Monday 6 March 2017

तुम आशा, विश्वास हमारे....

     

        मुलीच्या पोटात दुखायला लागले म्हणून तपासणीसाठी आली, तीच सात महिन्यांची गर्भवती मुलगी. वय सतरा आठराच्या आसपास. खोदुन खोदून विचारले तरी पठ्ठी तोंड उघडायला तयार नाही. मला काही माहीत नाही हेच पालुपद. केस इतक्या पुढे गेलेली की तिच्या बाळंतपणाशिवाय पर्यायच नाही. दोन मुलीतली धाकटी. आई वडील शेतात काम करणारे. मोठ्या मुलीचे लग्न झालेले. हिचे शिक्षण नववीपर्यंत झालेले. म्हणजे मुलगी अगदीच अडाणी म्हणता येणार नाही अशी. मग तिच्या तोंड न उघडण्याचे कारण काय? तोंड घट्ट मिटून घेण्याइतके जबरदस्त कारण काय असू शकेल? आईला विश्वासात घेऊन ती काहीच सांगू शकली नाही? माझ्या एका प्रथितयश स्त्री रोग तज्ञ मैत्रिणीने सांगितलेली ही घटना.    
      एकदा खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलेली एक केस. एक चौकोनी कुटुंब. नवरा बायको, दोन मुले असा आटोपशीर संसार. पतिपत्नी नोकरी करणारे. मुलांना सर्व सुखे मिळाली पाहिजेत म्हणून धडपडणारे. मुलगी पंधरा सोळा वर्षांची. शाळा क्लास करून व्यवस्थित शिक्षण घेणारी. अचानक एक दिवस आईला समजले, लेक शाळेत आणि क्लासला जातच नाही. मग ती जाते कुठे? रजनीताईंनी शोध लावला. या कुटुंबाच्या ओळखीचे एक आजोबा ,साठीचे सद्गृहस्थ त्यांच्याकडे ती मुलगी रोज जात होती. पहिल्यांदा लहान लहान म्हणून तिच्याशी खेळणारे आजोबा, तिला इतके जवळचे झाले होते की एक दिवस ती त्यांच्याशी लग्नच करून आली. आई वडिलांवर दु:खाचा अक्षरश: डोंगर कोसळला. पण तोपर्यंत वेळ गेली होती. ती सज्ञान होईपर्यंत दोन वर्षे त्या आजोबांनीही वाट पाहिली. कितीही मनधरणी केली तरी ती माघार घ्यायला तयार नाही. याचे कारण काय? आईवडील आणि मुलांमध्ये इतका भावनिक दुरावा की मुलीची स्पंदने आईला जाणवली नाहीत! तिच्या वागण्यातला फरक आईने ताडला नाही.
    समुपदेशन करताना अनेक प्रकारचे प्रसंग पाहायला, ऐकायला मिळतात. काही वर्षांपूर्वी घडलेली ही आणखी एक घटना. मुलीला आई सतत रागावत असे. आई सतत चिडचिडलेली. मुलगी आईच्या दडपणाखाली. भीतीच्या छायेत. ती सात आठ वर्षांची असताना एका तरुण मुलाने तिच्याशी गैरप्रकार केला. पण आईला सांगायला ती मुलगी धजावेना. का तर आई तिलाच रागवेल म्हणून. पालकांचे वागणे मुलांवर नेहमी दोषारोप करणारे असू नये. शक्यतो परिस्थितीची शहानिशा करण्याचे भान असायला हवे. मुलांना त्यांच्या पालकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे की मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकण्याची त्यांची तयारी आहे. या घटनेत समुपदेशनची गरज मुलीला नव्हती, आईला होती.
      जगात उजळ माथ्याने फिरणारे लांडगे कमी नाहीत. त्यांच्या बाह्यरुपावरूनच त्यांना ओळखता येते. पण हरणाच्या कातडयाआड दडलेले लांडगे मात्र शोधुनही सापडत नाहीत. उसळते तारुण्य खुणावत असते. सारासार विचार करण्याची बुद्धी मुलांच्या ठिकाणी विकसित करण्यासाठी पालकांनीच जागृत राहाणे क्रमप्राप्त असते. पौगंडावस्थेतील मुलींना कधी कधी हे लक्षात येत नाही. यासाठीच मुलांवरचा विश्वास मौलिक असतो. त्यांना मानसिक सुरक्षितता देणे आवश्यक असते.
       तारुण्यात जेव्हा अभ्यास, शिक्षणा व्यतिरिक्त खेळ, संगीत, नाटक, अशा एकस्ट्रा करिक्युलर अक्टीव्हिटीज मध्ये रस नसेल तर मुलींचे लक्ष फक्त सौंदर्य जोपासना यावरच केंद्रीत होते. आणि मानसिक पातळीवर , बौद्धिक पातळीवर वाढ होण्याऐवजी सगळे लक्ष शारीरिक आकर्षण या भावनेभोवतीच फिरायला लागते. अशावेळी पालकांचा  विश्वास, आपुलकी त्यांना लाभली नाही तर त्या मुलींचा पाय घसरण्याची शक्यता असते. त्यासाठी सतत त्यांच्यावर पाळत ठेवण्याची गरज नसते. त्यांच्यावरती असलेला विश्वास काम करत असतो. बर्‍याचवेळा अगदी जवळच्या नातेवाइकाकडून मुलांचे लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. अशावेळी परक्या व्यक्तिला प्राधान्य देण्यापेक्षा मुलांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. मुलांच्या आविर्भावातून ,वागण्यातून कधी कधी ते व्यक्त होत असते. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक होता कामा नये. मुलांना लहान वयात, तारुण्यात प्रवेश करताना बर्‍याच वेळा लैंगिकतेचे ज्ञान नसते. त्याचा संकोच करण्यापेक्षा सौम्य शब्दात, मुलांना समजेल अशा पद्धतीने त्याचा परिचय करून देणे आवश्यक असते.
            ....................................सविता नाबर

No comments:

Post a Comment