Tuesday 7 March 2017

कलाम आपको सलाम !!

     

      माझे काम सर्वोत्तम असेल, मी सर्व काही करू शकतो, जगन्नियंता माझा पाठीराखा आहे, आजचा दिवस  माझा आहे, मी जेता आहे.” दिसायला साधी छोटीशी असणारी वाक्य जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी आहेत. अशा प्रोत्साहनाची आजच्या युवापिढीला गरज आहे हे ते ओळखून होते. झोपेत पडते ते स्वप्न नाही तर जे झोपू देत नाही ते स्वप्न. असे स्वप्न पाहायला ज्या महान व्यक्तीने शिकवले त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस. अविल पाकीर जलालूद्दीन अब्दुल कलाम या चिरतरुण नेत्याचा जन्म दिन. रामेश्वरमला जन्मलेला एका नावाड्याचा मुलगा. पाच भावंडातला सगळ्यात धाकटा . त्याने देशातल्या सगळ्या जनतेच्या मनावर अधिराज्य केले. आपल्या आचरणाने आणि विचारांनी. देशातल्या प्रत्येक व्यक्तिशी जातीधर्मापलीकडे जाऊन त्यांनी आपलेपणाचे नाते जोडले होते. साधी राहणी आणि उच्च विचारसारणी हे त्यांचे जीवन होते. वयाच्या या टप्प्यावर शारीरिक व्याधींनी ग्रस्त आणि मानसिक विवंचनानी त्रस्त असणार्‍या सर्वसामान्य माणसाच्या तुलनेत कलामसाहेब चिरतरुणच म्हणायला पाहिजे. वयाने ऐंशीच्यापुढे असणार्‍या पण मनाने कुसुमाहूनही नाजुक असणारे कलाम, मुलांना कशा प्रकारे बुद्धीला खाद्य देता येईल याचा विचार करत.

   त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला  नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.डॉ.कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने ते गावात वर्तमानपत्रे विकून, लहान मोठी कामे करून घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच. इस्रोमध्ये असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल 3 या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईना  भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वाटत होते. ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा' चे ते प्रमुख झाले. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.

    एकदा त्यांच्या सहायकाने आपल्या मुलांना एका प्रदर्शनाला न्यायचे कबुल केले होते. त्यासाठी कलामांची परवानगिसुद्धा त्याने काढली होती. पण ऐनवेळी तो कामाच्या व्यापामुळे मुलांना कबुल केल्याप्रमाणे घेऊन जाऊ शकला नाही. आपल्या सहायकाकडे तेवढेच जातीने लक्ष देणारे कलाम त्याच्या मुलांना प्रदर्शनाला घेऊन गेले आणि त्याला आश्चर्याचा गोड धक्का दिला. राष्ट्रपति झाल्यानंतर त्यांच्या केरळच्या पहिल्या भेटीत राजभवनात , रस्त्यावरच्या चर्मकाराला आणि पूर्वीच्या दिवसात नेहमी जेवण घेत असलेल्या हॉटेल मालकाला राष्ट्रपतींचे पाहुणे म्हणून बोलवणारे कलाम माणूस म्हणून किती थोर होते हे या घटनांवरून लक्षात येते.  
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', द्मविभूषण' 'भारतरत्न' किताब देऊन त्यांचा सन्मान केला. अखेरचा श्वास घेतला तेव्हाही ते कार्यरत होते. आजच्या तरुण पिढीला दुसर्‍याकडे काय आहे, आपल्याकडे ते नाही म्हणून न्यूनगंडाखाली जगण्याची सवय झाली आहे. त्यांच्यासाठी कलामांचे जिते जागते उदाहरण समोर आहे. त्यांच्याकडे टीव्ही नव्हता की अन्य कोणतीच सुखसाधने नव्हती. फक्त स्वत;च्या मालकीची पुस्तके, वीणा, काही कपडे आणि लॅपटॉप एवढ्याच गोष्टी राष्ट्रपति भवनात प्रवेश करताना होत्या, तेवढ्याच वस्तु राष्ट्रपति पदावरून पायउतार झाल्यावरही होत्या. नि:स्पृहतेचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या कलामना जनतेचा नेहमीच सलाम असणार
आहे !!
             ........................................सविता नाबर


 


1 comment:

  1. Best online casinos in South Africa 2021 | Updated Reviews
    Online casinos in South Africa 2021 · 10Bet: The World's 카지노사이트 Biggest Online Casino · Betfair: Biggest Online Gambling Site 카지노 · Red gioco digitale Tiger: The World's Biggest Online

    ReplyDelete