Tuesday 7 March 2017

कल्पवृक्ष कन्येसाठी ..........

      

        नुकतीच वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. गोष्ट आहे धुळे जिल्ह्यातली. नुकतीच घडलेली. एका शिक्षकाच्या मुलीने तिच्या मनाजेगत्या मुलाबरोबर विवाह केल्यामुळे तिच्यावर वडिलांचा रोष ओढवला आहे. आमची मुलगी आम्हाला मेली अशा स्वरूपाचे आवाहन बापाने केले . असे विकोपाचे विचार बर्‍याच वेळेला आपण पाहतो. पण इथे कळवण्यास आनंद वाटतो की, असे म्हणून बापाने मुलीच्या क्रियाकर्माचा घाट घातला होता. तसा जाहिरात फलकही लावला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तो बेत हाणून पाडला. मुले जर सज्ञान असतील तर त्यांच्या लग्नाला विरोध म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणे . एक प्रौढ व्यक्ति म्हणून हे कदापिही स्वीकारले जाणार नाही. जन्मल्यापासून ज्या मुलीला अगदी जिवापाड जपता, जिला जन्मल्यापासून अंगा खांद्यावर खेळवले, जिच्या आजारपणासाठी,जिची दुखणी खुपणी काढताना रात्रीचा दिवस केलेला असतो. तिचा आनंद हे आईवडिलांचे सर्वस्व असते. मुलगी सासरी जाणार म्हणजे काळजाचा तुकडा तोडावा लागणार अशा प्रकारची भावना मात्यापित्याच्या मनात असते. मग इथे आईवडील इतके टोकाला जाऊ शकतात? जिवंतपणीच मुलीचे क्रियाकर्म करू पहाणारे ,लोकलाजेस्तव हृदयावर एवढे दगड ठेवायला कसे राजी होऊ शकतात? रक्ताचे नाते इतक्या सहजा सहजी तोडता येते?  खाप पंचायतीला तोंड देताना कित्येकवेळा मुलीच्या बापाला मनाविरूद्ध यातना सहन करून मुलांना शिक्षा द्यावी लागते. कित्येक आरुषी तलवारना आईवडिलांची हाय सोसायटीतली प्रतिमा जपण्यासाठी बळी जावे लागते. पण इथे तर समाजातल्या मुलांच्या मनावर सुसंस्कार करणारा एक शिक्षक हुकूमशहा झाला आहे. मुलांना समजून घेणे ,त्यांच्याशी परानुभूतीने वागून निर्णय घेणे दूरच राहिले, पण जिवंतपणी तिच्या मरणाचे दु:ख साजरे करणारा बाप सहृदय कसा म्हणावा?
    माझ्या महितीतल्या एका सुशिक्षित , सुसंस्कृत व्यक्तीने , मुलीला तिच्या मनासारखा जोडीदार निवडला म्हणून  मोठी शिक्षा दिली. मी मेल्यावरही माझे तोंड तिने पाहता कामा नये. त्यांनी ठरवलेल्या मुलाशी तिने विवाह करायला नकार देऊन तिला हवा तो साथीदार तिने निवडला होता. मुलीला चांगले शिक्षण देऊन तिचे करियर घडवले आणि उपवर झाल्यावर मात्र बाप स्वत:चा निर्णय मुलीवर लादू पहात  होता. संपत्ती मधला काहीही हिस्सा तिला मिळणार नाही याचीही त्यांनी दक्षता घेतली होती. मृत्युशय्येवर असताना त्यांच्याजवळ कोणीच नव्हते. शिक्षा कोणाला मिळाली? मुलीला दुरावून त्यांनी काय साधले? तत्व की एकटेपणा? जन्मल्यापासून तिचे केलेले लाड, कोडकौतुक करणारे प्रेमळ बापाचे स्वरूप खरे की एका क्षणात दुरावणारा रक्ताचे संबंध तोडणारा त्रयस्थ बाप खरा? एकीकडे फुले ,आगरकरांनी सुधारलेल्या समाजात स्त्री शिक्षण ही अगदी पायाभूत गोष्ट झाली आहे . आणि दुसरीकडे स्त्री शिक्षणाने कितीही समृद्ध झाली तरी अजून काही वैयक्तिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाकारले जात आहे. 
        करियरबद्दल एका घरात चाललेली चर्चा. मुलगा आणि मुलगी दोघेही इंजिनियरिंग या क्षेत्रात करू इच्छिणारे. आईवडिलांनी दोघांनाही सारखेच शिक्षण दिले. पण मुलगा परदेशी कायमस्वरूपी वास्तव्य करायला खुश तर मुलगी आईवडिलांकडे कोण बघणार या भविष्यातल्या काळजीने घेरलेली. ती काही वर्षे परदेशी राहून अनुभव
घेऊन परतायच्या मानसिक तयारीत. दोघेही भावंडे स्वत:च्या करियर बद्दल सारखेच जागरूक. पण आईवडिलांची काळजी मुलापेक्षा मुलीला जास्त. बर्‍याच ठिकाणी मुलगी ही आईवडिलांच्या म्हातारपणाची काठी झाली आहे. मुलाची भूमिका ती अगदी चोख बजावते आहे. मूलत: स्त्री ही संवेदनाक्षम, सहनशील, परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे. प्रसंगी कुटुंबाचा विचार आधी करून नंतर स्वत:चा विचार करणारी आहे. मल्टीटास्कर आहे. म्हणूनच एकाचवेळी संसार आणि करियर दोन्ही लीलया हाताळू शकते. कित्येकवेळा सामाजिक,कौटुंबिक, आर्थिक स्थित्यंतरातूनही तिला जावे लागते. याशिवाय स्त्री जातीत जन्म घेऊनही स्त्रीच्याच नजरेतून एक मुलगी म्हणून अवहेलना झेलणारीही आहे.  दरवेळी तिला सॉफ्ट कॉर्नर मिळेलच असे नाही. म्हणूनच मुलगी शिकली प्रगति झाली असे म्हणणारा बाप, त्याने लावलेला हा कल्पवृक्ष वैभवाने बहरलेला पाहायला त्याला फक्त परानुभूतीची गरज आहे.
         --------------------------------सविता नाबर

1 comment:

  1. वरील पोस्ट वाचली आणि कदाचित ही पोस्ट मी पूर्वी वाचली असती तर छान वाटली असती.

    मला सांगा एका गरीब घराण्यातील मुली ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडासारखे जपले ती 25 वर्षीय मुलगी जिला ह्या काळात नोकरिवाला पाहायचं म्हटलं तरी 3 चार लाख दिल्याशिवाय मुलगी मागत नाही अश्या मुलीला जेव्हा स्वखर्च करणारा मुलगी मागण्यासाठी तयार होतो तेव्हा भर मंडपातून ह्या मुली प्रियकरासोबत पळून जातात.ह्या इतक्या मुली निष्ठउर बनलेल्या आहेत.गरिबीत मुलीला जे पाहिजे ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला मग जिवंतपणि मरणयातना का?
    कोणत्या आईवडिलांना नाही वाटत आपली मुलगी सुखात राहावी म्हणून?
    मग त्यांच्या स्वप्नांवर लाथ देण्याचा अधिकार कुणाला?
    मग जो शिक्षण संस्कार देऊ शकत नाही तो कुठला शिक्षण?

    ReplyDelete