एक
गोड लहान मुलगी, तिच्या
हातात दोन सफरचंद. ती छोटी आईने सफरचंद मागितल्यावर एकाचा घास घेते मग दुसर्याचाही
तुकडा तोडते . आईला वाटते,
हिला किती शिकवले तरी शेयरिंग करण्याची वृत्ती काही दिसत नाही. तिला वाईट वाटते.
क्षणात तिला वाटून जाते. हिला आईलाही काही देववत नाही तर ती दुसर्यांना काय देणार? पण ती जेव्हा हे सफरचंद गोड
आहे, ते तू घे असे म्हणते तेव्हा
आपण उगाच अनाठायी नकारात्मक भावना मनात आणली म्हणून तिला अपराधी वाटते. घाईने
एखाद्या विषयी निर्णय घेणे तोही नकारात्मक, किती
चुकीचे असते!
वर्गात शिकवताना एक प्राध्यापक हातात अर्धा
भरलेला पाण्याचा ग्लास घेऊन काही विचारणार असतात. विद्यार्थ्यांचा अंदाज असतो की
ते अर्धा पेला भरलेला की अर्धा रिकामा हे विचारणार. प्राध्यापक गुगली टाकतात. विद्यार्थ्यांची
अटकळ चुकते. प्राध्यापक विचारतात पाण्याचा हा ग्लास किती जड असावा? प्रत्येकजण वेगवेगळा अंदाज
बांधतो. प्राध्यापक एका विद्यार्थ्याला तो हातात धरायला सांगतात. पहिली पाच मिनिटे
तो पेला व्यवस्थित धरतो. थोड्या वेळाने तो विद्यार्थी चूळबुळ करायला लागतो. अर्ध्या
तासाने त्याचा हात अवघडून जातो. प्राध्यापक सांगतात , आपल्या दैनंदिन समस्यांचेही
असेच असते. पाण्याचे वजन फारसे नाही तसेच समस्या सुद्धा प्रत्येकवेळी फारशा गंभीर
असतात असे नाही. पण जितके जास्त वेळ तुम्ही पाण्याचा ग्लास पेलाल, तितका हाताला त्रास.तसेच तुम्ही
थोडा वेळ समस्ये बद्दल विचार केलात तर ठीक. पण त्याच प्रश्नाच्या विचारात दिवसभर गुरफटलात
तर त्या प्रश्नाचे ओझे तुम्हाला भलतीकडेच घेऊन जाईल. मनावरचे दडपण मात्र त्याच्या ओझ्याने
वाढेल. बाहेरचे वातावरण नकारात्मक असेल,
प्रतिकूल परिस्थितीच वाट्याला येत असेल तर सकारात्मकतेची जास्त गरज असते.
दोन जमिनीवर पडलेल्या बिया. एक बी विचार करते
, मी जमिनीत खोलवर जाईन , रूजेन आणि माझ्या कोंबातून
येणार्या पानांना दवाबिंदूचे प्राशन करता येईल. सकाळच्या सूर्यकिरणांच्या उबेत
माझ्या पाकळ्या हर्षोत्फुल्ल होतील. माझे जीवन समृद्ध होईल. तेच दुसरी बी ठरवते, मी खोलवर जमिनीत गेले तर
अंधारात किडेमकोडे मला खाऊन टाकतील. माझी पाने फुले बाहेर आल्यानंतर लहान मुले ती
खुडुन टाकतील. थोडा सुरक्षिततेचा काळ येईपर्यंत वाट पाहायला हवी. वाट पहाणारी बी न
रुजता तशीच पडून राहाते . कोंबडी दाणे टिपताना तिला खाऊन टाकते. रुजण्याचा
सकारात्मक विचार आपल्यालाही आयुष्यात काहीतरी मिळवून देतो. सकारात्मकतेचे दुसरे
नाव आशा. हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण आहे. पण सकारात्मकता असेल तर भविष्यात नक्कीच
चांगले फळ मिळते.
अरुणिमा
सिन्हाचही असच झालं. तिच्या गळ्यातली सोन साखळी मिळाली नाही म्हणून चार पाच
गुंडांनी तिला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिले. आणि बाजूच्या ट्रॅकवर ती पडली.
तिच्या पायावरून सात ट्रेन्स धडधडत गेल्या. वयाच्या 23व्या वर्षी अरुणिमा अपंग
झाली. एक पाय निकामी झाला. तरी ती स्वस्थ बसली नाही. मुळातच खेळाडू असलेली अरुणिमा
त्या घटनेनंतर दोन वर्षात माऊंट एव्हरेस्ट सर करून आली. केवळ सकारात्मक मनोवृत्ती
आणि दुर्दम्य आशावाद यांच्या जोरावर, पद्मश्रीची
धनिण झाली. पण तिचा हा इतका कठीण प्रवास सुखासुखी तर झाला नाही. तिला परानुभूती तर
सोडाच पण सहानुभूतीही सुरूवातीला मिळाली नाही. पण कठीण परिस्थितीही सकारात्मक
रीतीने तिने वळवली.
प्रसिद्ध लेखक ओ हेन्रीची द लास्ट लीफ ही कथा
तर सगळ्यांनाच माहीत असेल. निराश मनाने आपल्या जीवनाचा संबंध एका वेलीच्या पानाशी
लावलेला असतो. पानाच्या गळून पडण्याने येणारा मृत्यू. निर्जीव पानाचे एक पेंटिंग न्यूमोनिया
झालेल्या मरणासन्न मुलीला जगण्याचे अतुल्य बळ मिळवून देते. त्या निर्जीव पानात जीव
ओतते ती मनाची उभारी. ते एक केवळ चित्र नसून मनाच्या सकारात्मकतेची खूण असते. निराशा
झटकणारा आशावाद असतो. हा आशावादच माणसाला पुढे जाण्याची, प्रगति करण्याची दिशा देत
आला आहे , शतकानुशतके
प्रत्येक संस्कृतीमध्ये !
...........................सविता नाबर
No comments:
Post a Comment