आलो इतुके जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन !!, प्रेमातलं जवळपण भरारी घेणारया पंखांच बंधन ठरू
नये, अस्तित्वहीन करणारं ठरू नये. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता परवा आठवली आणि खूपच प्रकर्षांन जाणवली.
माझी जवळची सुहृद, तिला आवडणारा राजकुमार तिच्या आयुष्यात आला. ती त्याच्या
प्रेमात आकंठ बुडाली. काही वर्ष अशीच गेली. आधी तिला जीवनातल्या सगळ्याच गोष्टीमधे
रस होता . निसर्गातल्या अनेक गोष्टी , पशु, पक्ष्यापासून ते वेगवेगळ्या वृक्ष
वनस्पतीपर्यंत सगळ्याची तिला माहिती. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचा तिला ध्यास
असायचां. गाण तर तिचा जीव की प्राण. पण विवाहानंतर तिला कशात रस होता का अस वाटाव
, इतकी ती बदलली. सतत त्याच्या आगे मागे रहायला लागली. त्यांनही तिला कधी दुखावलं
नाही. त्याची ख़ुशी हीच तिची ख़ुशी. त्याच दु:ख तेच तिच दु:ख झाल. दुधातल्या
साखरेसारखी ती त्याच्या आयुष्यात विरघळून गेली. कधी काळी असणारी गाण्याची आवड तिने
कौटुंबिक जबाबदारीपायी बाजूला ठेवली. नंतर मुला बाळांच्या शाळा कॉंलेजच्या दिवसात
तिन त्यांच्यात आपले फुलपंखी दिवस पाहिले. कधीतरी संधी मिळताच गाण्याची मैफल समरसून
ऐकली. कधी नाटक पाहिलं की तिच्या आवडत्या भूमिकेशी तद्रूप होताना, हातातल काम
हातातच राहायला लागल. मुलांचे संसार मार्गी लागले .पतीला त्याच्या व्यवसायातून सवड
मिळेना. त्याचा परीघ विस्तारला. आता तिला जाणीव झाली. आता या घटकेला मी काय करू? ती
सैरभैर झाली.
प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण असतातच.
विधात्यान प्रत्येक वस्तू अनोखी बनवली आहे.एकीसारखी दुसरी नाही. प्रत्येक चीजेला
तिची खास अशी गुणवैशिष्ट्य असतात. दैनंदिन जीवनात कधीकधी त्याला किंवा तिला
एकमेकांसाठी द्यायला वेळ नसतो. मानसिक शेअरिंगसाठी वेळ नसतो.
अशावेळी आयुष्यात पोकळी निर्माण होण्यापेक्षा ,आधीच स्वत;साठी काही तजवीज केली
तर !! संसार, मुल, कुटुंब , नातीगोती सांभाळता सांभाळता मी कोण हेच विसरून जायला
होत. स्त्रीपुरुष संसार रथाची दोन चाक म्हणतो. दोघही
त्यांच्या संसारासाठी परिश्रम करतात . त्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे हेही
तितकच खर. पण फक्त त्यातच गुंतून जाण
कितपत श्रेयस्कर आहे हे त्या त्या व्यक्तीन ठरवाव .दोघांनीही एकमेकांच्या
स्पेसला मान दिला पाहीजे. आर्जेन्टीनाच्या पझल या चित्रपटाची कथा आठवली. तिचा
संसार सर्वार्थान परिपूर्ण . मुल आणि पती तिचा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा
करतात. त्या वाढदिवसाच्या गिफ्टमधून मिळालेलं एक पझल तिला जीवनाचा मक्सद मिळवून
देत.पझल सोडवतांना तिची असणारी बुद्धीची कुवत तिला मिळालेला पार्टनरच जाणू शकतो.
तिला कुठल्याच गोष्टीसाठी नवऱ्याची आडकाठी
नसते. पण , तिची बुद्धीची भूक भागवणार एक साधन तिला गवसत.
दिवाणखाना, स्वैपाकघर,आणि झोपण्याच्या
खोली व्यतिरिक्त आणखीही एक खोली असावी , मुलगी, बहीण, पत्नी ,आई, आजी या भूमिका
निभावता निभावता मी एक व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व काय हा प्रश्न प्रत्येकीनं
स्वत:ला विचारला पाहिजे. खरतर, या तीनही खोल्यांमध्ये स्त्रीच अस्तित्व भरून
राहिलंय. तिच्याशिवाय या तीनही खोल्यांना अर्थ नाही. पण....तिन चौथ्या खोलीचां
विचार करावा. जी फक्त तिच्यासाठी असते. मी पणा जपण्यासाठी ही चौथी खोली. खोलीचा
कधी शब्दश: अर्थ घ्या तर कधी त्याचा अर्थ मनाची खोली, अवकाश असा घ्या.एक कोपराच म्हणा
ना.पण ती विवक्षित जागा स्त्रीला अत्यंत आवश्यक असते. हा चौथा कमरा असतो स्वत:ला
जाणून घेण्यासाठी. स्वत;तले गुण-दोष जाणण्यासाठी , आपण जगाच्या व्यवहारात कुठे
आहोत, हे अजमावण्यासाठी. तिने स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी .ही चौथा कमराची
संकल्पना अमृता प्रीतम यांची. कुटुंबाला बरोबर घेऊन
जाताना स्त्री , बाकीच्यांच्या आयुष्याचा इतकां विचार करते की, ती स्वत:च अस्तित्व
विसरते.आणि जर कधी आलीच भानावर तर, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. म्हणूनच, कविवर्य पाडगावकर म्हणतात ते खर आहे .
छेडणार जर होतो
आपण गीत नवे तर,
हवेच होते
वीणेच्या तारांतून अंतर,
निकट असूनही श्वासापुरते दूर असावे,
निकट असूनही श्वासापुरते दूर असावे,
जवळपणातही पंखाना आकाश दिसावे.
--------------------सविता नाबर
No comments:
Post a Comment