लहान मुलांचे मन निष्पाप असते, त्यांच्या मनात काही छक्के पंजे नसतात. मन आनंदाने आणि हास्याने भरून
वाहात असते. लहानपणी मन हे टीपकागदासारखे असते. आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा
परिणाम त्यांच्या मनावर चटकन होत असतो. त्याप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रियाही
असतात. चांगल्या वागण्याचा मुले तसाच प्रतिसाद देत असतात. तर वाईटही तेवढेच टिपत
असतात. मग एका दहा बारा वर्षांच्या
मुलीला आपले वडील आत्महत्त्या करत आहेत, ही जाणीव
होते म्हणजे शेतकर्यांचे दु:ख किती पराकोटीला पोचले आहे याचेच जीवंत उदाहरण
म्हणायला लागेल.
ती एक विडिओ
क्लिप होती. मुलीचे दैनंदिन आयुष्य सुरू आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात तिचे
आजूबाजूलाही बारकाईने निरीक्षण चालू आहे, जे मुलांचे
नेहमीच चालू असते. तिची वेणी फणी ,खेळणे चालू असले तरी अधून
मधून बापाकडे तिचे लक्ष असतेच. बाप डबा घेऊन शेतात जातो, ती
त्याच्या पाठीमागून लपत छपत जाते. सायकलवरुन जाणार्या बापाला ती आडून आडून पहात
असते. एकदा बाप शेतात जातो आणि एका झाडाच्या फांदीवर दोरी टाकतो. ते बघून त्या
क्षणी त्या मुलीच्या मनातली भीती जागृत होते. हेलावून टाकणार्या आवाजात ती टाहो
फोडते. त्या क्षणी बाप आपल्याला सोडून जाणार ही भावना त्या लहान मुलीला धरणी
दुभंगून घेणारी वाटते. ती पळत जाऊन बापाला चिकटते. बाप झाडाच्या फांदीवरून येणार्या
दोरीला टायर बांधून तिच्यासाठी झोपाळा तयार करतो, आणि तिला
त्यावर बसवून झोका देतो. क्षणार्धात आपल्याही मनातली भीती दिलाशाची जागा घेते. त्याक्षणी
त्या छोट्या मुलीबरोबरच आपलाही जीव भांड्यात पडतो. मुलीचे पितृछत्र अकारण हरवले तर....
या कल्पनेनेच आपल्यालाही कसेसेच वाटलेले असते.
खरच बळीराजाचे
जिणेच असे झाले आहे. सर्वस्वी पावसावर अवलंबून. आकाशातल्या देवाने हात दिला तर तो
कसाबसा तग धरतो. या वर्षी तर पावसाने अगदीच त्याचे ऐकले नाही. शेतकर्याचे रोजचे
जेवणच त्यावर आहे. तोंडाचा घास गेला तर त्याने कुणाच्या तोंडाकडे पहावे? मग रोजचा उपास असह्य झाला की तो जिवाची पर्वा करत नाही. कधी विहीर, कधी अग्नि तर कधी दोरी जवळ करतो. स्वत:च्या उपासापेक्षा आपली बायको पोरे
उपाशी पडतात हे शेतकर्याला मनाला यातना देणारे असते.
आपण लंघन
करण्यासाठी केलेला स्वेच्छेचा उपास आणि शेतकर्यावर लादलेला बंधनकारक उपास यात खूप
अंतर आहे. कोरडा उपदेश इथे कामाचा नाही. पण सगळ्यांचा अन्नदाता असणारा हा बळीराजा
त्याने मनाने कच खाऊ नये. ज्या क्षणी तो स्वत:चे जीवन संपवतो, त्याच वेळी त्याचे कुटुंब उघड्यावर पडणार असते, हे
तो कसे विसरतो? आपल्या मुलांना या जगात आणखीन दू:खाच्या खाईत
लोटत असतो. त्याच्या भरवशावर कुटुंबातले लोक काहीतरी आशा बाळगून असतात. पण
त्याच्या माघारी ते काय करणार असतात? याचा थोडासा विचार
त्याने करावा.
त्याच्या
आत्महत्येने प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही. आलेला दू:खाचा दिवस नक्कीच पालटणार आहे
. त्याने चार शहाण्या सुरत्या माणसांना विचारले तर...., त्यासाठीच नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे समाजात आहेत. शेतकर्यांचे दू:खाश्रू पुसण्याचे काम या
दोघांनी स्वेच्छेने हाती घेतले आहे. यासाठी नाम फाउंडेशनची स्थापना केली आहे. ही
दोन्ही टोके जोडणे पुर्णपणे जरी शक्य झाले नाही तरी कुठेतरी मेळ साधता येईल. विदर्भ
आणि मराठवाडा इथले स्थानिक लोकही दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत करण्यात पुढाकार
घेत आहेत. प्रशासनही सहाय्य करत आहे. निव्वळ आर्थिक मदत हा तात्पुरता उपाय झाला. डॉक्टर
अविनाश पोळ यांच्यासारख्या जलतज्ञाचे मार्गदर्शन मिळत आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी
उपाय शोधण्यासाठी, भविष्यकाळात काही प्रमाणात समाज प्रबोधन
तर काही प्रमाणात पर्यायी पिके घेणे आदि उपायही शेतकर्याला सुचवावे लागतील. मानवी
आयुष्य खूप मोलाचे आहे . किरकोळ गोष्टीने माणसे मोडून पडू नयेत असे वाटते. बळीराजा
तर मानव जातीचा पोषणकर्ता आहे. दुष्काळाचे सावट निघून जाणार आहे यावर त्याने
विश्वास ठेवावा. ................................सविता नाबर
No comments:
Post a Comment