Tuesday, 7 March 2017

जावे पुस्तकांच्या गावा !!

    

                    

         मीनू ,आधी कपडे धुऊन घे, नाश्ता झाला का?, आता स्वैपाकाच्या तयारीला लाग.आता भांडी धुवून घेऊ. लवकर आटप मीनू, किती उशीर करतेस?अशी वाक्य सारखी कानावर पडत होती. आणि हळूच बाहेर डोकावणारी छोटीशी मीनू ,तिच्याकडून आई इतकी काम कशी करून घेते म्हणून रागावून लेखिका मीनूच्या आईला दम भरायला गेली. पहाते तो काय ,मीनूचा भातुकलीचा खेळ चालला होता आणि तिची आई तिला खोट्या खोट्या सुचना देत होती ,ते बघून त्याच पावली लेखिका मागे फिरली. ही गोष्ट  कुठेतरी लहानपणी वाचली होती. पण ती अजूनही चांगली स्मरणात आहे. वाचन असच आपल्या स्मृतीत ठसा उमटवत असते. अशी कित्येक पुस्तक आठवतात,अजूनही ताजी, आताच वाचल्या सारखी. हे त्या लेखकांच कौशल्य आहेच आणि वाचणारयाची  दादही आहे.
        पुस्तक दिन म्हणजे ग्रंथप्रेमीसाठी व्हलेन्टाइन्स डे च . मुळात पुस्तक हा विषयच खूप विस्ताराचा आणि गहन.लहानपणी भेट म्हणून मिळालेली सगळ्यात किमती वस्तू म्हणजे पुस्तक .एखाद्याच जीवन पूर्णपणे बदलण्याच सामर्थ्य पुस्तकात असत. बालपणी, सुमती पायगावकारांनी अनुवादित केलेल्या हेन्स अंडरसनच्या परीकथा,सिंदबादच्या सात सफरी, अकबर-बिरबलच्या कथा, १०१ गोष्टी,जादूचे अमुक,जादूचे तमुक, चांदोबा, भा.रा. भागवतांचा फास्टर फेणे, ताम्हनकरांचा गोट्यां अशा पुस्तकातून दुनियेची  सैर व्हायची. त्यावेळची भावनिक भूक भागवली जायची ,पुढच्या आयुष्याची बीज या वाचनातच दडलेली असतात. अवकाशात सैर करायला रॉकेट लागत नाही की समुद्राच्या तळाशी जायला पाणबुडी लागत नाही. आवश्यक असत एक पुस्तक.एकां जगातून दुसऱ्या जगात सहज प्रवेश मिळवून देणार. शास्त्राच्या राज्यात मुलाना रमवणार .पृथ्वीतलावर कुठेही सहज संचार घडवून आणणार .याच्यातूनच मनाची आवड ,कल,विकसित होतात. पुस्तक आपल्या बरोबर हसायला,रडायला, विचार करायला शिकवतात. एक पुस्तक, मित्राच्या गप्पांमध्ये गुंगवणार नाही इतक गुंगवून ठेवत.
        शामच्या आईच्या निमित्तान चांगल कस वागाव याचे संस्कार मनावर आपोआपच झाले.. स्वामी, राऊ , शहेनशहा, छावा , मंत्रावेगळा ,झुंज, झेप या कादंबर्यांनी पूर्ण इतिहास कळला नसला तरी ऐतिहासिक व्यक्तिरेखा कळल्या. परीक्षेच्या वेळीही अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तक घालून वाचलेली आठवतात .श्रीकांत सिनकर, व.कृ .जोशी ,यांच्या वास्तववादी रहस्यकथांनी तर वेड लावलं. मला आठवतंय, नववीत असताना तुम्हाला आवडलेलं पुस्तक हा निबंध लिहायचा होता. मी आनंदी गोपाळ कादंबरी नुकतीच वाचली होती. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी शिक्षण घेण्यासाठी उपसलेले कष्ट त्या वयात जाणवले नसले तरी मनाला स्पर्शून गेले होते. पेपरमध्ये त्या पुस्तकावर लिहिल्यावर आईला मोठ्या अभिमानान सांगितल्याच आठवतंय ,मी हे पुस्तक वाचल होत म्हणून त्यावर लिहू शकले. कुणी खाऊसाठी पैसे दिले की त्यातून कुठल पुस्तक घ्यायचं याच आधीच प्लानिंग व्हायचं. बक्षीस म्हणूनही  पुस्तकच मिळायचं.
     तरुण वयात कथा कादंबरी हे प्रकार होतेच त्याव्यतिरिक्त चरित्र, आत्मचरित्र वाचायची सवय लागली.जयवंत दळवी, विजय तेंडूलकर ,मतकरी,दारव्हेकारांची नाटक झाली.श्री ना पेंडसे,व्यंकटेश माडगुळकर,गदिमा,झाले, सिंहासनच्या निमित्तान अरुण साधू वाचले.  वि. स, वाळिंबे, वि.ग. कानिटकरांची पुस्तक , चार्ली चेप्लीनच आत्मचरित्र,मेंक्सिम गॉर्की यांच आई , यामुळे भारताबाहेरच विश्व उलगडल गेल. लक्ष्मीबाईं टिळकांच स्मृतिचित्रे हे मराठीतील पहिलं स्त्री आत्मचरित्र. शुद्ध, प्रामाणिक, सत्यान्वेषी अस आहे. हमोंच बालकांड झाल. त्याबरोबरच हंसा वाडकरांच सांगत्ये ऐका, लीला चिटणीस , दुर्गाबाई खोटे,गणपतराव बोडस , गोविंदराव टेंबे, नटवर्य मामा पेंडसे यांच्या आत्मचरित्रावरून  त्यावेळचा सिनेमा , संगीत, रंगभूमीविषयी कळाल .रघुनाथाच्या बखरीवरून समाज प्रबोधन म्हणजे काय,र.धों. कर्व्याना त्यासाठी काय कष्ट पडले ,जे अजूनही समाजाच्या पचनी पडत नाहीत, हे समजल. व्ही. शांताराम यांच्या शांतारामावरून अख्या चित्रपट सृष्टीचा इतिहास कळला.
    ही झाली मराठी पुस्तकांची मांदियाळी .इंग्रजी, हिंदी पुस्तकांविषयी, कवितांविषयी पुन्हा कधीतरी. परवाच्या पुस्तक दिनाच्या निमित्तान ,वाचलेल्या काही पुस्तकाना उजाळा मिळाला. त्यातले संदर्भ कधी असे उपयोगी पडतात हे लेखनाच्या वेळी, भाषणात, गप्पा मारताना कळत. प्रसंगी मित्र, मैत्रीण नसली की संगत सोबत चांगली करतात. अनंत हस्ते ग्रंथकाराने देता, किती घेशील दो कराने !! अशी गत होऊन जाते.     

                  -----------------------सविता नाबर  

2 comments: