“ राग आला की मला नवरा डोंगरात न्यायचा. आणि झाडाच्या
काठीनं अंगावर वळ उठेस्तोवर मारायचा . त्याच्या चिडण्याला काय सुदीक कारन लागायचं
न्हाई. कधी कामावर भांडान झालं ,राग
माझ्यावर. कधी मनासारखं जेवन झालं नाही ,तर राग माझ्यावर.
दोघी सवतीनाबी मारत होता. पर माझ्यापेक्षा जरा कमी. मी थोरली.” माझ्या कडे काम
करणारी लक्ष्मी सांगत होती. नवर्याच्या माराला कंटाळून एकटीच्या जिवावर दुसर्या
गावाला येऊन मेहनत करून खात होती. आणि तिच्या तेरा चौदा वर्षाच्या मुलाच्या पुढच्या
शिक्षणासाठी त्याला घेऊन एका खोलीच बिर्हाड थाटल होत. त्या दिवशी तिचा
वटसावित्रीचा उपास होता. तिने सकाळी काहीही न खाता कडक उपास केला होता. वटसावित्रीचा
उपास करण्यामागच कारण हाच नवरा जन्मोजन्मी मिळो. हीच एकमेव श्रद्धा. ज्या नवर्यासाठी
उपास करत होती तो तर तिला मारतच होता . त्याला बायकाही लक्ष्मी धरून तीन होत्या.
शिवाय त्याची आणखी एक सखीही होती. म्हणजे पुढच्या जन्मी हाच नवरा मिळण्यासाठी
त्याच्याबरोबर त्याचा हा सगळा गोतावळा आलाच. तिलाच विचारलं,
इतक मारणारा हाच नवरा तुला जन्मोजन्मी मिळावा अस वाटतय? तुझ
भावनाविश्व ज्यान व्यापलय, तो तुझ्यासाठी काय करतो? तुला खायला घालायची भ्रांत असताना तुझ्या उरावर दोन सवतींना आणून बसवलय.
सत्य परीस्थिती काय आहे याची जाणीव लक्ष्मीला करून दिल्यावर ती वटसावित्रीच्या
व्रताबाहेर आली. रंगान तुकतुकीत काळी असणार्या लक्ष्मीचा चेहरा मात्र कायम
प्रसन्न ,हसतमुख होता. डोळे अतिशय बोलके होते. अल्पशिक्षित
लक्ष्मी समजूतदार होती. डोळे झाकून काही संस्कार बिनबोभाट पार पाडणार्या
लक्ष्मीला लेकाच्या भविष्याची काळजी होती. त्यासाठी तिन घरावर तुळशीपत्र ठेवलं
होत. मी सांगितलेल्याचा मातीतार्थ तिला कळला. तिने उपास करण सोडून दिल. यामागे
हेतु निव्वळ तिने उपास सोडून द्यावा हा नव्हता. तर उपासामागचा कार्यकारणभाव कळावा
हा होता. तो तिला कळला.
माझ्या परिचयातल्या एक मावशी .त्यांना
उपासाच वावड. कारण त्यांच्या प्रकृतीला उपवास सोसवत नव्हता. मुलांसाठी संस्कारवर्ग
चालवण्यापासून ते हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांची शुश्रूषा करण्यापर्यंत,गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करण अशी
बर्याच प्रकारची सेवा त्या करत. निसर्गाशी मैत्री हे
त्यांचं ब्रीद होत. तर पर्यावरण त्यांचा श्वास होता. पतीचीही सेवा त्यांनी खूप
केली. शेवटच्या काही दिवसात तर काकाना दिसायच बंद झालं आणि त्या काकांचे डोळे
झाल्या. त्यांना चालता येइना, स्वत;च्या
हाताने काम करता येईना. तेव्हा त्यांची आधाराची काठी झाल्या. काकांनी तू आहेस
म्हणून मी आहे ,असा स्वत:च्या अस्तित्वाचाच दाखला त्यांना
दिला होता. ही सत्यवानासाठी खस्ता खणारी सावित्रीच नव्हे काय ?
राजा
अश्वपती आणि राणी मालवी यांच्या पोटी सावित्री जन्मली. सूर्य देवते (सवित्रु ) च्या
आशीर्वादाने जन्माला आलेली म्हणून सावित्री . सत्यवानाशी विवाह झाल्यावर
त्याच्याबरोबर जंगलात राहायला गेली . पतीसाठी उपास पत्करला. ज्या राजकन्या सावित्रीन
जगाच्या अंतापर्यंत यमाचा पाठलाग करून,त्याला द्वीधा मनस्थितीत पकडून आपल्या पतीचे,
सत्यवानाचे प्राण वाचवले, तिच्या वंशजानी नुसतच व्रताच
प्रतिकात्मक रूप उचलल. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचा पांढरा शुभ्र बुंधा
पाहिला की एखाद्या व्रतस्थ साधूची आठवण येते. वडाला गोल गोल फेर्या घालून
स्त्रिया त्याला दोरा गुंडाळतात. हळदी कुंकू वाहतात. वडावर हळद कुंकू
वाहण्यापेक्षा, त्याची फांदी तोडून पूजा करण्यापेक्षा जर
त्याचे रोप जिथे शक्य असेल तिथे लावले, तर खर्या अर्थाने
वडाची पूजा होऊ शकेल. आणि पर्यावरणालाही हातभार लागेल. दुसरी गोष्ट उपासाची. उपसाच्या
नावाखाली जे खाऊ नये ते खाल्ले जाते. साबुदाणा ,शेंगदाणे, बटाटा वेफर्स, लाडू ,चिक्की,या शरीराला अयोग्य गोष्टी खाल्ल्या जातात. आपल्या शरीरात फक्त पचन
संस्थेला खर्या अर्थी कधीच आराम मिळत नाही. उपवास करताना ,लंघन
करून पोटाला जर आराम दिला तर ते दुप्पट कार्यक्षमतेने काम करेल. जर लंघन आणि
पर्यावरण दोन्हीही साधल, तर वटपौर्णिमेचा दिवस खर्या
अर्थानं साजरा होईल.
.............................सविता नाबर
No comments:
Post a Comment