जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि
गरियसि. आई आणि मातृभूमी दोघींचेही आपल्यावर इतके ऋण आहे की त्या स्वर्गाहूनही
श्रेष्ठ आहेत . वंदनीय आहेत . आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे झाली. इतक्या
वर्षात काय कमावले याचा विचार करायचा ठरवला तर आपण बरेच काही मिळवले आहे. पण काही
बाबतीत आपला जो ह्रास होतो आहे तो आता आवाक्यात आणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य
दिनाच्या निमित्ताने आज संकल्प सोडूया. संकल्पासाठी फक्त चैत्र शुद्ध प्रतिपदाच
असायला हवी असे नाही.
देशाच्या संरक्षणार्थ प्रत्येकानेच कटिबद्ध
राहिले पाहिजे. हे संरक्षण परकीय देशापासून नाही. तर आपणच आपल्यावर करत असलेल्या
आक्रमणापासून संरक्षण केले पाहिजे. जल, वायु, ध्वनि यांच्या प्रदूषणापासून , निरक्षरतेपासून, अंधश्रद्धेपासून आपल्या लोकांची मुक्तता
हे मोठे मोठे प्रकल्पच आहेत . प्लास्टीक मुक्त भारत, वैयक्तिक
स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी प्रसाधन गृहांची विपुलता, साक्षरता मोहीम या तर आवश्यक गोष्टी आहेत. आपली भारतीय प्रजा सुदृढ, सशक्त झाली पाहिजे. वंचितांना पुरेसे अन्न, वस्त्र ,निवारा मिळाला पाहिजे. बाबा आमटेंचे भारत जोडो आंदोलन फक्त
त्यांच्यापुरतेच मर्यादित राहू नये. प्रत्येकाने आपल्या निकटच्या, सहवासा तल्या व्यक्तिला आपलेसे केले पाहिजे. जगात आपल्या देशाची मान
उंचवणारे आपले खेळाडू त्यांना वेळोवेळी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तरच
ते बाहेर जाऊन काहीतरी कामगिरी करू शकतील.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू
केला . लोकांचे आपसातील संबंध दृढ व्हावेत, प्रेम वाढावे यासाठी. पण सार्वजनिक एकोप्याचे आज
भ्रष्ट रूप झाले आहे. डॉल्बी लावून , कर्ण कर्कश आवाजातील
गाण्याच्या तालावर नाचताना आजूबाजूला वृद्ध, वयस्क लोक असतील
,लहान मुले असतील, या आवाजाचा त्रास
होऊ शकेल अशा व्याधींनी ग्रस्त लोक असतील, याचा विचार करूया .
फटाके वाजवताना आपला आनंद दुसर्याच्या दु:खाचे कारण बनणार नाही याची दक्षता घेऊया
. आजचे हे सार्वजनिक समारंभाचे हिडीस रूप बदलले पाहिजे.
रस्त्यातून जाताना पचकन रस्त्यात थुंकणारे
महाभाग किती आहेत. त्यांनी थुंकण्यापूर्वी विचार करावा, आपण आईवर थुंकतोय किंवा दूसरा कुणी आपल्या
अंगावर थुंकतोय. या क्षणभराच्या विचाराने कृतीत नक्कीच बदल होईल. आपल्या देशाचे
सिंगापूर, शांघाय करायचे तर सुरुवात आपल्या कृतीपासूनच
करायला हवी. शिवाजी दुसर्याच्या घरात नाही आपल्याच घरात जन्मला पाहिजे.
त्याच्यावर सुसंस्कार करण्याची जबाबदारी प्रत्येक पालकाची स्वत:ची आहे.
आजकाल जो उठतो तो परदेशी जायला बघतो. जगाची
दारे तरुणांसाठी नक्कीच खुली आहेत. पण आपल्या विद्येचा खरा उपयोग आपल्या देशाला, आपल्या जनतेला आहे हे लक्षात असू द्या. काही
काळासाठी बाहेरचे जग पाहून येणे आवश्यकही आहे. पण आजची युवा पिढी परक्या देशाकडे
आकर्षित होतेय. आणि आपल्या आईवडिलांना आणि मातृभूमीला पारखी होतेय . त्यांच्या
शिक्षणाची, तंत्रज्ञानाची, कलेची ,बुद्धीची, प्रेमाची गरज आपल्या देशाला आहे. खरे तर
आपली युवा पिढी परदेशात जाऊन त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी होते. आपली
मूळे दुसर्या मातीत रुजत नाहीत. भारतीय
संस्कारांचे मूळ परक्या मातीत रुजू शकत नाही.
कवि केशवसुतानी उगीच म्हटलेले नाही.
प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी
तयांत खोदा, निज नामे त्यावरती नोंदा ,बसुनी
का वाढविता मेदा? कार्यरत होउया. काम केल्याने शरीर झिजणार
नाही. बुद्धीला मात्र चांगली धार येईल. स्वातंत्र्य
दिन हा कुठल्याही प्रकारचा फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे
यासारखा एक दिवसाचा सोहळा न राहाता खर्या अर्थी स्वातंत्र्योत्सव साजरा व्हावा. सुट्टी
या अर्था पलीकडे जाऊन काहीतरी करण्याचा ध्यास असावा. आळसात रेंगाळणारा दिवस न
राहाता कामात व्यग्र रहाण्याचा दिवस असावा. सुजलाम ,सुफलाम
भारताला मानवतावादी देश बनवूया.
--------------------------सविता नाबर
No comments:
Post a Comment