Tuesday, 7 March 2017

हे बंध रेशमाचे

     

       मुंबईला पावसाचे धुवाधार बरसणे नवीन नाही. त्यादिवशी २६ जुलै २००५ सकाळपासून पाऊस म्हणावा तसा नव्हता. पण दुपारी सुरू झाला. आणि हाहा म्हणता त्याने रौद्र रूप कधी आणि कसे धारण केले कळलेच नाही. आदल्या दिवशी घरातल्या एका वाढदिवसामुळे मी दादरलाच होते. कांदीवलीला ,घरी जाण्याचा माझा मनसुबा, धुवाधार पावसामुळे नंतर जाऊ म्हणून पुढे ढकलत होते. घराच्या खिडकीतून समोर फक्त पाण्याचा पांढरा पडदा दिसत होता. सगळ्या लोकल्स जिथल्या तिथे थांबल्या होत्या. त्यातली माणसेही आहे तिथेच पुतळ्यासारखी थांबली होती. त्यादिवशीचे पावसाचे रूपच भयानक होते. प्लॅटफॉर्मवर असलेली माणसे कुठेही हलू शकत नव्हती. तहान, भूक, नैसर्गिक विधी या कशाचीच तमा निसर्गाला नव्हती. रस्त्यातून चालत जाणही शक्य नव्हतं. बसेस जागच्या जागी स्तब्ध. वाटेत जागोजागी तलावच झाले होते. जवळपासच्या चाळीमधून, ऑफिसमधून, इमारतींमधून गरजू लोकांना पिण्याचे पाणी, खाण्यासाठी उसळपाव, वडापाव असे खाद्यपदार्थ पुरवले जात होते. त्यावेळी कुठल्याही जाती धर्माची आडकाठी या सेवेवर आली नव्हती. निव्वळ माणुसकीच तिथे एकमेकांना सहाय्य करत होती. एका व्यक्तीने तर स्वत:चा जीव धोक्यात घालून २५-३० जणांना पाण्याच्या लोंढयातून वाचवले. तर आणखी एक जण बाकीच्यांचे प्राण वाचवताना स्वत:चा जीव गमावून बसला. हे अनोळखी लोकांशी असलेले एकमेकांचे नाते कोणते होते? कुठल्या बंधाने लोकांना मदत करण्याचे ,त्यांचे जीव वाचवण्याचे हे माणुसकीचे काम केले? एकमेकांशी ना रक्ताच्या ना नात्याच्या धाग्याने जोडले गेलेले लोक अनोळखी रेशीम धाग्यांनी जोडले गेले होते.   
     लहानपणी चिंचा ,बोरे ,आवळे खाताना मैत्रीणीला चिमणीच्या (आपल्याच) दाताने तोडून देताना कधी उष्ट या संज्ञेचा अर्थ जाणवला नाही. उमगत होता तो त्यामागचा भाव, मैत्रीची भावना. त्यामागच प्रेम आणि ओढ. तत्कालिक कट्टी आणि बट्टीमुळे त्या मैत्रीच्या नात्याला आणखी घट्टपणा यायचा. रूसव्या फुगव्यांमुळे मैत्रीचा धागा मजबूत व्हायचा. अबोला किती वेळ होता हेही लक्षात राहायचं नाही. भांडणाच कारण तर नाहीच नाही. दोन वर्षांच एक लहान मूल ,घरातल्या लाडक्या मांजराला बर नाही म्हणून इंजेक्शन दिल्यावर जिवाच्या आकांताने रडायला लागते. पाय आपटून आपला निषेध दर्शवते. त्या इंजेक्शनच्या टोचण्याची बोच त्या लहान मुलाला दुखावून जाते. एक मुका प्राणी आणि एक निरागस बालक यांच्यातल्या प्रेमबंधाचे दर्शन आपल्याला होते. कोणतही काम यशस्वी होते ते टीमवर्कच्या जोरावर. त्या ग्रुपमधल्या सगळ्यांचाच हातभार यशाला लागलेला असतो.  
       खरतर, माणसाच्या अन्न ,वस्त्र, निवारा या गरजा भागल्यानंतर तेवढीच महत्वाची गरज असते, संवादाची. आम्ही काही काळ बंगलोरला असताना सुरूवातीला हे फार जाणवायच. त्यासाठी मी कानडी बोलायला, लिहायला, वाचायलाही शिकले. कन्नडिगांची संस्कृती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तिथल्या महाराष्ट्र मंडळात, स्त्री सखी ,आपुलकीमधे जायला लागले.  तसे बंगलोर माझे झाले. मैत्रीणिंमुळे त्या गावाशी माझे बंध बांधले गेले. नात्याला अनेक पदर असतात. प्रेम, त्याग, मैत्री, करुणा, विश्वास, दया, अशा अनेक पातळीवर नाते दृढ होत असते. नात्याचे बंध जपताना कधी त्याला हळुवारपणे जपावं लागते तर कधी चुचकारावे लागते. कधी आदर दाखवावा लागतो. तर कधी थोडसं घाबरावही लागते. नात सासू सुनेच, जावा जावांच, नणंद भावजयीच ,दीर वाहिनीच, जावई सासर्‍याच ,आई लेकीच, बाप लेकाच ,या नात्याच्या वीणीमधे मजबूत असतात ते प्रेम, विश्वासाचे बंध ! प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हणतात किंवा एखादी स्त्री काही चाकोरीबाहेरचे काम करत असेल. तिने वेगळ्या प्रकारचा विजय मिळवला असेल तर तिला सहाय्यभूत ठरणार्‍या गोष्टींमधे प्रामुख्याने तिच्या पतीचा सहभाग असतो. पतीने तिच्यावर दाखवलेला विश्वास तिला जग जिंकण्याचे बळ देतो. रेशमाचे हे बंध जपताना आवश्यक असते ती समोरच्याला समजून घेण्याची भावना. त्यामुळेच भाव बंध दृढ होतात आणि नाती जपली जातात.
                   ------------------सविता नाबर

No comments:

Post a Comment