वर्हाड निघालय लंडनला हा एकपात्री प्रयोग पुन्हा
एकदा पाहण्याचा योग आला. पाश्च्यात्य संस्कृतीतला जॉन बहिर्दिशेला जातो तेव्हा आपला
ग्रामीण बबन्या त्याला सांगतो, ऑल वावर इज अवर. गो एनिवेअर.
ही आपल्या कडची मोकळी ढाकळी कल्पना. गंमत म्हणून खूप हसू येते. पण वास्तवात हे
बरोबर आहे का? राकट आणि कणखर दगडांच्या देशाला महासत्ता
बनवायचे असेल तर जीवनावश्यक सुविधेपासून सुरुवात करायला पाहिजे.
स्वच्छ
भारत अभियान सरकारने अमलात आणायला सुरुवात केली आणि शौचालयाचा प्रश्न बर्यापैकी
धसास लागला. विषय चर्चेला फारसा चांगला नाही. पण अत्यावशयक आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासारखीच अत्यंत निकडीची गोष्ट
म्हणजे शौचालय. ते घरात असणे, किंबहुना बंदिस्त असणे महत्वाचे.
पण आपल्याकडे त्या गोष्टीला अतिशय गौण स्थान दिले आहे. कोणताही शारीरिक विधी
उघड्यावर करणे, मनुष्यप्राण्याला शोभा देत नाही. अगदी कुत्री
मांजरे सुद्धा आपल्या विष्ठेवर माती टाकतात. मग सर्व प्राणिमात्रात माणूस हा बुद्धीचा
उपयोग करणारा आहे तरीही पशुवत वागणे का? अजूनही शौचालय नसणे
हा काही फार मोठा प्रश्न वाटत नाही. ग्रामीण भागात स्वत:ची घरे बांधली जातात पण
त्याबरोबरची शौचालयाची निकड लक्षात येत नाही. हा प्रश्न महिलांच्या दृष्टीने तर
फार महत्वाचा आहे. तोंड लपवून किंवा अंधाराचा आधार घेऊन नैसर्गिक विधी उरकणे
यापरते दु:ख ते कोणते? त्यातून स्त्री तरुण असेल, वयात येणारी मुलींसाठी तर ही अगदी नामुष्किची गोष्ट असते. त्यामुळे योग्य
वेळेसाठी वाट बघता बघता शरीरावर अत्याचार होतो आणि यातूनच व्याधी सुरू होतात.
खाजगी बाबतीत ही समस्या आहेच. पण
ज्या सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये स्वच्छ प्रसाधन गृहांची
आवश्यकता असते तिथे बर्याच ठिकाणी त्यांचा अभाव असतो किंवा ती इतकी अस्वच्छ असतात
की विद्यार्थिनी शाळेतच जायला राजी होत नाहीत. बर्याच वेळा शाळांना स्वच्छतागृह
नसल्याने मुलींची शाळा दहाव्या बाराव्या वर्षी बंद होते. ही आहे आपल्या
सावित्रीच्या लेकींची शोकांतिका. या पार्श्वभूमीवर तिघी स्त्रियांनी उचललेले पाऊल
धीराचे आणि प्रगतीचे आहे. स्वच्छतेचे तर आहेच आहे.
चैताली
राठोड हिने सासरी शौचालय नाही म्हणून लग्नातील रुखवताला नकार देऊन आईवडिलांनी
शौचालय द्यावे अशी गळ घातली. मागणी विचित्र होती पण रास्त होती. त्यांनी चैतालीला
रेडिमेड शौचालय देण्याचा निर्णय घेतला. सुवर्णा लोखंडे घरची परिस्थिती हलाखीची
असल्याने बचतगटाकडून शौचालयासाठी कर्ज काढले. आपल्या वाट्याला आलेली कुचंबणा
मुलीच्या वाट्याला येऊ नये आणि स्वच्छता राहावी हा तिचा दृष्टीकोन. तर वाशिम मधील
सायखेडा इथल्या संगीता आव्हाडे हिला त्यासाठी 13 वर्षे संघर्ष करावा लागला. विवाहानंतर
सासू सासर्यांना सांगूनही परिस्थितीत फरक पडला नाही. तिने मंगळसूत्र विकून शौचालय
बांधले. आपल्या 12 वर्षांच्या मुलीला आपण सहन केलेली कुचंबणा भोगावी लागू नये हा
त्यामागील हेतु. स्वच्छ अभियान अंतर्गत घर तेथे शौचालय उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागात
जिथे घरे लहान आहेत तिथे घरामधे शौचालय असणे अवघड असते. लहान घरांची संख्या जास्त.
त्यामुळे एकापेक्षा जास्त कुटुंबांनी एकत्र येऊन शौचालय बांधण्यास अनुदान देण्यात
येणार आहे.
इचलकरंजीसारख्या ठिकाणी विविध प्रांतातील
लोक रोजगारासाठी येतात. अनेक यंत्रमाग कारखान्यात शौचालय आणि मुतारीची सोय नाही.
त्यामुळे कामगार उघडयावर शौचाला जातात. बांधकामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात
कामगार काम करतात, त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनीही कामगारांसाठी
शौचालयाची सोय करावी अशी नोटिस आता स्थानिक संस्थांनी काढली आहे. शहरात, गावात, लांबच्या प्रवासात सार्वजनिक स्वच्छतेच्या
चांगल्या सोयी नसतात. मूलभूत स्वच्छता ही तिथूनच येते. या कामांसाठी निधि उभा
करण्याची गरज आहे. प्रसाधनाची सुविधा असणे ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. आता ते
अभियान नसून एक चळवळ बनली आहे.
बर्याच
ठिकाणी प्रभातफेर्या, निबंध स्पर्धा घेऊनही उपयोग झाला
नाही. लोक उघड्यावर जातात. म्हणून मग आणखीन अभिनव कल्पना काढली. गुड मॉर्निंग
पथकाची. पहाटेपासून पालिकेच्या गुड
मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणार्यांवर कारवाई केली. शौचास उघड्यावर बसणार्यांवर
दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर अशा व्यक्तीची घरापर्यंत हलगीच्या
आवाजात वाजत गाजत वरात काढली जाते.
.............................सविता नाबर
No comments:
Post a Comment