Monday, 6 March 2017

सावधान, मोबाइल इज ऑन !!

    

        

        क व्यावसायिक कारमधून चालला आहे. एका हाताने तो कार चालवतोय. दुसर्‍या हाताने मोबाइल कानाशी पकडून बोलतोय. “हो, मला सारखा सारखा फोन करू नका. मी थोड्याच वेळात पोचतोय.” एवढे बोलून तो मोबाइल शेजारच्या सीटवर टाकतो. पुन्हा मोबाइल वाजतो. थोडा वेळ तो बघत रहातो. पण शेवटी उचलतो. तो उचलायला आणि इतक्यात समोरून मोटार बाईकवरून एक तरुण येतो. मोबाइल उचलण्याच्या नादात त्याचा क्षणभर गाडीवरचा ताबा जातो. परिणाम तुमच्या लक्षात आलाच असेल. हेलमेट घातलेला तरुण रस्त्याच्या दुभाजकावर आपटतो. गाडी चालवणारा काही सेकंद विचार करतो पण त्याच्याही नकळत तो भरकन पुढे निघून जातो आणि येतो तो त्याच्या नेहमीच्या गॅरेजमध्ये. घाबरलेला. घाम फुटलेला. गॅरेजवाला म्हणतो, तुम्ही सगळे माझ्यावर सोपवा. गाडीचा नंबर कुणी टिपला असला तरी तुमची गाडी माझ्या गॅरेजमध्येच होती असे सांगा. बाकी काही तुम्ही बोलूच नका. मी बघतो काय करायचे ते. आपली चूक झालेली आहे हे त्या गाडी चालवणार्‍याला मान्य असते. काय करावे या संभ्रमात पडलेला तो, शेवटी गॅरेजवाला जे काय म्हणतोय त्याला तयार होतो. घरी येतो तर पोलिस इमारतीच्या खालीच त्याला अडवतात. अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण याच व्यक्तीने केलेल्या अपघाताचे असते. तो काही बोलणार, मी तिथे नव्हतोच हे सांगण्याच्या तयारीत असलेल्या त्याला पोलिस एक मोबाइल हातात देतात. पोलीसाना मिळालेला मोबाइलवर डायल केलेला शेवटचा नंबर त्याचाच असतो. त्याच्या मोबाईलवर एक मिस्ड कॉल असतो तो रेकोर्डेड असतो. “मित्राची बाइक टेस्ट करत होतो. अक्सीडेंट ...... अक्सीडेंट ,कॉल मी बॅक डॅड!” या मोबाइलवरून तुम्हाला शेवटचा कॉल होता म्हणून तुमच्यापर्यंत आलो असे म्हणणारे पोलिस त्याला जेव्हा सांगतात , तासाभरापूर्वी गेला तो. “ तो माझाच मुलगा होता.” म्हणत तो मटकन खालीच बसतो,
    तुमचा आप्त, जवळचा माणूस असा अपघातात सापडला तर चालेल? सुरुवात स्वत:पासून करा. प्रत्येकवेळी आपण एक जबाबदार व्यक्ति आहात हे जाणून पाऊल टाका. वेगाची धुंदी मनावर स्वार झालेली असते. तुमच्या घरी तुमचे आईवडील, बायको, मुले, बहिण भाऊ वाट बघताहेत हे लक्षात असू द्या. तंत्रज्ञान तरुणाईच्या हातातले खेळणे झाले आहे. जगभरात होणार्‍या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणारे तरुण जास्तीत जास्त 15 ते 29 या वयोगटातले आहेत. तारुण्य, वेग आणि तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टींचा एकत्र मेळ नियंत्रित असायला हवा. रस्त्यावरच्या अपघातांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन यांच्या बरोबरीचा वाटा आहे बाइक चालावताना मोबाईलवर बोलण्याचा.   
     स्त्रिया जास्त संवेदनशील आणि जागरूक म्हणून ओळखल्या जातात. पण कित्येक मुली सुद्धा दुचाकी चालवताना एका हाताने मोबाईलवर बोलत दुसर्‍या हाताने बाइक चालवत असतात. ऐकू येत नाही म्हणून मन वाकडी करून बोलण्याइतके तातडीचे कोणते काम असते जे क्षण दोन क्षणाने अडणार असते? आणि तेवढीच घाई असेल तर काही सेकंद दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवून बोलता येत नाही का? एक बेसावध क्षण तुमच्या जीवाला आणि समोरच्याची चूक नसताना त्याच्या जीवाला, पादचार्‍याला जीवघेणा ठरू शकतो. दुचाकी चालवणारी म्हणजे सुशिक्षितच मंडळी म्हणूया आपण. मग हे शिक्षण काय कामाचे? एका हातात बाइक आणि दुसर्‍या हातात मोबाइल धरून मारली जाणारी स्टाइल कुणाच्या तरी जिवावर बेतू शकते हे सुशिक्षित पणात बसते का? कधी खांदा आणि कान यांच्यामध्ये खोबणीत बसवलेला मोबाइल. बाइक आणि मोबाइल यांच्याबरोबर आपलीच प्रतिमा कशी स्मार्ट दिसते हे कल्पना करणार्‍या स्वाराला जाणवत नाही. त्याचवेळी समोर आलेला लहानसा खड्डा चुकवताना मोबाइल  आणि बाईकवाला दोघेही खड्ड्यात जाण्याची शक्यता. कार चालवणारेही बरेच जण एकाच वेळी ड्रायव्हिंग आणि बोलणे या दोन्ही क्रिया करताना दिसतात. ब्लु टुथ असेल तर ठीक नाहीतर तुम्हाला कामाची एवढी तातडी असेल तर थांबून तुम्ही बोलू शकता. दुचाकी गाडीचा बॅलन्स सांभाळून तुमचा तोल सांभाळला पाहिजे. अंदाज कधीही चुकू शकतो. मग अंदाजाला वावच का द्यायचा? आणि जर दुचाकीवाल्याला भान नसेल तर पादचार्‍याने त्याचे भान ठेवावे हेच खरे!  
         ..................................सविता नाबर



No comments:

Post a Comment