Tuesday, 7 March 2017

लोक काय म्हणतील?

    

      हानपणी काहीतरी गाणे, गोष्ट सांगून वडीलधार्‍यांच्या कौतुकाची पावती मिळवायची सवय झालेली असते. चल मनू गोष्ट सांग म्हटले की मनू बुवांची गोष्ट सुरू झाली. गाडी न थांबता, थेट शेवटपर्यंत एका दमात जाते. काहीतरी नक्कल करायला सांगितली की आवंढे गिळत नक्कल होते. मग काका ,मामा, मावाश्यांच्या अगबाई, किती गोड, छानच करतोय , मोठेपणी चांगला कलाकार होणारसे दिसते. अशा एकापेक्षा एक कॉमेंट्स होत असतात. बाळराजे फुशारलेले असतात. मग कुणी पाहूणे आले की सुरू. मनूला मग लोकांकडून मिळणार्‍या प्रतिसादाची सवय होते. आणि त्या कौतुकभरल्या शब्दांचा,शाबासकीचा छंदच लागतो. कुठलीही गोष्ट केली की लोकांकडून त्याबद्दलच्या उल्लेखाची तहान लागते. आपल्यातल्या गुणाला ,आपल्या कुठल्याही कृतीला लोकांची वाहवा मिळाली तरच आपले काम श्रेष्ठ असे हळूहळू वाटायला लागते. आणि नकळत लोकांनी दखल घेण्याची लागलेली सवय मग इतकी अंगवळणी पडते की मोठेपणी हा मनू आजूबाजूच्यानी छान म्हटल्याशिवाय त्याची गाडी पुढेच सरकत नाही. किंबहुना त्याला लोकांनी चांगले म्हणावे याचीच चटक लागते . त्यांच्या अ‍ॅप्रीसिएशनसाठी तो कासावीस होतो.          
     माझ्या माहितीतला एक युवक , त्याला काही दिवस नोकरी नव्हती,तो निराश मन:स्थितीत होता. त्याची निराशेची गडद छाया आईवडिल दूर करू शकत नव्हते. त्याला त्यातून बाहेर काढण्याऐवजी आईवडिलांना त्याचे घरात राहणे, सतत झोपून रहाणे त्रासदायक वाटत होते. कारण लोक काय म्हणतील? शाळकरी वयात मुले पेपर कठीण गेला की आत्महत्या करतात. घर सोडून पळून जातात. त्याला कारण एकच असते. त्याला आईवडिलांना, मित्रांना, नातेवाईकांना तोंड दाखवायला जागा नसते. एवढ्या मोठ्या आयुष्यातील एक क्षुल्लक परीक्षा त्यांच्या जीवाचे मोल घेऊन जाते. म्हणूनच कधीतरी अपयशही वाट्याला यायला हवे. म्हणजे यशाची गोडी कळते. कितीतरी वेळा बलात्कारीत मुली, स्त्रीया जीव देतात. दोष त्यांचा नसताना, परिस्थिती त्यांचा बळी घेते. एका सुंदर आयुष्याला त्या मुकतात. लोक काय म्हणतील या लाजेपोटी. लोकांच्या बोलण्याचा त्रास होतो म्हणतात. पण त्यांच्या हाती रिमोट कंट्रोल का?
    ठेवणीतली बेडशीट्स ,काचेच्या वस्तु , छान छान भांडी पाहुण्यांसाठी शोकेसबाहेर येऊन डायनिग टेबलाच्या रॅंपवर कॅटवॉक करून जातात. काही वेळासाठी आपले तोंड दाखवून पुन्हा कपाटाच्या बंद दाराआड नाहीशी होतात. पाहुण्यांनी भांड्यांसकट पदार्थांचेही कौतुक केलेले असते. घरच्या गृहिणी बरोबरच यजमानालाही अंगावर मूठभर मांस चढलेले असते. गृहिणीने काही तास खपून केलेले पदार्थ त्यादिवशी चक्क फाइव्ह स्टार हॉटेलच्या तोडीचे झालेले असतात. घराची केलेली सजावट, रंगसंगती घरच्या लोकांपेक्षा बाहेरचे लोक , नातेवाईक यांच्या पसंतीची पोचपावती घेऊन धन्य झालेले असते. ऊंची खाद्यपदार्थ, पेये यांची रेलचेल असते ती पाहुण्यांसाठी . त्यावेळी ओठावर साखरेचीही गोडी कमी वाटेल असे मधुर शब्द असतात. कधी कधी पोटी एक आणि ओठी एक असेही असू शकते. पण बाहेरच्यांना आपले वागणे सुसंस्कृत वाटले पाहिजे. त्यांनी स्तुति केली पाहिजे ही त्यामागच्या तप:श्चर्येची कारणे असतात. भिशी, किटी पार्टीला, गेट टुगेदरना नवे नवे ड्रेस, साड्या, यांना हवा लागते. अरे वा ! काय छान! असे लोकांनी म्हणावे अशीच भावना त्यामागे असते. नाव ठेवायला नको , काय व्यवस्थित आहेत ही माणसे असे म्हणवून घेण्यासाठी ही तगमग असते. कधीतरी स्वत:साठी  छान दिसा, स्वत:ला आनंद वाटेल म्हणून चांगले रहा, खा, प्या. कधीतरी हे सस्वान्त सुखाय असू देत. 
    पूर्वी जेव्हा सामाज लहान होता. जागतिकीकरण झाले नव्हते, तेव्हा लोक एकमेकांना जपण्यासाठी खूप धडपडायचे. आज तीच परंपरा पुढे चालवायची म्हणजे थोडेसे अवघड आहे. कारण प्रत्येकाचा परीघ ज्याचा त्याने आखून घेतलेला आहे. त्याच्या आत शिरण्याला दुसर्‍याला मज्जाव आहे. पण दुसर्‍याकडे बोट दाखवायला मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण समाजाचा अंश आहोत नक्कीच. पण त्या मताला किती महत्व द्यायचे ते तुमच्या हातात आहे. अन्यथा तुमचे मूल्य तुम्हीच जाणताच !  

              ..........................सविता नाबर



No comments:

Post a Comment