Tuesday 7 March 2017

नकोत नुसत्या भिंती

     

       प्रसंग एक : सोशल नेटवर्किंग साईटवर एक क्लिप पाहिली. दोन मित्र आणि त्यांच्या बायका एकाच्या घरी जमलेत.छान पार्टी चालली आहे.इतक्यात त्यांची सात आठ  वर्षाची मुल तिथ येतात.त्यातल्या एकाचा मुलगा दुसऱ्याची मुलगी आहे. ती दोघ मुल नवराबायको व्हायचं म्हणतात.मुलांचे आई वडील चेष्टेवारी नेतात.पण मी पापासारख ऑफिसला जाणार ,पैसे कमावणार म्हटल्यावर आईवडील कौतूकान हसतात. आणि मी तिला मारणार. अस मुलाने म्हटल्यावर त्याचे आईवडील खजील होतात. तेवढ्यात ती मुलगीही म्हणते .मी त्याच्यासाठी जेवण घेउन येईन आणि तू ताट फेकून दे. मुलीचे आईवडील शरमेन मान खाली घालतात. हाच आदर्श मुलांसमोर ! मोठ्यांचा आदर्श मुल डोळ्यांसमोर ठेवतात आणि नकळतपणे तीच त्यांची जीवनमूल्य होतात. काल्पनिक फिल्म असली तरी सत्यात हे घडतंय. मुलांसमोर आदर्श रहाण्यासाठी पालकांनी आपल वागण डोळस ठेवलं तर?
  प्रसंग दोन: विवाहेच्छुक मुलगा आणि मुलगी एकमेकांना पहाण्याचा कार्यक्रम चालला आहे. दोघांच करियर,आवडी, मिळकत अस करता करता गाडी एकत्र कुटुंब की स्वतंत्र राहायचं यावर घसरते. क्षणार्धात नवरी मुलगी विचारते , तुमच्याकडे डस्टबीन्स किती आहेत? (पक्षी: वयस्क माणस) एकेकाळी दूरची आत्या, मावशी, मामा ,काका याना सामावून घेणार कुटुंब आज आई वडील आणि मुलगा सून एका घरात रहात असले तरी त्याला एकत्र कुटुंब म्हणतात.ते एकत्र कस म्हणाव? एकच कुटुंब नाही का? तरुण पिढीने थोडस मागे जाऊन ,वयस्क पिढीने जरास पुढे येऊन समन्वय नाही का साधता येणार?
प्रसंग तीन: निकिताला गुड्डीला पाळणाघरात ठेवायचय. सकाळची धावपळ आवरून ,मनावर दगड ठेवून तिला नोकरीसाठी बाहेर पडण भाग आहे.त्याक्षणी तिला फक्त ओफिसाच काम दिसत असत. गुड्डीचे होणारे हाल ती दृष्टीआड करते. तिच्या सासु बाईना नातीसाठी तिच्याकडे यायला आवडल असत. पण जागेची अडचण. स्वत:ची छोटी का होइना जागा असल्याशिवाय लग्न करायचं नाही या अटीवर तर दोघांनी लग्न लांबवलेल असत. आता गुड्डीला सांभाळायच तर कुणी आणि कस? सासू सासऱ्यांच्या दोन बेड रूम्सच्या जागेतही निकिताची रहायची तयारी नाही. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांना समजून घेतलं तर?
  वसुधैव कुटुंबकम .हे विश्वाची माझे घर अस झालय खरं. सगळ जग एक ग्लोबल व्हिलेज झालंय. व्हर्चुअल गोष्टींमुळे प्रत्यक्ष गोष्टी कमी झाल्या आहेत.म्हणूनच भावा भावातल प्रत्यक्ष संभाषण कमी होऊन फोन किंवा व्होट्सएपमुळे एकमेकांना समजण कमी झालंय. चेहर्यावरचे भाव , आपलेपणा, हातात हात घेऊन मी आहे ना तुझ्या बरोबर हा दिलासा कमी झालाय. खरतर कुटुंबाचा आकार लहान झाल्यामुळे नातीच कमी झालीत. परंतु माणसा माणसातले परस्पर संबंध कसे आहेत हे ज्याच त्यांनच ठरवाव. आज जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याची वेळ आली आहे. सोशल नेटवर्किंगमुळे जग खूप जवळ आलय.पण तितकीच माणसा माणसातली दरी वाढत चालली आहे.प्रत्येक माणूस हे एक बेट झालय.नातेसंबंधांची हिरवळ कमी झालीय.प्रत्यक्ष भेटीमधला ओलावा कमी झालाय. ज्याला त्याला आपापले व्याप असल्याने मुद्दाम वेळ काढून भेटाव,कोणाकडे घरी भेटायला जाव हे कमी झालय. कर्तव्यावर कुटुंब उभ न रहाता विश्वास आणि प्रेमावर त्याची उभारणी असावी.
    कुटुंबासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. कुणा एकाने  त्यागमूर्ती होऊन चालणार नाही. नव्या जुन्या विचारांचा , तंत्रज्ञानाचा ,वातावरणाचा समन्वय साधला पाहिजे. प्रत्येकाचे कष्ट, प्रेम, परिस्थिती समजून घेण्याची क्षमता यांचा समतोल साधला पाहिजे. घर असावे घरा सारखे, नको नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाळा, नको नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

                              ------------------------सविता नाबर

No comments:

Post a Comment