी झापडे लावली जातात आणि हजारो, लाखो मेंढरामधले एक कोकरू होते तुमचे लेकरू. आपली शाळा नामक संस्था यासोबत समाज आणि पालकही मुलांच्या मुक्त मनाला किती बांध घालतात हे लक्षात येते.
         वयाच्या आणि शरीराच्या मानाने जड जड दप्तराचे ओझे मात्र बाळगावे लागते. कधी आई वडील आपल्या पाल्याचे दप्तराचे ओझे वाहतात, तर कधी बिचारे पोर स्वत:च. मुलांसाठी पिण्याचे चांगले पाणी, स्वच्छतागृहाच्या चांगल्या सोयी नसतात. बर्‍याच ठिकाणी स्वच्छतेची चाड असलेल्या मुली शाळेतल्या टॉयलेटचा वापर करायला नाखुश असतात. पर्यायाने शारीरिक विधीचा अवरोध आरोग्याचे मोल द्यायला लावतो. शाळांमधला अभ्यासक्रम जे व्यावहारिक जगात आवश्यक नाही त्याचा अंतर्भाव पाठ्यपुस्तकात असतो. प्रत्यक्ष जीवनात त्या गोष्टींचा उपयोग काहीच नसतो. पण या व्यवहारी जगात ही संवेदनशीलता कमी होते, आपल्या जगरहाटीच्या नियमानी मुलांच्या कोवळ्या मनावर आघात होतात आणि त्यांचे मन करपून जाते. 
      मुले संवेदनशील असतात. ती संवेदनशीलता अनेक भाषा शिकायला, निसर्गातून अनेक गोष्टी शिकायला नकळत मदत करत असते. शाळेतला अभ्यास घोकून परीक्षेत ओकण्यापेक्षा स्वत:च्या बुद्धीने मुले उत्तर द्यायला शिकली तर किती होईल. आजची पिढी जात्याच तल्लख आहे त्या मुलांना स्वत:च्या बुद्धीची जाणीव करून देणे आपल्या हातात आहे हे मात्र नक्की! उद्याच्या सुजाण नागरिकासाठी हे आवश्यक आहे.
         ...............................सविता नाबर

No comments:

Post a Comment