जनक
हा दुसरीतला मुलगा. त्याच्या पाठी इतके व्याप त्याच्या आई वडिलांनी लावले होते की
त्याला अक्षरश: श्वास
घ्यायला फुरसत नव्हती. जनक हा सर्वसामान्य मुलांसारखाच पण त्याच्या दुर्दैवाने की
सुदैवाने माहीत नाही अनेक अॅक्टिव्हिटीजचे ओझे त्याच्यावर आईने लादले होते.
शारीरिक ओझ्याबरोबरच ते ओझं मानसिकही होते. त्याची प्रगति आईच्या काळजीचा विषय
होता. खरंतर तो चांगले मार्क्स मिळवत होता. पण त्याची आई त्याच्या शालेय प्रगति
व्यतिरिक्त त्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करत होती. सकाळी ७ वाजता घरातून
बाहेर पडलेला जनक दुपारी ४ वाजता घरी आला की त्यानंतर त्याचे कराटे क्लासेस, शामक डावर डान्स क्लास,गिटार हे सगळे क्लासेस
संपल्यावर संध्याकाळी ७ वाजता दमून भागून घरी येणार .घाण्याला जुंपलेल्या
बैलासारखा त्याला क्लासना जुंपले होते. या सगळ्यांमधे प्रावीण्य मिळवणे त्याच्या
आईच्या दृष्टीने पर्वणी होती. पण एवढ्याशा जीवाला इतके कशासाठी राबवायचे ? जनकचा भाऊ सुजय हा
मानसिकरीत्या अपंग होता. त्याची उणीव भरुन काढण्यासाठी हा दुप्पट व्याप जनकच्या
माथी मारला होता. आर्य विद्या मंदिराच्या ओपन हाऊसमधे जनकला घेऊन त्याची आई माझ्याकडे
आली ती त्याला एकदा परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून. समुपदेशनाची गरज जनकला नसून
त्याच्या आईला होती. एकाला कमी मिळालय म्हणून त्याची वाजावट दुसर्यावर काढण्याची
काही गरज नाही. पर्यायाने जनकसारख्या कोवळ्या फुलाला अकाली भार पडल्याने तो
कोमेजण्याची शक्यता आहे. तिला समजावून सांगितल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रुधारा
वाहायला लागल्या.
मी डॉक्टर तर माझ्या मुलानेही डॉक्टरच
व्हावे. म्हणजे माझे हॉस्पिटल तो चालवू शकेल. माझे मूल सीए होईल, सॉफ्टवेयर इंजिनीअर होईल ,पैसा खोर्याने ओढेल. माझ्या
मुलाने किंवा मुलीने अमुक एक व्यवसायच केला पाहिजे. असा निर्णय त्याच्यावर लादला
जातो. त्याची क्षमता नसतानाही त्याच्यावर ठराविक व्यवसायाचे ओझे लादले जाते.
आमच्यावेळी आम्हाला हे मिळाले नाही म्हणून आम्ही तुम्हाला एवढे देतो आहोत. हम दो
हमारा एकच्या जमान्यात सर्व सुखे हात जोडून मुलांपुढे उभी असतात. प्रसंगी भरपूर
डोनेशन देऊन एखाद्या कॉलेजला प्रवेश घेतला जातो. भलेही आपल्या पाल्याला त्या
विषयात रस आहे की नाही याचा विचारही न करता आई वडील मुलांचे करियर करवण्याच्या
मागे लागलेले असतात. आयुष्याचे ईप्सित फक्त पैसा मिळवणे, चैन करणे आहे का याचा विचार
पालकांनी स्वत:च्या मनात आधी रुजवायला पाहिजे. नुकताच लागलेला दहावीचा निकाल बरेच
काही सांगून गेला. इच्छा ,आवड
आणि क्षमता नसताना पाल्यांना त्यांना नको असलेल्या साइडला जाणे भाग पडते. शैक्षणिक
स्पर्धेला तोंड देताना मुलांची दमछाक होतेय. शैक्षणिक गुणवत्ता हीच खरी बुद्धिमता
आहे का?
मुलांना आजकाल फुलणे फारसे
माहीतच नाही असे झाले आहे. मैदानी खेळ कमी झाले. याची जागा कॉम्प्युटर गेम्सनी घेतली , टीव्हीसारख्या मनोरंजनाच्या माध्यमानेही मुलांच्या भावनांशी खेळणे चालू केले. स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची
क्षमता कमी झाली. पाश्चात्यांच्या अनुकरणामधे त्यांच्या प्रमाणे राहणी, खाणे पिणे ,वागणे बोलणे घेतले पण त्यांचा स्वावलंबन हा गुण घेणे आपण विसरलो. मुलांचा
बुध्यांक कदाचित वाढला पण भावनांक मात्र कमी झाला.
एका प्रसंगात एक गोड गोजिरा मुलगा जोशात
येऊन आपल्या वडिलांना प्रेमळ सूचना देतोय. बाबा आपली गाडी फास्ट घ्या. पाठीमागच्या
सगळ्या गाड्या पुढे गेल्यासुद्धा. वडील म्हणतात , जाऊदे बाकीच्या गाड्या पुढे गेल्यातर . आपण आपल्या स्पीडने जाव , काही प्रॉब्लेम यायला नको. हुशार बालक तत्परतेने
उत्तरते, माझ्या स्टडीच्या बाबतीतही
तुम्हाला हेच सांगायचे आहे. अमका पुढे गेला म्हणून माझ्यावर रागावू नका. मी माझ्या
कुवतीप्रमाणे आणि मला जमेल तसे शिकणार. फक्त मी जे काही करीन ते उत्तम करीन .
तुम्ही पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा. हा आत्मविश्वास आजच्या पिढीमधे यायला हवा.
..................सविता नाबर
No comments:
Post a Comment