Monday, 6 March 2017

तो राजहंस एक !!

     

       त्या दोघी जुळ्या बहिणी. एक कमल आणि दुसरी सुंदर. त्यांच्या जन्मान त्यांच्या आजोबांना, आजीला, वडिलांना कुणालाच फारसा आनंद झाला नव्हता. दोघी मुलीच झाल्या म्हणून. आनंद झाला होता तो फक्त त्यांच्या आईला. आपल्या दोन्ही लेकी हाती पायी धड आहेत आणि सशक्त आहेत यातच त्यांच्या आईला मोठ समाधान वाटायचं. दिसायला सुंदर होती म्हणूनच तीच नाव सगळ्यांनी मिळून सुंदर ठेवलं होत. जशी मोठी व्हायला लागली तशी सुंदर त्यातल्यात्यात घरातल्याना आवडायला लागली. मुलगी असली म्हणून काय झालं निदान दिसायला तरी छान होती म्हणून. कमल मात्र दिसायला सामान्य होती. तिचे कुणी फारसं लाड करायचे नाही. दोघी बरोबरच वाढत होत्या. पण जडण घडणीत खूप फरक पडत होता. कमल अतिशय लाघवी, कामसू, अभ्यासू होती. शिकायला हुशार त्यामुळे शाळेत नेहमी पहिली यायची. सुंदर मात्र आपल्या सौंदर्यातच मश्गुल! सुंदरला निसर्गान आणखी एक देणगी दिली होती. तीची चित्रकला खूप छान होती. वयात आल्यावर सुंदरला मागणी आली तिचा विवाह झाला. कमलच्या हुशारीमुळे ती उच्च विद्याविभूषित झाली. एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी झाली. कमलला तिच्यासारखाच हुशार जोडीदार मिळाला. सुंदर गाडी, बंगला, ऐषारामात होती. सुखासीन आयुष्यात लोळत होती. सुस्तावली होती. तिच्यातली कला लोप पावली होती. कधीकाळी ती छान चित्र काढायची हे ती विसरून गेली होती. सामान्य जीवन जगत होती. आणि कमल मात्र रोज कामाचं एकेक नवीन आव्हान पेलत होती. कंपनीतर्फे देश परदेशात जात होती. नव्या उत्साहाने दिवस सुरू करत होती. कला गुण दोघींकडे होते पण.... कस्तुरी मृगाच्या नाभीत कस्तुरी असते पण मृगाला त्याची कुठे कल्पना असते? आपण तर माणस आहोत . आपल्याकडे काय आहे याची जाणीव आपल्या सारख्या बुद्धिमान प्राण्याला असायला काहीच हरकत नाही. पण इथेच तर घोडं पेंड खातं. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी.
       एक नामवंत जाहिरात मॉडेल. जेव्हा त्याला मॉडेलिंग संबंधी विचारणा झाली तेव्हा मॉडेलिंग म्हणजे काय , ते कशाशी खातात याची काहीच माहिती त्याला नव्हती. तो खरतर खेळाडू होता. घरची पार्श्वभूमी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित. पण जेव्हा मॉडेलिंगची संधी आली, ती त्याने आव्हान म्हणून झेलेल. एक नवीन क्षेत्र म्हणून तर स्वीकारलच पण त्याच्या कुवतीचाही त्यान अनपेक्षित अंदाज बांधला. आपल नाण किती खणखणीत आहे हे त्यांना योग्य प्रकारे पटवल. जाहिरात फिल्म करणारे त्याला राजी झाले. त्यान आपला वकुब योग्य प्रकारे ओळखला. तुम्ही याबद्दल कदाचित ऐकलं किंवा वाचलही असेल . तो म्हणजे प्रसिद्ध जाहिरात मॉडेल मिलिंद सोमण. आज तो एक चांगला नट म्हणूनही ख्याती मिळवून आहे. आपली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू, सायना नेहवाल ही लहानपणी नकोशीहोती. तिच्या जन्मानंतर तिच्या आजीने तर तिचे तोंड पाहीले नव्हते. पण चेंडू उसळी मारून वेगाने वर उठला. आणि क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवून नकोशीच रूपांतर तिने हवीशी मध्ये केल.
     निसर्गान प्रत्येकात काहीतरी सुप्त शक्ति , कला, गुण पेरुन ठेवलेले असतात. कधी ते सहजपणे दिसतात तर कधी घासून पुसून घ्यावे लागतात. कुणीच असा जगात करंटा नाही ज्याच्याकडे काहीच गुण नाही. प्रत्येकजण एकमेवाद्वीतीय आहे. स्वत:ला एकवार त्रयस्थ नजरेन पाहावं. प्रत्येक वेड पिलु राजहंस असतच असत. गदिमानी म्हटलेल आहे ते अगदी तंतोतंत खरं आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख , होते कुरूप वेडे पिलु तयात एक, पाण्यात पाहताना , चोरूनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक.  

              ----------------------सविता नाबर       
     

No comments:

Post a Comment