Tuesday, 7 March 2017

मन पाखरू पाखरू .............

    

        २४ ऑगस्ट १८८० रोजी साहित्य सृष्टीला एक सुंदर स्वप्न पडलं. साक्षात सरस्वती अहिराणी भाषेत कवितेच्या रूपाने धरतीवर अवतीर्ण झाली. ही कविता दिसामासाने खानदेशात एका शेतकरी कुटुंबात बहिणाबाईंच्या रूपात वाढत होती. आचार्य अत्रे यांच्या शब्दात त्यांची कविता म्हणजे बावनकशी सोने .बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या अलिखित कविताना मूर्त रूप दिले आणि बहिणाबाईंची कविता सामान्य माणसापर्यंत पोचली. त्यांची प्रत्येक कविता जीवनाचा अर्थगर्भ अनुभव सांगणारी. फक्त पुस्तकी शिक्षण म्हणजेच जीवन हे त्यांच्या कविता वाचल्या की खोटे ठरवते.
      ज्या मातीत त्या वाढल्या तिच्याशी असणारे नाते, तिच्या सानिध्यात आलेले अनुभव ,कुणाच्याही जीवनात येतात तेच ,पण त्या अनुभवातून माणसाचं अवघ जीवन, त्याचा स्वभाव ,निसर्गातल्या, सृष्टीच्या सजीवच नाही तर अगदी निर्जीव वस्तूतून दिसणारे चमत्कार यांची उदाहरणे देऊन त्यांनी मांडले आहे. ती उदाहरणे म्हणजे त्यांच्या एकेका शब्दातून परिस्थितीचे दर्शन घडवणारी, निसर्गाचा नियम सांगणारी पुस्तकेच आहेत. जगाच्या भाल्याबुर्‍या अनुभवानी त्या खूप काही शिकल्या आणि ते कवितेत उतरले. कर्‍याले गेली नवस,आज निघाली अवस ,ज्याच्या हातले घट्टे ,त्याले देव भेटे अशा त्यांच्या म्हणीही आहेत. प्रतिभेचा वरदहस्त लाभलेली कवयित्री, अशिक्षित असून जीवनाचे तत्वज्ञान नेमक्या शब्दात सांगणारी. भाषा लडिवाळ, सहज सोपी, ओघवती . भाषेत जिव्हाळा ओतप्रोत भरलेला. त्यांनी ज्या प्रतिमांची उदाहरण दिली आहेत ती तंतोतंत लागू पडतात आणि डोळ्यांसमोर उभी रहातात. भाषा अहिराणी असली तरी त्याचा अर्थ अगदी सुगम्य आहे. त्यांच्या कवितेची कुठलीही ओळ म्हटली तरी त्याचा अर्थ पुस्तकाचे पान उघडावे तसा आपसूकच उलगडला जातो. मन म्हणजे काय हे मोजक्या शब्दात सांगताना त्यांनि खूप सुंदर उपमा दिल्या आहेत. मन पाखरू पाखरू ,त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर, गेल गेल आभायात.
        कशाला काय म्हणू नाही याचे मोठे मार्मिक उदाहरण त्यांनी दिले आहे. ज्यातून कापूस येत नाही त्याले बोण्ड म्हणू नाही, आणि ज्यातून हरिनाम निघत नाही त्याले तोंड म्हणू नाही. इमानाला इसरला त्याले नेक म्हणू नये, जन्मदात्याला भोवला त्याले लेक म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही ती भक्ति नाही आणि जिच्यामध्ये चेव नाही ती शक्ति नाही. निसर्गकन्या, भूमिकन्या बहिणाबाईनी पेरणीनंतर जमिनीतून बाहेर आलेली रोपे पाहून जी प्रतिमा वापरली आहे त्याला तोड नाही. ऊन वार्‍याशी खेयता, एका एका कोंबातून, परगटले दोन पान, जसे हात जोडीसन. निरक्षर बहिणाबाईला कोण शिकवते हा प्रश्न विचारल्यावर उत्तरते, माझी माय सरसोती ,माले शिकविते बोली, लेक बहिनाच्या मनी किती गुपित कोरली. जात्यावर दळायला बसल्यावर सहजगत्या सुचणारी ओवी, तिचे मोठे हृद्य वर्णन त्यांनी केले आहे, अरे घरोटा, घरोटा, तुझ्यातून पडे पिठी ,तस तस माझ गान, पोटातून येत व्हटी. प्रत्येक स्त्रीला परमप्रिय असणारे माहेर किती जवळचे तर, माय म्हनता म्हनता ओठ ओठालागी भिडे, आत्या म्हनता म्हनता ,केव्हड अंतर पडे. लेकीच्या माहेरासाठी सासरी नंदणारी माय, संसार कवितेत अरे संसार ,संसार,जसा तवा चुल्हयावर , आधी हाताला चटके, तेव्हा मियते भाकर म्हणून वास्तव सांगते. त्रिकालाबाधित सत्य जगणे आणि मरणे. यातील अंतर बघा. आला सास ,गेला सास ,जीवा तुझ रे तंतर ,अरे जगन मरण एका सासाच अंतर.     
     स्वत:च्या कर्माची रेखा उघडी पडल्यानंतर, नशिबावर अवलंबून न राहाता, कंबर कसून कामाला लागल्या. नही नशीब नशीब, तयहाताच्या रेघोट्या किंवा जरी फुटल्या बांगड्या , मनगटी करतूत  हे सत्य त्यांनी जाणले होते. माझ दू:ख ,माझ दू:ख तयघरात कोंडल, माझ सुख माझ सुख हंड्या झुंबर टांगल. माणसाचे वागणे असे असावे. पण तो खरा आहे कसा ते त्या सांगतात, मानसापारी मानूस राहतो रे येडजाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाना. एका वाक्यात सार्‍या जीवनाचे सार सांगणारे अर्थगर्भ तत्वज्ञान सांगायला सरस्वतीची लेकच जन्मायला लागते. संसाराचे कष्ट झेलत मुलांना वाढवणारी बहिणाबाई आपल्या काव्य प्रतिभेच्या लेण्यांनी लोकांना स्तिमित करते.
                             -------------------------सविता नाबर

No comments:

Post a Comment