“घरात
सगळ्याच कामाना बाई आहे. आता वेळ कसा घालवायचा हाच प्रश्न आहे. खरेदी करत सुटते.
भिशी आहेच. आम्ही मैत्रीणी दर काही दिवसांनी ट्रीप काढतो. हल्ली स्वयपाकाची सवयच
मोडली आहे त्यामुळे थोडेसे काम केले तरी थकून जायला होते.” चाळीशीची नेहा सांगत
होती. ही झाली सुखवस्तू गृहिणीची कथा आणि व्यथा. नोकरी करणारी जेव्हा निवृत्त होते
तेव्हा आपल्या मागे पडलेल्या आवडी, छंद जोपासायचे ठरवते. पण जेव्हा वास्तवात रिकामपणाचा क्षण येतो, तेव्हा या आवडी विसरायला होतात. काम काहीही असो,
कार्यमग्न रहाणे हा स्वभाव धर्म बनायला पाहिजे. तोच क्षण सुखाचा असतो.
दगडफोड्याचे काम तुम्ही बघितले आहे? शिल्प कुठलेही असले तरी त्या क्षणाला तो जे
काम करत असतो ते अगदी मन लावून करत असतो. कडक उन्हात त्याला घामाच्या धारा
लागलेल्या असतात. शिंप्याचे काम पाहिलेत, सुईवरची, मशीनवरची त्याची नजर एका सेकंदासाठीही हटत नाही. संगीत साधना करताना तन
आणि मन दोन्ही संगीतामधे एकाग्र झालेले असतात. सूक्ष्मातल्या सूक्ष्म श्रुतिवर, स्वराच्या होणार्या कंपावर मन केन्द्रित झालेले असते. ते जरासुद्धा इकडे
तिकडे होत नाही. काम करत असताना आपले रममाण होणे अपरीहार्य असते. एखाद्या कृतीमधे
तल्लीन होणे भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावते.
बारा
पंधरा वर्षांपूर्वी व्हीआरएसची लाट आली होती. त्या लाटेत कितीतरी लोकांना पुढे काय
करावे हा प्रश्न पडला. कारण आधी काही प्लॅनिंग केले नव्हते. बँक कर्मचारी, कंपनीतले अनेक ऑफिसर यांनी स्वेच्छानिवृत्ती
घेतली खरी पण अचानक आलेल्या रिकामपणाने पुढचे भविष्य उगाचच अंध:कारमय वाटत होते.
कितीजण मानसिक आजाराचे बळी ठरले. सतत कामात गुंतलेल्या मनाला आलेले रितेपण कशाने
भरुन टाकावे हे कळत नव्हते. मन हे बालकथेतल्या भुतासारखे असते. भूत एकदा एका
व्यक्तिला प्रसन्न होते. त्या व्यक्तीने सांगितलेलं काम भूत काही काळातच आटपून
पुन्हा त्याच्यासमोर हजर होत असते. पण भुताची एकच अट असते काही काम नसले तर मी
तुला खाऊन टाकणार. शेवटी तो माणूस भुताला घरासमोरच्या खांबावर सतत वर खाली करायचे
काम सांगतो. कामाचे भूत असेच आहे. रिकामे असले तर मनच खायला उठते.
सुखाच्या शोधात निघलेला एकजण साधूबुवाना
भेटतो. घरात बायको मुलांसह रहाणार्या त्याला रोजचे जीवन कटकटीचे वाटत असते. साधू
त्याला एक मांजर पाळायला सांगतात. तुला आठ दिवसांनी कळेल. आठ दिवसांनी तो पुन्हा
साधूकडे येतो. कुठे आहे सुख? साधू
सांगतो, आता शेळी पाळ. पुन्हा शेळी घेऊन गेल्यावर सुखाचा
काही पत्ताच नाही म्हणून तो साधूला विचारतो. साधू सांगतो आता घोडा पाळ. तो घोडा
घेऊन घरी येतो. त्याला कळत नाही,
साधूबुवा इतके सगळे सांगतोय, मग सुख कुठे ते दिसत कसे नाही? साधू त्याला सांगतो, एक पोपट पाळ. आता घायकुतीला
आलेला तो साधूकडे गयावया करून म्हणतो, महाराज तुम्ही
सांगितल्याप्रमाणे सगळे केले खरे पण दिवसेदिवस मी आणखीनच कंटाळत चाललोय. आणि
सुखाचा काही थांगच लागत नाही. साधू हसून म्हणतो, या क्षणी तू
घरी आणलेल्या सगळ्या प्राण्यांना रानात सोडून दे. त्याप्रमाणे तो करतो. घरी जातो
आणि त्याचा कातावलेला जीव शांत झोपतो. ताजातवाना झाल्यावर साधूकडे जातो. हात जोडतो
आणि म्हणतो. सुख माझ्याकडेच होते. पण त्याचाच ध्यास घेतला आणि चुकलो. आता मी खरच
सुखी आहे.
एक
क्षणभर नाक दाबून सोडून द्या. श्वासाचे सुख लक्षात येईल. पाण्यात बुडी मारून बघा.
शुद्ध हवा मिळाल्याचे सुख काय असते हे लक्षात येईल. बराच वेळ तुंबलेली पोटातील
पाण्याची टाकी ज्याक्षणी रिकामी होते त्याक्षणीचे सुख प्रत्येकालाच माहिती आहे. आठवडाभर
अंग मोडून काम केल्यावर येणारा विश्रांतीचा रविवार किती सुख देऊन जातो! कामाचे
महत्व कार्यरत असतानाच. कार्यरत रहाणे आपल्याला आनंद तर देतेच, पण कर्तव्याची भावनाही जागृत ठेवते. हा गुण
मुंग्यांपासून शिकावा. दुसर्यांसाठी न सही पण स्वत:च्या सुखासाठी तरी कार्यमग्न
रहाणे आवश्यक असते. हाच आपल्या सुखाचा सदरा असतो.
-------------------------सविता नाबर
No comments:
Post a Comment