एक आठ वर्षाची मुलगी. तिच्या
मैत्रिणीबरोबर लपंडाव खेळण्यात रमलेली असते. इतक्यात तिचे वडील बाहेरून येतात. तिला
हाताला धरूनच घरात शिरतात.आणि तिच्या आईला म्हणतात , गौराला घिऊन जाउया
सौन्दत्तीला. आई दिग्मूढ. डोळ्यात पाणी,पोटात कालवाकालव. गौराला पोटाशी धरून किती
मुके घेतले तरी आईच समाधान नाही. हो का नाही या दोन विरुद्ध भावनांमध्ये दोलायमान
मन:स्थिती. तिच्या पाठची भावंड आईच्या आजूबाजूला. त्याना बिचार्यांना कसलीच तमा
नाही.गौराला तरी कुठ कळतंय ! पण कुठतरी बाहेर ,गावाला जायचं म्हणून गौरा
खुशीत.पिशवीत गौराचे दोनचार कपडे कोंबून तिला घेऊन आईवडील सौन्दत्तीला जातात.
रीतीप्रमाणे ते तिचा विवाह देवाशी(देवीशी) करून देतात.गौराची नजर चुकवून आई परत
घराकडे निघते. लेकीच्या प्रेमाच्या बेड्या
पायात अडकायला नको म्हणून .घरात प्लेगाच्या साथीन थैमान मांडलेल असत .त्यावर उतारा
म्हणून थोरली लेक देवीला सोडायची असा पण गौराच्या वडिलांनी केलेला असतो . आठ वर्षाची
मुलगी एकटी या उघड्या जगात,वाऱ्यावर सोडून द्यायची? कल्पना तरी करवते का, ती कशी
राहील याची ? पण हे सत्य आहे .
ऐंशी वर्षांच्या घरातली ही गौरा, आज एक
खंबीर स्त्री गौराबाई सलवादे म्हणून उभी आहे. देवदासी निर्मुलन चळवळीची एक
आधारस्तंभ म्हणून ! प्रसंगी या खंबीर आधारावर अनेक वार झाले. ते मोठ्या शिताफीने
तिने परतवून लावले.जगात काय घडतंय याची
जरासुद्धा जाणीव नसताना निरक्षर गौराबाईनी ,दूरदर्शीपणाने, आपल्या मुलीला,
सुरेखाला स्वत:पासून लांब ठेऊन शिकवलं, नोकरी करायला लावली. योग्य वय येताच तिला
चांगल स्थळ बघून तिचे हात पिवळे केले. देवदासी जगताची छायाही मुलीवर पडू दिली
नाही. तिची तरणीताठी मुलगी लोकांच्या नजरेतून सुटणार कशी? तिला शिक्षण द्यायचीही
चोरी होती.प्रसंगी तिला मारहाणही झाली. मुलीलां शिकवून काय मिळणार आहे? त्यापेक्षा
तुझी गादी चालवेल ,देखणी आहे. उलट तिला शिकवलस तर देवीचा कोप होईल.लोकांच्या अशा
रेट्यापुढे ती शरण गेली नाही. आज तिची नात डॉ. योजना मुनीव एम.ए.स्सी .पी .एच.डी
आहे. कॉलेजमधे अध्यापन करते.गौराबाईंची चारही नातवंड पदव्युत्तर शिक्षण घेऊन
चांगल्या नोकरीत आहेत. त्यांचा नातजावई सुद्धा एम.ए.स्सी .पी .एच.डी आहे.
देवादासीच्या जगात खाण्यापिण्याची
भ्रांत. आला दिवस कसातरी ढकलायचा, अवहेलनाच फक्त वाट्याला.दिवस रात्र फक्त देवीची
म्हणजे तिच्या भक्तांचीच सेवा. अशा वातावरणात राहून गौराबाईनी आपला वेगळा रंग
जोपासला. लौकिकार्थान यश मिळवण्यापेक्षा मानवतेच काम त्यांनी केल.लांबून
मार्गदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष आगीत होरपळणाऱ्या स्त्रीन स्वत: भाजून घेऊन
आपली अर्भक वाचवली.स्वत:चा आदर्श देवदासीना घालुन दिला. आता देवाला मुली सोडण्याच
प्रमाण अगदीच नगण्य झालय, हा गौराबाईनी परिस्थितीवर मिळवलेला विजयच आहे.
प्रसंग होता प्रा.विठ्ठल बन्ने यांच्या
सत्कार समारंभाचा. यावेळी गौराबाई आणि त्यांची डॉकटर नात योजना यांचाही उचित
सत्कार झाला. यावेळी अनेक देवदासी आल्या होत्या.,देवदासी निर्मुलनासाठी अथक
प्रयत्न करणारे चळवळीचे प्रणेते, बन्ने सर, यांच मी शब्दांकित केलेलं आत्मचरित्रही
त्यावेळी प्रकाशित करण्यात आल. आय ए एस अधिकारी लीना मेहेंदळे यांच्या हस्ते ,एका
योग्य व्यक्तीच्या हस्ते उदघाटन झाल, सरांच पुस्तक लिहिताना देवदासींच्या दारुण
परिस्थितीची कल्पना आली. देवदासी प्रथा नाहीशी करण एकवेळ सोप पण ज्या देवदासी
झाल्या आहेत त्यांच्या पुनर्वसनाच काय हा मोठा प्रश्न आहे. लीना मेहेंदळे यांच्या
सारख्या सक्षम प्रशासकीय अधिकारी मात्र देवदासीसाठी नक्कीच मोलाच काम करून जातात. देवदासीना
रंग ओळखायला शिकवण्यापासून ते सायकल शिकवणे,लोकरकाम ,शिलाई ,अशा अनेक जीवनावश्यक
कला त्यांनी शिकायला लावल्या.देवदासी साठी प्रशिक्षण केंद्र उभ केल. जेणेकरून
त्याना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल. सरांच्या या चळवळीन आता इतक चांगल रूप घेतलय
की देवदासी प्रथा जवळ जवळ समूळ नाहीशी झाली आहे. या त्यांच्या कार्यात गौराबाइंचांही
सक्रीय सहभाग होताच. म्हणूनच गौराबाईंचा उल्लेख डॉटर्स ऑफ महाराष्ट्र मधे मोठ्या
गौरवाने केला आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हे जगाला त्यांनी दाखवून
दिलय.
-------------सविता
नाबर
No comments:
Post a Comment