Tuesday 7 March 2017

बाजार मातृत्वाचा

      

      लीकडच्या प्लॅटफॉर्मवरची रेल्वे सुरू झाली. गाडीने वेग घेतला आणि अम्मा, जाऊ नको. मला सोडून जाऊ नको.असे म्हणत ती पळायला लागली. ती साधारणपणे आठ वर्षाची होती. तिच्यापाठीमागून चार पाच वर्षांची मुलगी धावत होती. दक्षिण भारतातली ही गोष्ट. बंगळुरूहून आम्ही मद्रासला चाललो होतो. कुठल्यातरी एका छोट्याशा स्टेशनवर गाडी थांबली होती. समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक जोडपे बसले होते. त्यांना चार मुले दिसत होती. मोठी मुलगी असेल सात आठ वर्षांची, दुसरी पाच वर्षांची, तिसरी दोन तीन वर्षांची आणि चौथे मूल कडेवर. प्लॅटफॉर्मवर बसलेले ते कुटुंब गाडीची शिट्टी झाल्याबरोबर उभे राहिले. तरी मोठ्या दोन मुली खेळतच होत्या. बापाने तीन नंबरच्या मुलीला काखोटीला मारले. सगळ्यात धाकटे तर आईच्याच कडेवर होते. मुलींचे आजूबाजूला लक्ष नव्हते. आईवडील चालू लागले तरी त्या आपल्याच खेळात मग्न होत्या. ते जोडपे भराभर चालत अगदी धावतच गाडीबरोबर चालायला लागले. बघता बघता गाडीने वेग पकडायच्या आधी झपकन ते दोघे कधी गाडीत घुसले ते कळलेच नाही. मुलींचे आईबापाकडे लक्ष गेले आणि त्या रडत ,ओरडत धावत सुटल्या. त्यांची भाषा कळली नाही तरी अर्थ कळत होता. गाडीने स्टेशन केव्हाच सोडले होते. आमच्या समोरच्या बर्थवर एक उच्चपदस्थ निवृत्त पोलिस अधिकारी होते. माझ्या चेहर्‍यावरचा गोंधळ बघून ते म्हणाले, बर्‍याचवेळा असे होते. कधी मुले आईवडिलांना परत मिळतात तर कधी त्या मुलांना नीट सांगता आले नाही तर आश्रमात दाखल करावे लागते.  त्या गरीब आईबापानी मुलींना परिस्थितीवर सोपवले होते आणि आपले स्वत:चे आयुष्य जगायला मुलींना सोडून ते पुढे चालले होते. अशीही एक माता आणि दुसरीकडे आहे सरोगेट मदर.  वैद्यक शास्त्र आज इतके पुढे गेले आहे कि गर्भाशय सुद्धा भाड्याने देण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. पण त्याचा गैर फायदा घेतला जातोय. एकीकडे गरीब मुली पैशाकरता आपले गर्भाशय भाड्याने देतात. म्हणजे एक प्रकारे शरीर विकतात. मातृत्वाचा आनंद हा आनंद राहत नसून शरीर  पैसा मिळवण्याचे एक यंत्र होऊन जाते . अपत्यहीन जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख देताना या तरुण स्त्रिया यंत्रवत होऊन जातात. नऊ  महिने ज्या स्त्रीने आपल्या हाडीमासी एक जीव वाढवलेला असतो, ज्याच्याशी मनाची, भावनेची गुंतवणूक झालेली असते तो बंध इतक्या सहजा सहजी कसा तोडता येतो? निव्वळ पैशासाठी?
        परदेशी जोडपी, श्रीमंत जोडपी ,ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, ज्यांना गर्भधारणा,प्रसूती झेपत नाही, कष्ट सोसण्याची तयारी नाही, अशा जोडप्यांना सरोगेट मदर हा पर्याय उपलब्ध आहे. सरोगसी या तंत्रज्ञानामुळे मूल न होणार्‍यांना स्वत:चे मूल मिळते, आणि संबंधित गरीब महिलाना पैसा मिळतो. असे जरी असले तरी त्याला आता बाजारी रूप प्राप्त झालय. गुजरातमध्ये तर कित्येक महिलांनी गर्भाशय भाडोत्री देणे हे एक उत्पन्नाचे साधन केले आहे. या स्त्रिया ज्या तुलनेत स्वत:च्या शरीराचे, तब्बेतीचे मोल देतात, त्या मानाने त्यांना मिळणारे मूल्य अत्यल्प असते. पैसा मिळतोय, आणि कुटुंब पोसायचे म्हणून स्त्रिया गर्भाशय भाड्याने देत आहेत.
      एकाच मातेची वेगवेगळी रुपे. एकीकडे मातृत्वाला आसुसलेली स्त्री, गर्भाशय भाड्याने घेऊन मुलाचे पालकत्व घेते. तर एखादी माता मुलांना पोसणे शक्य नाही म्हणून शरीर विक्रीचा व्यवसाय करून वाढवते. तिला सुरक्षित कवचात ठेवते. एकुणातच परिस्थिती कशीही आली तरी स्त्रीत्वच पणाला लागते. कधी आईवर मुलांना वाढवायची जबाबदारी म्हणून. तर कधी कुटुंब पोसायला मातृत्वाचे दान द्यावे लागते.बाळा होऊ कशी उतराई म्हणणारी आई आपल्या पिलाना खाऊ पिऊ घालण्यासाठी नवीन अर्भकाचे यंत्र होऊ पहाते. एवढे करून सरोगेट मदर आपले नाव आई म्हणून आपल्या अपत्याला देऊ शकत नाही. बाळाच्या जन्म दाखल्यावर जन्मदात्री आई आपले नाव टाकू शकत नाही. अर्थातच त्या मायेच्या पाशात तिला अडकायचेच नसते. पण मातृत्वाचा व्यवसाय मात्र करायचा असतो
               ....................................सविता नाबर

No comments:

Post a Comment