Tuesday, 7 March 2017

हा छंद जीवाला लावी पिसे …………….

     

         क्षा बंधन म्हटले की मला मी साठवलेल्या राख्यांचा संग्रह आठवतो. राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला ओवाळून बांधलेली राखी दुसर्‍या दिवशी माझ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या संग्रहात डेरेदाखल व्हायची. राखीचे मिरवणे एक दिवस आणि संग्रही वास्तव्य अनेक वर्षे असा परिपाठ होता. त्यावेळी स्पंज, टिकल्या, कलाबूत , प्लास्टीकची चित्रे अशा वस्तूंनी राखी सुशोभित केलेली असायची. दर काही दिवसांनी ती पेटी उघडून बघण्याचा छंद लागला होता. आपल्याकडे किती आणि काय काय वस्तु जमा झाल्या आहेत हे पहाण्याचा. त्यात कुणीतरी लहानपणी दिलेली अत्तराची कुपीसुद्धा होती. पेटी उघडली की छानसा घमघमाट यायचा. कधी कुणी दिलेली छोटीशी अत्तराची कुपी पेटीत ठेवता ठेवताच सांडून संपून गेलेली असायची आणि त्या अत्तराचा वास पेटीला लागलेला असायचा. आजही तसा अत्तराचा वास आला की माझा खजिना मला आठवतो. कधी संग्रह बघण्यासाठी तर कधी निव्वळ अत्तराचा वास हुंगण्यासाठी हा माझा छंद डोके वर काढून आजूबाजूला पसरायचा. त्यात काय नव्हते ? मोती, मणी, बाहुलीचे छोटे दागिने ,सिनेमाच्या गाण्यांची पुस्तके जी चार आण्याला मिळायची. कीचेन, ब्रुच, विविध आकारांची रंगबिरंगी बटणे. आज ह्या वस्तु एखाद्याला कवडीमोलाच्या वाटतील. पण एकेकाळी या संग्रहाने माझे मन रिझवले होते. पण अलिबाबाची गुहा उघडल्याचा, अमर्याद खजिना मिळल्याचा आनंद असायचा.
        स्वान्त सुखाय असा छंद असणे खूपच गरजेचं आहे. कारण आपले भावविश्व त्यामध्ये गुंतलेले असते. छंदाच्या गुंतण्यामध्ये आपले तनमन गुंगवून टाकणारी शक्ति असते. जगापासून दूर जाऊन स्वत:मध्ये रमवणारी, स्वत:ला अंतर्मुख करायला लावणारी, आतमध्ये डोकवायला लावणारी एक अद्भुत शक्ती असते. कुणाला तिकीटांचा असतो, तर कुणाला वेगवेगळी नाणी जमवण्याचा छंद असतो. कुणाला विविध चित्र जमवण्याचा. कुणाला गाणी संग्रही ठेवण्याचा. स्वत:च्या समाधानासाठी असतोच . पण शाळकरी वयात त्याचे संग्रही आणि वैभवी मूल्य अगणित असते. मित्र, मैत्रिणींना ते वैभव दाखवण्याचा किती उत्साही आणि श्रीमंत प्रसंग असतो तो. माझ्याकडे खजिन्यात कायकाय आहे हे पुन्हापुन्हा उघडून पाहण्यातही आनंद असतो. मैत्रीणींना प्रत्येक वस्तु दाखवताना त्या वस्तूशी निगडीत आठवण सांगताना मन अगदी समाधानाने भरून येत.
      तुलिका माझी पुतणी, चार वर्षांची होती. तिच्या वाढदिवसाला तिला मी किचन सेट भेट दिला होता. त्या सेट मध्ये गॅस ,कुकर, छोटी छोटी भांडी, कपबश्या ,पळी ,चमचे अस बरच काही होत. तेही स्वयंपाकाच्या ओट्यासोबत!  स्वारी जाम खुश! तिच्या बाबाने मात्र तिच्यासाठी रिमोटवर चालणार्‍या गाड्या, त्यांच्या भल्या मोठ्या ट्रॅकसकट आणल्या होत्या. सहज प्रवृत्ती कशी असते पहा. स्त्री सुलभ आकर्षण तिला फक्त किचनसेटच वाटलं. तिला त्या गाड्यांमध्ये बिलकुल रस नव्हता. रात्री झोपताना अख्खं किचन डोक्याशी घेऊन झोपली. कुणीतरी पळवेल म्हणून. तो सेट ती जिवापाड जपत होती. जसा तिचा संसारच. तिला कुणी सांगितलं नाही की बाई तू या खेळण्यांशीच खेळ. या भातुकली बरोबरच बाहुल्या, आणखी तर्‍हेतर्‍हेची खेळणी जमा करण्याची तिला आवड होती. आणि खेळणी व्यस्थित ठेवण्याचीही. काही बाही जमा करण्याचा छंद प्रत्येकालाच असतो ! आणि त्या वस्तु निगुतीन जपण्याचाही. हाच बालपणीचा आनंद मोठेपणीही टिकवता आला तर!  स्वत:चे मीपण विसरायला लावणरा छंद. त्याक्षणापुरते तरी हेवेदावे, मत्सर,असूया,स्पर्धा हे सगळे दुसर्‍या जगात जाते. आणि उरते ते फक्त आपले स्वत:चे अवकाश.
      योगशास्त्रात आहार, विहार, आचार आणि विचार हे माणसाच्या आयुष्याचे चार आधार स्तंभ मानले आहेत. लोक आहार, आचार ,विचारांचा अगदी प्रामुख्याने विचार करतात . पण विहार, जो दिवसाकाठी आपले मन प्रसन्न ठेवायला कारणीभूत होतो, ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते , असा विरंगुळा मात्र बाजूला पडतो. कार्यरत रहाताना विहाराचे अस्तित्व अगदी टिकली एवढे. पण सुंदर मुखड्याला काळ्या तीळाने येणारी शोभा हा छंद आपल्या जीवनाला आणत असतो. रोजच्या कामाच्या धबडग्यात थोडा वेळ काढूया आणि जरा विसावू या वळणावर,या छंदावर !
         ..............................सविता नाबर


No comments:

Post a Comment