साडेतीन
शक्तिपीठांपैकी एक करवीर. त्याची आधिष्ठात्री देवता श्री अंबाबाई. सश्रद्ध
भाविकाला मानसिक आधार देणारी. या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेण संस्थिता ,नमस्तस्यै: नमस्तस्यै:
नमस्तस्यै: नमो नम:! शक्ति,
भक्ति, मातृ ,तुष्टी, दया, बुद्धी, निद्रा, क्षुधा या सगळ्या शक्तींची
आराध्य देवता, आदिशक्ती
श्री अंबाबाई, करवीर
नगरीचे भूषण. स्त्री शक्तीचे जागृत दैवत. राक्षसरूपी दुष्टांचे निर्दालन करणारी, अनिष्ट वृत्तीचा नायनाट
करणारी देवी. ती देवी पार्वतीचे रूप आहे. अशा या आदिशक्तीला भजणार्या भक्तांना
तिच्या गर्भागारात मर्यादित लोकांनाच प्रवेश आहे. पुरोहित, राजघराण्यातले लोक यांना
गाभार्यात जाता येते. पण सर्वसामान्य स्त्रीला मात्र आत जायला मज्जाव आहे. स्त्री
आणि पुरुष दोघेही मानवच, मग
या दोन्हीमधे भेद का?
पुरोगामी राजा शाहू छत्रपतींच्या राज्यात
ज्या समाज प्रबोधनाचा पाया घातला गेला,
त्याच राज्यात देवीच्या गाभार्यात जायला स्त्रीयांना मनाई असणे यापरता उपरोध तो
कुठला? स्त्री नुसतीच शिकली नाही तर
सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर असणार्या स्त्रीने पौरोहित्याचे क्षेत्रही सोडले नाही.
प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी स्त्री अध्यात्म क्षेत्रातही पुरुषांच्यापेक्षा
काकणभर सरसच आहे. हे एवढ्यासाठी म्हणते की,
देवाची पूजा, आरती, होम जे काही करायचे असेल
त्याची तयारी करण्याची जबाबदारी अगदी प्रसादा सकट सर्वस्वी स्त्री कडेच असते.
पुरुष फक्त पूजा करण्याचा मान आपल्याकडे घेतो. ती मूर्तिपूजक आहे. स्वामी
विवेकानंदांच्या मते जी मूर्तिपूजा श्रद्धेसाठी आवश्यक आहे ते ती मनोभावे करते.
अगदी वेद काळापासून आपल्या डोळ्यांसमोर हे
उदाहरण आहे. गार्गी आणि मैत्रेयी या थोर विदुषीँची उदाहरणे आहेत. राजा जनकाच्या
काळात मित्र नावाचे ऋषी होते,
त्यांची कन्या मैत्रेयी. ऋग्वेदातल्या ऋचांची निर्माती गार्गी. वेदांमधे आणि
तत्वज्ञात पारंगत असणारी ब्रम्हवादिनी गार्गी या विदूषीची मैत्रेयी ही भाची. त्यावेळी
त्यांच्या मुंजीही झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात पुरुष प्रधान मानसिकता
आस्तित्वात आली आणि सगळेच बिघडले.
देवीच्या पूजेचा मान पुजार्याला नक्कीच. पण
स्त्रीला नाही. पौरोहित्य करणार्यांपैकी काही पुरोहितांच्या पत्नीना गाभार्यात जाण्याचा अधिकार आहे. बाकी
भक्तांपैकी कुणालाच नाही. देवी ही स्त्रीचे रूप असूनही तिच्या गर्भगृहात स्त्रीलाच
प्रवेश निषिद्ध? नवरात्रोत्सवात
मंदिराच्या स्वच्छतेत देवीच्या गर्भागारातून तंबाखू आणि गुटख्याच्या पुड्या बाहेर
पडतात. पुजार्यांच्या भक्तीला सलाम! पण याचा अर्थ स्त्रीला प्रवेशही नाही हे
म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आली तरी मानसिक गुलामगिरीतून देश
अजून मुक्त झाला नाही हेच खरे. सृष्टीची सृजनात्मक प्रक्रिया ज्यामुळे चालू राहते
त्यालाच विटाळ असे म्हणून स्त्रीला काही क्षेत्रांमद्धे प्रतिबंध घालण्यात आला. त्या
काळात जर देवाचे काही केले ,तसाच
जर देवळात प्रवेश केला, तर
तिला, तिच्या कुटुंबीयांना त्याचे
फळ ( पक्षी: वाईट
परिणाम) भोगावे लागेल हे मनावर ठसवले गेले. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता हे
खरोखरच सत्य आहे का? त्या काळात
स्त्रीला आराम मिळण्याच्या हेतूने असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. पण तिचा
तेवढा मासिक कालावधी हा बर्याच गोष्टींसाठी वाईट ठरवला गेला.
एकदा पुण्याच्या पर्वतीला आम्ही मैत्रीणी एका
देवळात गेलो. बाहेर कट्ट्यावर बसलेले टोळभैरव हसायला लागले. नंतर कारण कळले की ते
मंदिर कार्तिक स्वामीचे होते. स्त्रीयांनी त्याचे दर्शन घेता कामा नये हा नियम. हा
नियम कुणी केला? बरं, दक्षिणेत कार्तिकेयाची इतकी
मंदिरे आहेत की तिथे सगळीकडेच आम्ही आत जाऊन दर्शन घेतले आहे. मग एका ठिकाणी दर्शन
घेतलेले चालते आणि दुसर्या ठिकाणी त्याच देवाला स्त्रीयांचे मंदिरात जाणे निषिद्ध
हे कसे?
एप्रिल 2011 मध्ये अंबाबाईच्या गाभार्यात
महिलाना असलेल्या प्रवेशबंदी विरुद्ध आवाज महिलांनी उठवला. भाजपाच्या महाराष्ट्र
महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता केळकर आणि मनसेचे तत्कालीन आमदार राम कदम यांनी
काही कार्यकर्त्यांसोबत गाभार्यात प्रवेश केला. पण हा प्रवेश करणे हे
तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. सर्व मंगल मांगल्ये असणारी नारायणी सर्वांना
सुबुद्धी देवो!
........................सविता नाबर
No comments:
Post a Comment