सहा
सात वर्षांची माझी एक छोटी मैत्रीण आहे. ती आणि तिच्यापेक्षा पाच वर्षानी मोठी
तिची ताई दोघी एकत्रच शाळेत जातात. पण काहीवेळा ताईला आपले प्रश्न सोडवायला या
छोटीची ढाल करावी लागते. छोटी मात्र बिनधास्त आणि मुद्देसूद उत्तरे देऊन
समोरच्याला गारद करते. शाळेत किंवा रिक्षात कोणी ताईला त्रास देत असेल तर माझ्या ताईला
असे चालणार नाही म्हणून धमकावते. तार्किक दृष्ट्या अतिशय योग्य आणि हजरजबाबी बोलणे
असल्यामुळे तिच्याशी व्यवस्थितच बोलावे लागते. तिची माझी भेट झाली तेव्हापासून मी तिचा
हा गुण उचलायचा प्रयत्न करतेय. हो ,कुणाचाही चांगला गुण घ्यायला वयाची अट कशाला लागते?
त्याबाबतीत ती खरोखरच गुरु आहे म्हणायला हरकत नाही. जाता जाता आपल्या आजूबाजूच्या
माणसांमधे असणारे गुण बघून नकळत त्यांचे अनुकरण करत असतो. त्यावेळेपुरती ती
व्यक्ति गुरुच असते.
जन्माला आल्यानंतर काही काळ आपल्यासमोर
सर्वात मोठा आदर्श असतो. आपले अस्तित्व फक्त एकाच व्यक्तिभोवती निगडीत असते. ते
म्हणजे आई. आई जे काही करते ते मुलाच्या दृष्टीने पूर्ण सत्य असते. आणि तीच पूर्व
दिशा असते. नंतर थोड्याशा कळत्या नकळत्या वयात मोठी बहीण किंवा भाऊ हे आदर्श
असतात. मुलगे वडिलांचे आणि मुली आईचे अनुकरण करतात. त्यांच्याही नकळत. त्यांचे
वागणे हीच खरी वागण्या बोलण्याची रीत हा समज डोक्यात पक्का बसतो. त्याच दरम्यान
आयुष्यात खर्या अर्थाने गुरूचा किंवा शिक्षकाचा प्रवेश होतो आणि आपली अवस्था
गुरुविणा कोण दाखविल वाट अशी होऊन जाते. गुरुने काहीही संगितले की ती काळ्या
दगडावरची रेघ असते. अनुकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल हे योग्य की अयोग्य हे मात्र
ठरवायला, स्वत:च गुरु व्हावे लागते. यावेळी लहानपणापासून
आपल्यावर झालेले संस्कारच कामी येतात.
शाळा कॉलेजमध्ये मला चांगले गुरु मिळाले. त्यांच्यामुळे
मनावर सुसंस्कार झाले. वाचनाची गोडी लागण्याचे श्रेय तर पुर्णपणे वडिलांनाच जाते.
त्यांच्यामुळे घरात अनेक पुस्तके यायची , संग्रही असायची आणि मी त्याचा फडशा पडत असे. गाण्याचा गळा नसला तरी लहानपणापासून
वडिलांमुळे गाण्याचा कान तयार झाला. त्यांच्यामुळे मला तबल्याच्या क्षेत्रात
यावेसे वाटले. तबला शिकवताना कै. केशवराव धर्माधिकारी सरांनी विद्या कधीच हातची
राखली नाही. पं. विभव नागेशकरांमुळे तबल्याचा सराव कसा जीव तोडून करावा हे शिकायला
मिळाले. किंबहुना सराव म्हणजे काय याची थोडीशी झलक बघायला
मिळाली. गानयोगिनी पंडिता धोंडुताई कुलकर्णी यांच्याकडे मी गाण्याचे प्रत्यक्ष
शिक्षण घेतले नाही पण त्यांचे माझे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते.
त्यांच्या वारंवार भेटीत गुरुविषयीचा आदर नेहमीच त्यांच्या वागण्या बोलण्यातून
ओतप्रोत भरून वाहायचा. त्यांचे प्रेमळ आणि तितकेच गाण्याच्या बाबतीत कुठलाही
वावगेपणा खपवून न घेणारे, शेवटपर्यंत कार्यरत रहाणारे व्यक्तिमत्व
फारच विलोभनीय होते. सांताक्रुझच्या योगा इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा असणारे
ऋषितुल्य डॉक्टर जयदेव आणि श्रीमती हंसाजी यांनी तर माझा आयुष्याकडे पहाण्याचा
दृष्टिकोनच बदलून टाकला. सम्यक दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करणारा माझा नवरा, छोट्या गावातून येऊन स्वत:ला अत्यंत सुयोग्य रीतीने विकसित करणारी माझी
मैत्रीण या सगळया व्यक्तींनी माझे आयुष्य अतिशय समृद्ध केले. त्यांच्या कडून योग्य
ते गुण घ्यायचा मी प्रयत्न केला. अंगी किती बाणले, माहीत
नाही.
खरे
तर एकलव्याला गुरु द्रोणाचार्यानी प्रत्यक्ष शिक्षण दिलेच नव्हते. पण त्याने
गुरूचा पुतळा उभा करून स्वयंप्रेरित होऊन शिक्षण घेतले. मनोमन गुरु मानून स्वत:च
स्वत:ला शिकवले. गुरु विद्या देण्यासाठी, कला शिकवण्यासाठी कधी प्रत्यक्ष हजर असतो, नसतो. पण
आपण काय ,कसे घ्यायचे हे आपणच ठरवायचे. शेवटी आपणच आपला गुरु
आणि प्रकाश असतो. कारण हा गुरु आहे म्हणून सांगणारे मन आपलेच असते. त्याच्याकडून
योग्य ते शीक म्हणून आपणच आपल्या मनाला बजावायचे असते. मनासारखा दूसरा गुरु शोधून
तरी सापडेल काय?
..............सविता नाबर
No comments:
Post a Comment