Tuesday, 7 March 2017

रूप पाहता लोचनी…..

          

         माझ्या लहानपणी वडिलांच्या एका स्नेह्यांकडे आम्ही नेहमी जात असू. त्या स्नेह्यांचे वडील नेत्रहीन होते. पण त्यांची आम्हा दोघा भावंडावर खूप माया होती. ते नेहमी आपुलकीने काही प्रश्न विचारत, जेवलास का रे? तुझा बुशकोट नीळा आहे का? पाऊस पडतोय का? याच उत्तर आमचे अडीच वर्षांचे बंधूराज नुसती मान हलवूनच  देत असत. त्याला पूर्ण  बोलता येत नव्हत. माझे आई वडील त्याला सांगायचे ,नानाना दिसत नाही. त्यांना तोंडान सांग. माझही वय या गोष्टीच  आकलन होण्यापलीकडच होत. त्या आपुलकीन विचारणार्‍या आजोबांना आम्ही त्यांच्याशी काही बोललो तर खूप आनंद व्हायचा. त्यांचं दृष्टीसुख ते आमच्याशी बोलून मिळवायला बघत होते. पण आज जाणवतय. निसर्गान केलेली रंगांची उधळण पाहायला आपले डोळे धडधाकट आहेत हे केवढं भाग्य आहे! समोरच्या माणसाचा धूर्तपणा , नजरेतल प्रेम, माया, तुच्छता , राग ,लोभ  या भावना डोळ्यांनीच तर कळतात.
       रोज सकाळी जेव्हा आम्ही शिवाजी विद्यापीठात फिरायला जातो , तेव्हा कधी पावसाचे स्वागत करताना मोराने आनंदाने फुलवलेला पिसारा बघून मन हरखून जाते. लहान थोर सगळेच, काही वेळ थांबून तो मोराच्या पिसार्‍याचा, मानेचा अवर्णनीय नीळा रंग पहात रहातात. त्याच नृत्य बघुन डोळ्याच पारणं फिटत. उन्हाळ्यातला पिवळा जर्द बहावा, लालभडक गुलमोहर,पळस ,पांगारा, जांभळ्या रंगाने बहरलेला ताम्हण , पावसाच्या थोड्याशा शिडकाव्याने हिरवीगार झालेली धरित्री ,त्या हिरव्या रंगाच्याही अनेक छटा. निसर्गाची किमया पाहताना डोळे दिपून जातात. रंगबिरंगी फुलझाड आणि फळझाडा बरोबर विविध रंगी आणि विविध ढंगी पशुपक्ष्यांची दुनिया आपण पाहू शकतो. जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट सहज उपलब्ध असते तेव्हा आपल्याला त्याची किम्मत कळत नाही. रस्त्याने जाता जाता क्षणभर डोळे मिटून पहा. निव्वळ चांगलं पहाणं ही एकमेव त्रुटि नाही तर दैनंदिन व्यवहारात करावी लागणारी नित्यकर्म कसे करत असतील हे लोक? मनश्री सोमण या सर्व त्रुटींवर मात करून बालवीर हा किताब मिळवते तेव्हा तिच्या परिश्रमाना दाद द्यावीशी वाटते. हेलन केलरसारखी अंध,मुक बधीर स्त्री स्वत:च्या न्यूनावर मात करून तिच्यासारख्यांना अनेक सुविधा देऊ पाहते. समाजाची सेवा करते आणि बहुप्रसवा लेखिका होते.  ज्यांना दृष्टीसुख मिळू शकेल अशा लोकांना जर आपण दृष्टीदान केल तर.........
     परवाच नेत्रदान दिन झाला. आजच्या या आधुनिक जगात समाजाचा होरा वेगानं बदलतोय. बदलत्या युगात संगणक हा शब्द आज परवलीचा झाला आहे. संगणकासाठी कधीकधी दोन नाही तर चार नेत्रांची गरज पडतेय. आपल्या पश्चात आपले दोन डोळे दोन व्यक्तींना दृष्टीदान देऊ शकतात. संकल्प अनेक लोक करतात. पण संकल्प आणि प्रत्यक्ष नेत्रदान यामध्ये बरेच अंतर आहे. अस म्हणतात की मृत्यूनंतर शरीराची जेव्हा राख बनते तेव्हा डोळेही त्यामध्ये भस्मसात होतात. मग हाच अत्यंत उपयोगी अवयव बेचिराख होण्यापेक्षा दुसर्‍या कुणाच्या सत्कारणी लागला तर! तेही एकाच वेळी तुम्ही दोन व्यक्तींना डोळे देऊन उपयोगी पडू शकता. तुमच्या डोळ्यांना आणखी काही वर्ष जीवदान मिळत आणि दृष्टी रुपानं सृष्टीच रूप पाहायला सज्ज होऊ शकता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मृत व्यक्तीचे डोळे ,नेत्रहीन व्यक्तिला बसवण्यासाठी चोवीस तासच नाही तर चार दिवसांपर्यंतच्या मुदतीत ते बसवू शकतात. आज अत्याळ सारखं छोट गाव नेत्रदानामधे सर्वात पुढे आहे. किती सुसंस्कृत, पुढारलेले आहेत त्या गावाचे लोक अस म्हणावस वाटत.
     मला एक गोष्ट आठवते. रेल्वेतून  बाबाबरोबर एका कॉलेज युवक जात असतो . तो सारख्या टाळ्या वाजवत असतो, बाबा झाड किती जोरात पळताहेत, विजेचे खांब तरी किती आहेत. सुंदर सुंदर फूलही आहेत. समोरचा माणूस आश्चर्यान पहात असतो ,त्या युवकाच्या वयाशी त्याच वागण विसंगत वाटल्यान काही वेळानं न राहवून तो विचारतो, तुमचा मुलगा असा काय बोलतोय? त्याचे बाबा त्या माणसाकडे पाहतात आणि हलकेच हसून म्हणतात , अहो तो हे सगळं प्रथमच पाहतोय ना! नुकतच त्याला दिसायला लागलाय ना ! समोरच्या  माणसाच्या डोळ्यांसमोर फक्त धूसर पडदा उभा राहातो.      
               .........................सविता नाबर    

No comments:

Post a Comment