Tuesday 7 March 2017

कावळा शिवला म्हणून...........

      

        हानपणी कावळा शिवला हे घरात खूप वेळा ऐकायला मिळत असे. जाणून घेण्याची उत्सुकता होती पण काही कळत नव्हते. पण काहीतरी घाण, तिरस्करणीय आहे असा काहीसा समज होता. कावळा शिवलेली स्त्री बाजूला बसत असे. तिला कुणीही शिवायचे नाही हा कटाक्ष होता. लहान मूल जर तिच्याकडे जाणार असेल तर त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून तिच्या हवाली केले जात असे. तिला देवदर्शन वर्ज्य असे. तिच्यासाठी चार दिवस जेवणाची वेगळी भांडी असत. हा सर्व काय प्रकार आहे हे कळायला लागले तरी त्यापाठीमागची तिला सर्व वर्ज्य असण्याची भावना का हे कळत नव्हते. वाचन वाढले आणि जेव्हा त्याच्या मुळाशी जाऊन विटाळशी ही काय संज्ञा आहे हे समजायला लागले तेव्हा जाणवले ते एवढेच की या गोष्टीत त्याज्य मानण्यासारखे काय आहे? मानव जातीला पुनरुत्पादनाचा जो हक्क मिळालेला आहे किंबहुना जे वरदान लाभलेले आहे, त्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे. त्यामध्ये स्त्री जातीचा दोष तर नाहीच. परंतु तिचा मासिक धर्म हा फक्त तिलाच नव्हे तर सगळ्या मानव वंशाला गौरवास्पद आहे. तो नसेल तर वंश सातत्य टिकणार कसे? मुलगी वयात आली की निसर्गाच्या सृजनाचा सोहळा मोठ्या समारंभपूर्वक काही ठिकाणी केला जातो. मग हा विरोधाभास कसा?
      काळानुरूप, परिस्थितीनुरूप बदलणार्‍या समाजाने स्त्रीचे बाहेर बसणे कमी केले. नोकरी करणारी, करियर करणारी स्त्री आज बाजूला बसणे शक्यच नसते. बाहेरच्या जगात वावरतांना स्त्रीचा विटाळ हा स्पृश्यास्पृश्यतेच्या पायावर गौण मानला जाऊ लागला. (पण अजूनही काही घरांमध्ये विटाळशी बसणे ही परंपरा आहे, त्या घरातील स्त्रियाच जाणोत तारेवरची कसरत !) तुम्ही नास्तिक असलात तर प्रश्नच नाही पण जर देव मानत असलात तर ज्या भगवंताने सर्व कार्यात कुशल अशी स्त्री ( आजची मल्टिटास्कर स्त्री उदा.पायलट,सर्जन,वकील ) निर्माण केली तिला काही काळापुरती तो घृणास्पद बनवेल का? तिला देवाचे दर्शन त्याज्य. परमेश्वराची पूजा निषिद्ध. देवीची पूजा पुरुषांनी केली तर चालते पण तिच्याच गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश नाही ! काही ठिकाणी विशिष्ट साडी नेसूनच गर्भगृहात स्त्रीला प्रवेश आहे. शक्तीरुपिणी अंबाबाई आपल्याच स्त्रीरूपाला गर्भागारात प्रवेश नाकारेल? ही मानवनिर्मित गुलामगिरी किती दिवस चालवून घ्यायची? विषय आहे सबरीमलाचा. जननक्षम वयातल्या महिलाना सबरीमलाच्या मंदिरात प्रवेश नाही. देवस्वम मंडळाच्या अध्यक्षांनी हा दावा केला की स्त्रीचा मासिक धर्म चालू आहे हे कळणारे मशीन जर निघाले तर त्यानुसार महिलाना सबरीमलाच्या मंदिरात प्रवेश नाकारला जाईल !!  यांना कोणी अधिकार दिला महिलाना प्रवेश नाकारण्याचा?
         निसर्गाचीच दोन रुपे असलेली स्त्री आणि पुरुष, यामध्ये पुरुषाला झुकते माप आणि स्त्रीला मात्र अवहेलना ! देव दर्शन त्याज्य. उलट मासिक धर्म चालू असलेल्या काळात तिला विश्रांतीची जरूरी असते, शारिरीक आणि मानसिकही ! पण याच काळात तिला कदाचित जास्त कष्ट पडत असतील तर ते कुटुंबियांच्या कानापर्यंत पोचत असतील किंवा नसतीलही. या सृजनसोहळ्यात शारीरिक यातना मग त्या मासिक धर्माच्या असोत,  गर्भारपणाच्या असोत किंवा बाळंतपणाच्या स्त्रीलाच भोगाव्या लागतात. आजच्या घडीला तरुण मुली मासिक पाळीच्या त्रासाबाबत तक्रार करण्याऐवजी त्या अभिमानाने स्त्रीत्वाचे happy to bleed हे ब्रीद मिरवत आहेत,.   
       मुळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा मिळाली. स्त्रिया शिकल्या आणि जनजागृती झाली. पहिल्यांदा सती पद्धत बंद झाली. स्त्रियांना अगदी कवडीमोल किंमत द्यायची ही जनरीत बंद झाली. विधवांचे केशवपन बंद झाले. दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. एका वाक्यात असणारे हे बदल झटक्यात झालेले नाहीत. किंवा एका रात्रीतही झालेले नाहीत. त्यासाठी बरेच झगडावे लागले. या लेखाने कितीजणांच्या मानसिकतेत फरक पडणार आहे माहीत नाही. पण बदल एका रात्रीत अपेक्षित नाहीच. सबरीमलाच्या या वादंगामुळे काही लोक विचार करायला जरी प्रवृत्त झाले तरी हेही नसे थोडके ! बुरसटलेल्या विचारांवरची धूळ झटकली गेली तरीसुद्धा खूप आहे.

                    .....................................सविता नाबर

No comments:

Post a Comment