Monday, 6 March 2017

तो राजहंस एक !!

     

       त्या दोघी जुळ्या बहिणी. एक कमल आणि दुसरी सुंदर. त्यांच्या जन्मान त्यांच्या आजोबांना, आजीला, वडिलांना कुणालाच फारसा आनंद झाला नव्हता. दोघी मुलीच झाल्या म्हणून. आनंद झाला होता तो फक्त त्यांच्या आईला. आपल्या दोन्ही लेकी हाती पायी धड आहेत आणि सशक्त आहेत यातच त्यांच्या आईला मोठ समाधान वाटायचं. दिसायला सुंदर होती म्हणूनच तीच नाव सगळ्यांनी मिळून सुंदर ठेवलं होत. जशी मोठी व्हायला लागली तशी सुंदर त्यातल्यात्यात घरातल्याना आवडायला लागली. मुलगी असली म्हणून काय झालं निदान दिसायला तरी छान होती म्हणून. कमल मात्र दिसायला सामान्य होती. तिचे कुणी फारसं लाड करायचे नाही. दोघी बरोबरच वाढत होत्या. पण जडण घडणीत खूप फरक पडत होता. कमल अतिशय लाघवी, कामसू, अभ्यासू होती. शिकायला हुशार त्यामुळे शाळेत नेहमी पहिली यायची. सुंदर मात्र आपल्या सौंदर्यातच मश्गुल! सुंदरला निसर्गान आणखी एक देणगी दिली होती. तीची चित्रकला खूप छान होती. वयात आल्यावर सुंदरला मागणी आली तिचा विवाह झाला. कमलच्या हुशारीमुळे ती उच्च विद्याविभूषित झाली. एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी झाली. कमलला तिच्यासारखाच हुशार जोडीदार मिळाला. सुंदर गाडी, बंगला, ऐषारामात होती. सुखासीन आयुष्यात लोळत होती. सुस्तावली होती. तिच्यातली कला लोप पावली होती. कधीकाळी ती छान चित्र काढायची हे ती विसरून गेली होती. सामान्य जीवन जगत होती. आणि कमल मात्र रोज कामाचं एकेक नवीन आव्हान पेलत होती. कंपनीतर्फे देश परदेशात जात होती. नव्या उत्साहाने दिवस सुरू करत होती. कला गुण दोघींकडे होते पण.... कस्तुरी मृगाच्या नाभीत कस्तुरी असते पण मृगाला त्याची कुठे कल्पना असते? आपण तर माणस आहोत . आपल्याकडे काय आहे याची जाणीव आपल्या सारख्या बुद्धिमान प्राण्याला असायला काहीच हरकत नाही. पण इथेच तर घोडं पेंड खातं. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी.
       एक नामवंत जाहिरात मॉडेल. जेव्हा त्याला मॉडेलिंग संबंधी विचारणा झाली तेव्हा मॉडेलिंग म्हणजे काय , ते कशाशी खातात याची काहीच माहिती त्याला नव्हती. तो खरतर खेळाडू होता. घरची पार्श्वभूमी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित. पण जेव्हा मॉडेलिंगची संधी आली, ती त्याने आव्हान म्हणून झेलेल. एक नवीन क्षेत्र म्हणून तर स्वीकारलच पण त्याच्या कुवतीचाही त्यान अनपेक्षित अंदाज बांधला. आपल नाण किती खणखणीत आहे हे त्यांना योग्य प्रकारे पटवल. जाहिरात फिल्म करणारे त्याला राजी झाले. त्यान आपला वकुब योग्य प्रकारे ओळखला. तुम्ही याबद्दल कदाचित ऐकलं किंवा वाचलही असेल . तो म्हणजे प्रसिद्ध जाहिरात मॉडेल मिलिंद सोमण. आज तो एक चांगला नट म्हणूनही ख्याती मिळवून आहे. आपली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू, सायना नेहवाल ही लहानपणी “नकोशी” होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आजीने तर तिचे तोंड पाहीले नव्हते. पण चेंडू उसळी मारून वेगाने वर उठला. आणि क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवून नकोशीच रूपांतर तिने हवीशी मध्ये केल.
     निसर्गान प्रत्येकात काहीतरी सुप्त शक्ति , कला, गुण पेरुन ठेवलेले असतात. कधी ते सहजपणे दिसतात तर कधी घासून पुसून घ्यावे लागतात. कुणीच असा जगात करंटा नाही ज्याच्याकडे काहीच गुण नाही. प्रत्येकजण एकमेवाद्वीतीय आहे. स्वत:ला एकवार त्रयस्थ नजरेन पाहावं. प्रत्येक वेड पिलु राजहंस असतच असत. गदिमानी म्हटलेल आहे ते अगदी तंतोतंत खरं आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख , होते कुरूप वेडे पिलु तयात एक, पाण्यात पाहताना , चोरूनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक.  

              ----------------------सविता नाबर       
     

तुम आशा, विश्वास हमारे....

     

        मुलीच्या पोटात दुखायला लागले म्हणून तपासणीसाठी आली, तीच सात महिन्यांची गर्भवती मुलगी. वय सतरा आठराच्या आसपास. खोदुन खोदून विचारले तरी पठ्ठी तोंड उघडायला तयार नाही. मला काही माहीत नाही हेच पालुपद. केस इतक्या पुढे गेलेली की तिच्या बाळंतपणाशिवाय पर्यायच नाही. दोन मुलीतली धाकटी. आई वडील शेतात काम करणारे. मोठ्या मुलीचे लग्न झालेले. हिचे शिक्षण नववीपर्यंत झालेले. म्हणजे मुलगी अगदीच अडाणी म्हणता येणार नाही अशी. मग तिच्या तोंड न उघडण्याचे कारण काय? तोंड घट्ट मिटून घेण्याइतके जबरदस्त कारण काय असू शकेल? आईला विश्वासात घेऊन ती काहीच सांगू शकली नाही? माझ्या एका प्रथितयश स्त्री रोग तज्ञ मैत्रिणीने सांगितलेली ही घटना.    
      एकदा खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलेली एक केस. एक चौकोनी कुटुंब. नवरा बायको, दोन मुले असा आटोपशीर संसार. पतिपत्नी नोकरी करणारे. मुलांना सर्व सुखे मिळाली पाहिजेत म्हणून धडपडणारे. मुलगी पंधरा सोळा वर्षांची. शाळा क्लास करून व्यवस्थित शिक्षण घेणारी. अचानक एक दिवस आईला समजले, लेक शाळेत आणि क्लासला जातच नाही. मग ती जाते कुठे? रजनीताईंनी शोध लावला. या कुटुंबाच्या ओळखीचे एक आजोबा ,साठीचे सद्गृहस्थ त्यांच्याकडे ती मुलगी रोज जात होती. पहिल्यांदा लहान लहान म्हणून तिच्याशी खेळणारे आजोबा, तिला इतके जवळचे झाले होते की एक दिवस ती त्यांच्याशी लग्नच करून आली. आई वडिलांवर दु:खाचा अक्षरश: डोंगर कोसळला. पण तोपर्यंत वेळ गेली होती. ती सज्ञान होईपर्यंत दोन वर्षे त्या आजोबांनीही वाट पाहिली. कितीही मनधरणी केली तरी ती माघार घ्यायला तयार नाही. याचे कारण काय? आईवडील आणि मुलांमध्ये इतका भावनिक दुरावा की मुलीची स्पंदने आईला जाणवली नाहीत! तिच्या वागण्यातला फरक आईने ताडला नाही.
    समुपदेशन करताना अनेक प्रकारचे प्रसंग पाहायला, ऐकायला मिळतात. काही वर्षांपूर्वी घडलेली ही आणखी एक घटना. मुलीला आई सतत रागावत असे. आई सतत चिडचिडलेली. मुलगी आईच्या दडपणाखाली. भीतीच्या छायेत. ती सात आठ वर्षांची असताना एका तरुण मुलाने तिच्याशी गैरप्रकार केला. पण आईला सांगायला ती मुलगी धजावेना. का तर आई तिलाच रागवेल म्हणून. पालकांचे वागणे मुलांवर नेहमी दोषारोप करणारे असू नये. शक्यतो परिस्थितीची शहानिशा करण्याचे भान असायला हवे. मुलांना त्यांच्या पालकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे की मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकण्याची त्यांची तयारी आहे. या घटनेत समुपदेशनची गरज मुलीला नव्हती, आईला होती.
      जगात उजळ माथ्याने फिरणारे लांडगे कमी नाहीत. त्यांच्या बाह्यरुपावरूनच त्यांना ओळखता येते. पण हरणाच्या कातडयाआड दडलेले लांडगे मात्र शोधुनही सापडत नाहीत. उसळते तारुण्य खुणावत असते. सारासार विचार करण्याची बुद्धी मुलांच्या ठिकाणी विकसित करण्यासाठी पालकांनीच जागृत राहाणे क्रमप्राप्त असते. पौगंडावस्थेतील मुलींना कधी कधी हे लक्षात येत नाही. यासाठीच मुलांवरचा विश्वास मौलिक असतो. त्यांना मानसिक सुरक्षितता देणे आवश्यक असते.
       तारुण्यात जेव्हा अभ्यास, शिक्षणा व्यतिरिक्त खेळ, संगीत, नाटक, अशा एकस्ट्रा करिक्युलर अक्टीव्हिटीज मध्ये रस नसेल तर मुलींचे लक्ष फक्त सौंदर्य जोपासना यावरच केंद्रीत होते. आणि मानसिक पातळीवर , बौद्धिक पातळीवर वाढ होण्याऐवजी सगळे लक्ष शारीरिक आकर्षण या भावनेभोवतीच फिरायला लागते. अशावेळी पालकांचा  विश्वास, आपुलकी त्यांना लाभली नाही तर त्या मुलींचा पाय घसरण्याची शक्यता असते. त्यासाठी सतत त्यांच्यावर पाळत ठेवण्याची गरज नसते. त्यांच्यावरती असलेला विश्वास काम करत असतो. बर्‍याचवेळा अगदी जवळच्या नातेवाइकाकडून मुलांचे लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. अशावेळी परक्या व्यक्तिला प्राधान्य देण्यापेक्षा मुलांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. मुलांच्या आविर्भावातून ,वागण्यातून कधी कधी ते व्यक्त होत असते. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक होता कामा नये. मुलांना लहान वयात, तारुण्यात प्रवेश करताना बर्‍याच वेळा लैंगिकतेचे ज्ञान नसते. त्याचा संकोच करण्यापेक्षा सौम्य शब्दात, मुलांना समजेल अशा पद्धतीने त्याचा परिचय करून देणे आवश्यक असते.
            ....................................सविता नाबर

या देवी सर्व भूतेषु ........

     

       साडेतीन शक्तिपीठांपैकी एक करवीर. त्याची आधिष्ठात्री देवता श्री अंबाबाई. सश्रद्ध भाविकाला मानसिक आधार देणारी. या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेण संस्थिता ,नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमो नम:! शक्ति, भक्ति, मातृ ,तुष्टी, दया, बुद्धी, निद्रा, क्षुधा या सगळ्या शक्तींची आराध्य देवता, आदिशक्ती श्री अंबाबाई, करवीर नगरीचे भूषण. स्त्री शक्तीचे जागृत दैवत. राक्षसरूपी दुष्टांचे निर्दालन करणारी, अनिष्ट वृत्तीचा नायनाट करणारी देवी. ती देवी पार्वतीचे रूप आहे. अशा या आदिशक्तीला भजणार्‍या भक्तांना तिच्या गर्भागारात मर्यादित लोकांनाच प्रवेश आहे. पुरोहित, राजघराण्यातले लोक यांना गाभार्‍यात जाता येते. पण सर्वसामान्य स्त्रीला मात्र आत जायला मज्जाव आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही मानवच, मग या दोन्हीमधे भेद का?
      पुरोगामी राजा शाहू छत्रपतींच्या राज्यात ज्या समाज प्रबोधनाचा पाया घातला गेला, त्याच राज्यात देवीच्या गाभार्‍यात जायला स्त्रीयांना मनाई असणे यापरता उपरोध तो कुठला? स्त्री नुसतीच शिकली नाही तर सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या स्त्रीने पौरोहित्याचे क्षेत्रही सोडले नाही. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी स्त्री अध्यात्म क्षेत्रातही पुरुषांच्यापेक्षा काकणभर सरसच आहे. हे एवढ्यासाठी म्हणते की, देवाची पूजा, आरती, होम जे काही करायचे असेल त्याची तयारी करण्याची जबाबदारी अगदी प्रसादा सकट सर्वस्वी स्त्री कडेच असते. पुरुष फक्त पूजा करण्याचा मान आपल्याकडे घेतो. ती मूर्तिपूजक आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते जी मूर्तिपूजा श्रद्धेसाठी आवश्यक आहे ते ती मनोभावे करते.
     अगदी वेद काळापासून आपल्या डोळ्यांसमोर हे उदाहरण आहे. गार्गी आणि मैत्रेयी या थोर विदुषीँची उदाहरणे आहेत. राजा जनकाच्या काळात मित्र नावाचे ऋषी होते, त्यांची कन्या मैत्रेयी. ऋग्वेदातल्या ऋचांची निर्माती गार्गी. वेदांमधे आणि तत्वज्ञात पारंगत असणारी ब्रम्हवादिनी गार्गी या विदूषीची मैत्रेयी ही भाची. त्यावेळी त्यांच्या मुंजीही झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात पुरुष प्रधान मानसिकता आस्तित्वात आली आणि सगळेच बिघडले.
           देवीच्या पूजेचा मान पुजार्‍याला नक्कीच. पण स्त्रीला नाही. पौरोहित्य करणार्‍यांपैकी काही पुरोहितांच्या  पत्नीना गाभार्‍यात जाण्याचा अधिकार आहे. बाकी भक्तांपैकी कुणालाच नाही. देवी ही स्त्रीचे रूप असूनही तिच्या गर्भगृहात स्त्रीलाच प्रवेश निषिद्ध? नवरात्रोत्सवात मंदिराच्या स्वच्छतेत देवीच्या गर्भागारातून तंबाखू आणि गुटख्याच्या पुड्या बाहेर पडतात. पुजार्‍यांच्या भक्तीला सलाम! पण याचा अर्थ स्त्रीला प्रवेशही नाही हे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आली तरी मानसिक गुलामगिरीतून देश अजून मुक्त झाला नाही हेच खरे. सृष्टीची सृजनात्मक प्रक्रिया ज्यामुळे चालू राहते त्यालाच विटाळ असे म्हणून स्त्रीला काही क्षेत्रांमद्धे प्रतिबंध घालण्यात आला. त्या काळात जर देवाचे काही केले ,तसाच जर देवळात प्रवेश केला, तर तिला, तिच्या कुटुंबीयांना त्याचे फळ ( पक्षी: वाईट परिणाम) भोगावे लागेल हे मनावर ठसवले गेले. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता हे खरोखरच सत्य आहे का? त्या काळात स्त्रीला आराम मिळण्याच्या हेतूने असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. पण तिचा तेवढा मासिक कालावधी हा बर्‍याच गोष्टींसाठी वाईट ठरवला गेला.  
    एकदा पुण्याच्या पर्वतीला आम्ही मैत्रीणी एका देवळात गेलो. बाहेर कट्ट्यावर बसलेले टोळभैरव हसायला लागले. नंतर कारण कळले की ते मंदिर कार्तिक स्वामीचे होते. स्त्रीयांनी त्याचे दर्शन घेता कामा नये हा नियम. हा नियम कुणी केला? बरं, दक्षिणेत कार्तिकेयाची इतकी मंदिरे आहेत की तिथे सगळीकडेच आम्ही आत जाऊन दर्शन घेतले आहे. मग एका ठिकाणी दर्शन घेतलेले चालते आणि दुसर्‍या ठिकाणी त्याच देवाला स्त्रीयांचे मंदिरात जाणे निषिद्ध हे कसे?
     एप्रिल 2011 मध्ये अंबाबाईच्या गाभार्‍यात महिलाना असलेल्या प्रवेशबंदी विरुद्ध आवाज महिलांनी उठवला. भाजपाच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता केळकर आणि मनसेचे तत्कालीन आमदार राम कदम यांनी काही कार्यकर्त्यांसोबत गाभार्‍यात प्रवेश केला. पण हा प्रवेश करणे हे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. सर्व मंगल मांगल्ये असणारी नारायणी सर्वांना सुबुद्धी देवो!
                  ........................सविता नाबर

ये भी दिन जाएंगे !

      

        लहान मुलांचे मन निष्पाप असते, त्यांच्या मनात काही छक्के पंजे नसतात. मन आनंदाने आणि हास्याने भरून वाहात असते. लहानपणी मन हे टीपकागदासारखे असते. आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा परिणाम त्यांच्या मनावर चटकन होत असतो. त्याप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रियाही असतात. चांगल्या वागण्याचा मुले तसाच प्रतिसाद देत असतात. तर वाईटही तेवढेच टिपत असतात. मग एका दहा बारा वर्षांच्या मुलीला आपले वडील आत्महत्त्या करत आहेत, ही जाणीव होते म्हणजे शेतकर्‍यांचे दु:ख किती पराकोटीला पोचले आहे याचेच जीवंत उदाहरण म्हणायला लागेल.
      ती एक विडिओ क्लिप होती. मुलीचे दैनंदिन आयुष्य सुरू आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात तिचे आजूबाजूलाही बारकाईने निरीक्षण चालू आहे, जे मुलांचे नेहमीच चालू असते. तिची वेणी फणी ,खेळणे चालू असले तरी अधून मधून बापाकडे तिचे लक्ष असतेच. बाप डबा घेऊन शेतात जातो, ती त्याच्या पाठीमागून लपत छपत जाते. सायकलवरुन जाणार्‍या बापाला ती आडून आडून पहात असते. एकदा बाप शेतात जातो आणि एका झाडाच्या फांदीवर दोरी टाकतो. ते बघून त्या क्षणी त्या मुलीच्या मनातली भीती जागृत होते. हेलावून टाकणार्‍या आवाजात ती टाहो फोडते. त्या क्षणी बाप आपल्याला सोडून जाणार ही भावना त्या लहान मुलीला धरणी दुभंगून घेणारी वाटते. ती पळत जाऊन बापाला चिकटते. बाप झाडाच्या फांदीवरून येणार्‍या दोरीला टायर बांधून तिच्यासाठी झोपाळा तयार करतो, आणि तिला त्यावर बसवून झोका देतो. क्षणार्धात आपल्याही मनातली भीती दिलाशाची जागा घेते. त्याक्षणी त्या छोट्या मुलीबरोबरच आपलाही जीव भांड्यात पडतो. मुलीचे पितृछत्र अकारण हरवले तर.... या कल्पनेनेच आपल्यालाही कसेसेच वाटलेले असते.   
   खरच बळीराजाचे जिणेच असे झाले आहे. सर्वस्वी पावसावर अवलंबून. आकाशातल्या देवाने हात दिला तर तो कसाबसा तग धरतो. या वर्षी तर पावसाने अगदीच त्याचे ऐकले नाही. शेतकर्‍याचे रोजचे जेवणच त्यावर आहे. तोंडाचा घास गेला तर त्याने कुणाच्या तोंडाकडे पहावे? मग रोजचा उपास असह्य झाला की तो जिवाची पर्वा करत नाही. कधी विहीर, कधी अग्नि तर कधी दोरी जवळ करतो. स्वत:च्या उपासापेक्षा आपली बायको पोरे उपाशी पडतात हे शेतकर्‍याला मनाला यातना देणारे असते.
       आपण लंघन करण्यासाठी केलेला स्वेच्छेचा उपास आणि शेतकर्‍यावर लादलेला बंधनकारक उपास यात खूप अंतर आहे. कोरडा उपदेश इथे कामाचा नाही. पण सगळ्यांचा अन्नदाता असणारा हा बळीराजा त्याने मनाने कच खाऊ नये. ज्या क्षणी तो स्वत:चे जीवन संपवतो, त्याच वेळी त्याचे कुटुंब उघड्यावर पडणार असते, हे तो कसे विसरतो? आपल्या मुलांना या जगात आणखीन दू:खाच्या खाईत लोटत असतो. त्याच्या भरवशावर कुटुंबातले लोक काहीतरी आशा बाळगून असतात. पण त्याच्या माघारी ते काय करणार असतात? याचा थोडासा विचार त्याने करावा.

      त्याच्या आत्महत्येने प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही. आलेला दू:खाचा दिवस नक्कीच पालटणार आहे . त्याने चार शहाण्या सुरत्या माणसांना विचारले तर...., त्यासाठीच नाना  पाटेकर, मकरंद अनासपुरे समाजात आहेत. शेतकर्‍यांचे दू:खाश्रू पुसण्याचे काम या दोघांनी स्वेच्छेने हाती घेतले आहे. यासाठी नाम फाउंडेशनची स्थापना केली आहे. ही दोन्ही टोके जोडणे पुर्णपणे जरी शक्य झाले नाही तरी कुठेतरी मेळ साधता येईल. विदर्भ आणि मराठवाडा इथले स्थानिक लोकही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. प्रशासनही सहाय्य करत आहे. निव्वळ आर्थिक मदत हा तात्पुरता उपाय झाला. डॉक्टर अविनाश पोळ यांच्यासारख्या जलतज्ञाचे मार्गदर्शन मिळत आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी, भविष्यकाळात काही प्रमाणात समाज प्रबोधन तर काही प्रमाणात पर्यायी पिके घेणे आदि उपायही शेतकर्‍याला सुचवावे लागतील. मानवी आयुष्य खूप मोलाचे आहे . किरकोळ गोष्टीने माणसे मोडून पडू नयेत असे वाटते. बळीराजा तर मानव जातीचा पोषणकर्ता आहे. दुष्काळाचे सावट निघून जाणार आहे यावर त्याने विश्वास ठेवावा.       ................................सविता नाबर