Tuesday, 7 March 2017

कालाय तस्मै नम:

     

      काली गेला बिचारा. काय करावं बायकोन . तिला काहीतरी करून उभ राहिलच पाहिजे. शेवटी काळ हेच औषध आहे तिच्या सावरण्यावर.” आजी गेल्या, त्यांचे वयही बरच झाले होते म्हणा!  पण शेवटी आपल माणूस आपल्याला हवच असत ना! काळच विसरायला लावेल त्यांच्या जाण्याचं दु:ख. सांत्वन नेहमी या एकाच वाक्यात दडलेले असते. काळासारखे दुसरे प्रभावी औषध नाही. ज्या घरात मृत्यू झाला , त्या कुटुंबियांसाठी मात्र हे खरोखरीचे सत्य असते. जसजसे दिवस पुढे जातात तसतशी वियोगाच्या दु:खाची तीव्रता कमी होत जाते. आपल्या मानसिक जखमा, नुकसान भरून यायला काळ हाच एक उपाय असतो. आजच्या काळात सगळ्यात महाग गोष्ट काय आहे? तुम्ही म्हणाल पैसा. पण सोननाण, पैशापेक्षाही मौल्यवान वस्तु अस्तीत्वात आहे पण ती दिसत नाही. जाणवते पण हाताळता येत नाही. ती म्हणजे वेळ, काळ. तो अमूर्त स्वरुपात आहे. जो कुणाच्याही हातात नाही. पण त्याच्या हातात मात्र सर्व काही आहे. आपण जगतो, वाढतो, मरतो ते काळाच्या टप्प्यात.
     एकदा राजाला आपल्या गरीब मित्र शंकरची एकदा दया आली. शंकर कुठलेही काम वेळेत करत नसे. पण आपल्याला कोणी काम देत नाही म्हणून अशी दरिद्री अवस्था झाली असल्याचे तो सगळ्यांना ऐकवत असे. राजाने त्याला आपल्या खजिन्यातले सोने, नाणे घेऊन जायला सांगितले. जेवून खाऊन तो थैल्या घेऊन घरातून निघाला. मग त्याला वाटले वामकुक्षी घेऊनच निघावे. झोप झाल्यावर त्याने वाटचाल सुरू केली. उन्हामुळे पुन्हा विश्रांतीसाठी थांबला. वाटेत जादूगाराचा प्रयोग चालला होता. त्याने त्याला मोह घातला. वेळ असाच निघून गेला. राजवाड्यापर्यन्त पोहोचेपर्यंत अंधार पडला . राजाच्या सेवकांनी त्याला आता जायला अडवले. जे सहजा सहजी शंकरला मिळाले असते तेही त्याने वेळेत न केल्याने गमावले.
   एका वर्षाचे महत्व विचारा जो परीक्षेत नापास झाला आहे, एका महिन्याचे महत्व जीने वेळे आधी बाळाला जन्म दिला आहे, साप्ताहिकाच्या संपादकाला जाणवते आठवड्याचे महत्व, प्रेमीजनांना वाट पाहायला लावणारे असते तासाचे महत्व, तर एका मिनिटांनी ज्याची ट्रेन, बस, प्लेन चुकले आहे त्याला कळते मिनिटाचे महत्व, एका सेकंदाने अपघातातून बचावला त्यालाच जाणवते सेकंदाचे महत्व. काळ अगाध आहे. तरीही आपण तो सेकंद , मिनिट, तास, दिवस, वर्ष असे मोजत असतो. आपण त्याला वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ अशी नावेही दिली आहेत. वेळेला अर्थ आहे आणि तेवढेच महत्वही आहे. तो कधी भराभर पुढे पळत असतो तर कधी कासवाच्या गतीने हळूहळू जात असतो. पण तो पुढे सरकत असतो हे मात्र नक्की. तो कसा जातो हे बघणार्‍याच्या दृष्टीवर अवलंबून असते. काल जे होते ते आज नाही, आज जे आहे ते उद्या असणार नाही. कालचा काळ गेलेला आहे. आजची वेळ ही एकदाच येते. पुन्हा येत नाही. मात्र त्याचे अस्तित्व कायम आहे.
   एकदा एक कामाणे झपाटलेला माणूस एक दिवस कामातून सुट्टी घ्यायची ठरवतो. त्याने मिळवलेल्या संपत्तीमुळे आता तो आयुष्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकणार असतो. हे त्याच्या  मनात येते न येते तोच यमदूत त्याच्यासमोर उभा राहतो. तो माणूस यमदूताची विनवणी करून थोडा वेळ मागून घेतो. यम तयार होत नाही. शेवटी एक तास तो आपल्या कुटुंबियांबरोबर घालवण्यासाठी मागून घेतो. तरीही यम तयार होत नाही. शेवटी दोन वाक्ये लिहिण्यासाठी तो एक मिनिट मागतो. “मित्रहो, आयुष्यात जी संपत्ती तुम्ही मिळवली आहे त्याचा वेळेवर आणि योग्य उपभोग आपल्या कुटुंबियांबरोबर घ्या.” दिवसाचे ८६४०० सेकंद ही आपली वेळेची बँक असते. वेळेचा अपव्यय फार महागात पडतो. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच तापल्या तव्यावर, त्याचवेळी पोळी भाजून घ्यावी ही म्हण प्रचलित झाली. तोंडातून सुटलेला शब्द, भात्यातून सुटलेला बाण, टळलेली वेळ पुन्हा माघारी येत नाही. म्हणूनच जो काळाबरोबर रहातो, त्याचे यश निश्चित असते.

                           ---------------------------सविता नाबर   

No comments:

Post a Comment