कुत्र्या
मांजरावर प्रेम करणारी सून सासू
सासर्यांना हिडीस फिडीस करते तेव्हा मनुष्य स्वभावाचा तळ सापडत नाही. मुक्या
प्राण्यावर प्रेम करणारी हीच माणसे बोलणार्या माणसाच्या भावना समजू शकत नाहीत. एक
ऐकलेली घटना. वडिलांनी घरदार विकून आपल्याकडे अमेरिकेला यावे म्हणून धोशा लावणारा
मुलगा, सगळे पैसे नावावर झाल्यावर, त्यांना विमानतळावर
घ्यायलाच आला नाही. त्यांच्या अमेरिकेच्या तिकिटाचा तर पत्ताच नव्हता. आकाश कोसळणे
म्हणजे काय हे त्या वयस्क जोडप्याने अनुभवले असेल.
वृद्धत्व हे तर दुसरे बालपण. अवयवांवरचा
ताबा सुटलेला असतो, गात्रे शिथिल झालेली असतात. आई वडिलांचे म्हातारपण
अव्हेरणार्या त्यांच्या लाडक्या मुलांनी, आपल्यालाही हे दिवस पहावे लागणार आहेत याची खात्री
बाळगावी. तुमच्या बालपणी तुमच्या अनेक चौकस प्रश्नांना उत्तरे देणारे,
तुमच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणारे, मिळकतीत होता होईल तितकी तुमची हौस मौज पुरवणारे,
तुम्हाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे आईवडील त्यांचे वय झाले की एकदम परके
किंवा अडगळ का वाटायला लागतात ? ज्या घरात संवादच नाही त्यांनी हा प्रश्न युद्धपातळीवर
सोडवला पाहिजे. वयोवृद्धानी जसा आपला हेका सोडायला पाहिजे तेवढेच नवीन पिढीने
त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीही बदलली पाहिजे. कधी परिस्थितीने माणूस गांजलेला
असतो, कटू अनुभवानी बेजार होऊन स्वभावात कडवटपणा उतरलेला असतो तर कधी
असाध्य आजाराने ग्रासल्याने स्वभाव चिडचिडा झालेला असतो. आवश्यकता असते फक्त
परिस्थिती आणि माणूस समजून घेण्याची. आज तरुण असणारी पिढी उद्याचे आजी आजोबा आहेत,
त्यांनाही अशाच शारीरिक पीडेमधून जायला लागणार आहे याची मनात जाणीव ठेवली,
परानुभूती जागृत ठेवली, तरी आजच्या वृद्ध पिढीचा वृद्धापकाळ सुखात
जाईल.
आईवडिलांचे विश्व असलेले तुम्ही ,
मात्र तुमच्या विश्वात त्यांच्यासाठी फक्त एक हळवा कोपरा हवा असतो. दोन पिढ्यां
मधले अंतर ज्याला जनरेशन गॅप म्हणता येईल, दिवसेदिवस ती वाढत जाते. नवीन तंत्रज्ञानाशी जुनी
पिढी जुळवू शकत नाही. विचारांमध्ये तफावत ही असणारच आहे. दरी सांधायला आजच्या
मध्यमवयीन पिढीला थोडे अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की. परिचितापैकी एक
सद्गुणी सून. सासरे तिला काही बोलले म्हणून तिने सासर्यांना जेवायला खायला
द्यायचे बंद केले. तिला वयस्क सासर्याला उपाशी ठेववले तरी कसे?
एखाद्याचा आत्मा तळतळत ठेवून मनाला शांतपणा कसा मिळू शकतो?
पाश्चात्य मुले समजायला लागल्यापासून मनाने
स्वतंत्र होतात. आपण मात्र वयाच्या कुठल्याही टप्प्यावर भावनिकरित्या कुटुंबियांवर
अवलंबून असतो. आपली संस्कृती विभक्त राहण्याची नाही. आज परिस्थितीने,
काळाने अशी वेळ नव्या पिढीवर आणली असली तरी शक्य तितक्या सामोपचाराने,
समजून घेऊन वागले पाहिजे. कधी मागल्या पिढीची ही अपेक्षा असते की आपल्याला म्हणावे
तसे सुख मिळाले पाहिजे. खरेतर वयाच्या या टप्प्यावर पैलतीरी लागलेले नेत्र आणखी
काय अपेक्षा मुलांकडून ठेवत असणार? मृत्यूपश्चात जी दुनिया असते त्याबद्दल कोणालाच
काही माहीत नाही , भीती असते ती आपण बिछान्यावर पडून परावलंबी होऊ
याची. मानसिक असुरक्षितता त्यांना भेडसावत असते. जे वृद्धत्व ग्रेसफुली स्वीकारतात,
शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत रहातात, भलेही ते समाजसेवेत स्वत:ला रमवत असतील अथवा छंदात
मन गुंतवत असतील, मित्रमंडळींचे सर्कल असेल त्यांना त्याचा त्रास
होत नाही. पण जे वृध्दत्वाने गांजलेले असतात त्यांच्या बाबतीत वेगळी भूमिका
घेण्याची गरज असते.
वृद्धाश्रमाच्या
पायर्यांवर एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्या आश्रमाच्या अधिक्षकांशी ते बोलत होते.
त्यांच्या चेहर्यावर जरासाही खिन्न भाव नव्हता की दु:खाची छटा नव्हती.
अधिक्षकांनी त्यांना त्यांची खोली दाखवली. ते खोलीत गेल्यावर इतका वेळ लांबून त्या
दोघांच्या गप्पांकडे एकटक पाहणार्या त्या वृद्ध गृहस्थाच्या मुलाने अधिक्षकांना
विचारले, तुम्ही इतका वेळ माझ्या वडिलांशी काय बोलत होतात? तुमची
ओळख आहे का? हसून ते
म्हणाले, हो आमची ओळख तशी जुनीच. अगदी तीस वर्षांपूर्वीची. माझ्याकडून
एका अनाथ मुलाला दत्तक घेतले होते. आयुष्यातले ढळढळीत वास्तव ऐकून मुलगा सुन्न.
........................................सविता नाबर
No comments:
Post a Comment