Tuesday 7 March 2017

अपेक्षांचे ओझे

     

        कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन! म्हणायला किती साधे सोपे शब्द आहेत हे ! पण खरेच फळाची अपेक्षा न ठेवता आपण काम करतो का? नाते कुठलेही असले तरी कळत नकळत अपेक्षा मनात येतातच. पतीपत्नी, सासू सुन, नणंद भावजय, जावा जावा, मित्र मैत्रिण, भाऊ बहिण, नाते आले की अपेक्षा आलीच. ती कुणी करावी याला काहीही अर्थ नसतो. एकजण काम करत गेला की त्याच्याबद्दल दुसर्‍याची अपेक्षा वाढतेच. यालाच गृहीत धरणे असे म्हणायला हरकत नाही. लहानपणापासून ही मनोधारणा आपसूकच आपल्या मनात तयार होत असते.
   जेव्हा कुठलीही अपेक्षा नसते तेव्हा अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी येत नाही. मुलांच्या पालकांकडून आणि पालकांच्या मुलांकडून अशाच अपेक्षा असतात. मुलाने आज्ञाधारकपणे वागावे. अभ्यास भरपूर करावा. चांगले मार्क्स मिळवून उत्तम करियर करावे ही जशी आई वडिलांची अपेक्षा असते, भलेही मुलाला पालकांनी ठरवलेल्या करियरमध्ये रस असो वा नसो. तशीच अपेक्षा मुलांची पालकांकडून असते. मुलांच्या तोंडातून काही बाहेर पडायचा अवकाश की त्यांच्या समोर ती गोष्ट हजर पाहिजे ही इच्छा असते. बर्‍याच वेळेला त्यासाठी आईवडिलांना काय आणि किती कष्ट पडतात याची जाणीव नसते. आणि जेव्हा पालक त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाहीत तेव्हा अपेक्षाभंगाचे दु:ख मुलांच्या पचनी पडत नाही. कधी संवेदनशीलतेचा अतिरेक होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबला जातो. मित्रांमधले एकमेकावर असणारे पियर प्रेशर हाही एक अपेक्षा ठेवण्याचाच प्रकार. त्यावेळी त्या व्यक्तीने सजग आणि सावध असणे  महत्वाचे. विशेषत: शाळेमध्ये सगळ्या मुलांकडे असणारी वस्तु आपल्याकडे असलीच पाहिजे असा अलिखित नियम होऊन जातो आणि त्याची पूर्ती झाली नाही की निराशा मुलांच्या पदरी येते. मित्रांमध्ये वावरणे आपल्याला कमीपणा आणणारे ठरू नये ही धडपड असते.
      एक दुकानदार रात्री दुकान बंद करत असतो. एवढ्यात तोंडात पाकीट धरलेला कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवरच्या पिशवीत दुकानदार सांगितलेले सामान भरतो. तो कुतुहलापोटी कुत्र्याच्या मागोमाग जातो. कुत्रा बस स्टॉपवर थांबतो. त्याला पाहिजे ती बस मिळाल्यावर कुत्रा बसमध्ये चढतो. त्याच्या गळ्याच्या पट्ट्यात त्याला कुठे उतरायचे त्याची चिठ्ठी आणि पैसे असतात. आश्चर्यचकित झालेला कंडक्टर कुत्र्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्टरला खुणावतो आणि बस थांबल्यावर उतरतो. दुकानदार त्याच्या मागोमाग असतोच. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोनतीन वेळा वाजवल्यावर दार उघडले जाते. बाहेर आलेला मालक कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालतो. कुत्रा बिचारा शेपूट घालून दूर कोपर्‍यात जाऊन बसतो. दुकानदार मालकाला याबद्दल विचारतो, तो संतापून सांगतो, “शेवटी या कुत्र्याने मला उठायला लावलच. दाराची किल्ली विसरला.” तुम्हाला हसू आले असेल ना! कथा आंतरजालावरची. रुपकात्मक असली तरी माणसाच्या स्वभावात असणारी अपेक्षांची मांदियाळी वास्तवात किती खरी असते याचे अगदी जिवंत उदाहरण आहे. दुसर्‍याकडून अपेक्षा ठेवणे जितके बरोबर नाही तितकेच लोकांच्या खुषीसाठी आपणही त्यांची अपेक्षापूर्ती करत रहाणे बरोबर नाही अन्यथा गोष्टीतल्या कुत्र्यासारखी गत होते.
      कार्यालयात कितीही काम केले तरी वारिष्ठाची अपेक्षापूर्ती होणे कठीण असते. सहकार्‍याला प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणार्‍या कनिष्ठाचा विरस होतो. याचा परिपाक म्हणून काम करताना ढिलाई, दिरंगाई, कामचुकारपणा होऊ शकतो. जिथे अपेक्षा नसतात. तिथे मनाचा मोकळेपणा, प्रेम , विशालपणा छान काम करतो. नात्याचे बंध मजबूत होतात. अपेक्षांच्या नाजुक धाग्यावर उभे ठाकलेले नात्यांचे बंध मात्र तकलादू ठरतात. आपल्या मनाच्याही नकळत, अपेक्षा निर्माण होतात. कधी दुसर्‍याकडून तर कधी स्वत:कडूनही. म्हणूनच एकदा का पहिल्या नंबराची चटक लागली की दरवेळी पुरी व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. अपयशाची चव चाखल्याशिवाय यशाचे गमक काय हे कळत नाही. कधी कधी अवास्तव अपेक्षा आपण स्वत:बद्दल ठेवतो आणि त्या ओझ्याखाली स्वत:च दबून जातो. मग प्रश्न उभा राहतो जग काय म्हणेल याचा. आपण स्वत:ला जराशीही उसंत, सवड न देता एका दडपणाखाली आयुष्य पार पाडत राहतो. कशाला बाळगायचे हे अपेक्षांचे ओझे?
     .....................................सविता नाबर

No comments:

Post a Comment