Tuesday, 7 March 2017

बाजार मातृत्वाचा

      

      पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरची रेल्वे सुरू झाली. गाडीने वेग घेतला आणि “ अम्मा, जाऊ नको. मला सोडून जाऊ नको.” असे म्हणत ती पळायला लागली. ती साधारणपणे आठ वर्षाची होती. तिच्यापाठीमागून चार पाच वर्षांची मुलगी धावत होती. दक्षिण भारतातली ही गोष्ट. बंगळुरूहून आम्ही मद्रासला चाललो होतो. कुठल्यातरी एका छोट्याशा स्टेशनवर गाडी थांबली होती. समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक जोडपे बसले होते. त्यांना चार मुले दिसत होती. मोठी मुलगी असेल सात आठ वर्षांची, दुसरी पाच वर्षांची, तिसरी दोन तीन वर्षांची आणि चौथे मूल कडेवर. प्लॅटफॉर्मवर बसलेले ते कुटुंब गाडीची शिट्टी झाल्याबरोबर उभे राहिले. तरी मोठ्या दोन मुली खेळतच होत्या. बापाने तीन नंबरच्या मुलीला काखोटीला मारले. सगळ्यात धाकटे तर आईच्याच कडेवर होते. मुलींचे आजूबाजूला लक्ष नव्हते. आईवडील चालू लागले तरी त्या आपल्याच खेळात मग्न होत्या. ते जोडपे भराभर चालत अगदी धावतच गाडीबरोबर चालायला लागले. बघता बघता गाडीने वेग पकडायच्या आधी झपकन ते दोघे कधी गाडीत घुसले ते कळलेच नाही. मुलींचे आईबापाकडे लक्ष गेले आणि त्या रडत ,ओरडत धावत सुटल्या. त्यांची भाषा कळली नाही तरी अर्थ कळत होता. गाडीने स्टेशन केव्हाच सोडले होते. आमच्या समोरच्या बर्थवर एक उच्चपदस्थ निवृत्त पोलिस अधिकारी होते. माझ्या चेहर्‍यावरचा गोंधळ बघून ते म्हणाले, बर्‍याचवेळा असे होते. कधी मुले आईवडिलांना परत मिळतात तर कधी त्या मुलांना नीट सांगता आले नाही तर आश्रमात दाखल करावे लागते.  त्या गरीब आईबापानी मुलींना परिस्थितीवर सोपवले होते आणि आपले स्वत:चे आयुष्य जगायला मुलींना सोडून ते पुढे चालले होते. अशीही एक माता आणि दुसरीकडे आहे सरोगेट मदर.  वैद्यक शास्त्र आज इतके पुढे गेले आहे कि गर्भाशय सुद्धा भाड्याने देण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. पण त्याचा गैर फायदा घेतला जातोय. एकीकडे गरीब मुली पैशाकरता आपले गर्भाशय भाड्याने देतात. म्हणजे एक प्रकारे शरीर विकतात. मातृत्वाचा आनंद हा आनंद राहत नसून शरीर  पैसा मिळवण्याचे एक यंत्र होऊन जाते . अपत्यहीन जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख देताना या तरुण स्त्रिया यंत्रवत होऊन जातात. नऊ  महिने ज्या स्त्रीने आपल्या हाडीमासी एक जीव वाढवलेला असतो, ज्याच्याशी मनाची, भावनेची गुंतवणूक झालेली असते तो बंध इतक्या सहजा सहजी कसा तोडता येतो? निव्वळ पैशासाठी?
        परदेशी जोडपी, श्रीमंत जोडपी ,ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, ज्यांना गर्भधारणा,प्रसूती झेपत नाही, कष्ट सोसण्याची तयारी नाही, अशा जोडप्यांना सरोगेट मदर हा पर्याय उपलब्ध आहे. सरोगसी या तंत्रज्ञानामुळे मूल न होणार्‍यांना स्वत:चे मूल मिळते, आणि संबंधित गरीब महिलाना पैसा मिळतो. असे जरी असले तरी त्याला आता बाजारी रूप प्राप्त झालय. गुजरातमध्ये तर कित्येक महिलांनी गर्भाशय भाडोत्री देणे हे एक उत्पन्नाचे साधन केले आहे. या स्त्रिया ज्या तुलनेत स्वत:च्या शरीराचे, तब्बेतीचे मोल देतात, त्या मानाने त्यांना मिळणारे मूल्य अत्यल्प असते. पैसा मिळतोय, आणि कुटुंब पोसायचे म्हणून स्त्रिया गर्भाशय भाड्याने देत आहेत.
      एकाच मातेची वेगवेगळी रुपे. एकीकडे मातृत्वाला आसुसलेली स्त्री, गर्भाशय भाड्याने घेऊन मुलाचे पालकत्व घेते. तर एखादी माता मुलांना पोसणे शक्य नाही म्हणून शरीर विक्रीचा व्यवसाय करून वाढवते. तिला सुरक्षित कवचात ठेवते. एकुणातच परिस्थिती कशीही आली तरी स्त्रीत्वच पणाला लागते. कधी आईवर मुलांना वाढवायची जबाबदारी म्हणून. तर कधी कुटुंब पोसायला मातृत्वाचे दान द्यावे लागते.बाळा होऊ कशी उतराई म्हणणारी आई आपल्या पिलाना खाऊ पिऊ घालण्यासाठी नवीन अर्भकाचे यंत्र होऊ पहाते. एवढे करून सरोगेट मदर आपले नाव आई म्हणून आपल्या अपत्याला देऊ शकत नाही. बाळाच्या जन्म दाखल्यावर जन्मदात्री आई आपले नाव टाकू शकत नाही. अर्थातच त्या मायेच्या पाशात तिला अडकायचेच नसते. पण मातृत्वाचा व्यवसाय मात्र करायचा असतो
               ....................................सविता नाबर

चौथा कमरा

      

       आलो इतुके जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन !!, प्रेमातलं जवळपण भरारी घेणारया पंखांच बंधन ठरू नये, अस्तित्वहीन करणारं ठरू नये. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता परवा आठवली आणि खूपच प्रकर्षांन जाणवली. माझी जवळची सुहृद, तिला आवडणारा राजकुमार तिच्या आयुष्यात आला. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. काही वर्ष अशीच गेली. आधी तिला जीवनातल्या सगळ्याच गोष्टीमधे रस होता . निसर्गातल्या अनेक गोष्टी , पशु, पक्ष्यापासून ते वेगवेगळ्या वृक्ष वनस्पतीपर्यंत सगळ्याची तिला माहिती. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचा तिला ध्यास असायचां. गाण तर तिचा जीव की प्राण. पण विवाहानंतर तिला कशात रस होता का अस वाटाव , इतकी ती बदलली. सतत त्याच्या आगे मागे रहायला लागली. त्यांनही तिला कधी दुखावलं नाही. त्याची ख़ुशी हीच तिची ख़ुशी. त्याच दु:ख तेच तिच दु:ख झाल. दुधातल्या साखरेसारखी ती त्याच्या आयुष्यात विरघळून गेली. कधी काळी असणारी गाण्याची आवड तिने कौटुंबिक जबाबदारीपायी बाजूला ठेवली. नंतर मुला बाळांच्या शाळा कॉंलेजच्या दिवसात तिन त्यांच्यात आपले फुलपंखी दिवस पाहिले. कधीतरी संधी मिळताच गाण्याची मैफल समरसून ऐकली. कधी नाटक पाहिलं की तिच्या आवडत्या भूमिकेशी तद्रूप होताना, हातातल काम हातातच राहायला लागल. मुलांचे संसार मार्गी लागले .पतीला त्याच्या व्यवसायातून सवड मिळेना. त्याचा परीघ विस्तारला. आता तिला जाणीव झाली. आता या घटकेला मी काय करू? ती सैरभैर झाली.
        प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण असतातच. विधात्यान प्रत्येक वस्तू अनोखी बनवली आहे.एकीसारखी दुसरी नाही. प्रत्येक चीजेला तिची खास अशी गुणवैशिष्ट्य असतात. दैनंदिन जीवनात कधीकधी त्याला किंवा तिला एकमेकांसाठी द्यायला वेळ नसतो. मानसिक शेअरिंगसाठी वेळ नसतो.
अशावेळी आयुष्यात पोकळी निर्माण होण्यापेक्षा ,आधीच स्वत;साठी काही तजवीज केली तर !! संसार, मुल, कुटुंब , नातीगोती सांभाळता सांभाळता मी कोण हेच विसरून जायला होत. स्त्रीपुरुष संसार रथाची दोन चाक म्हणतो. दोघही त्यांच्या संसारासाठी परिश्रम करतात . त्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे हेही तितकच खर. पण फक्त त्यातच गुंतून जाण  कितपत श्रेयस्कर आहे हे त्या त्या व्यक्तीन ठरवाव .दोघांनीही एकमेकांच्या स्पेसला मान दिला पाहीजे. आर्जेन्टीनाच्या पझल या चित्रपटाची कथा आठवली. तिचा संसार सर्वार्थान परिपूर्ण . मुल आणि पती तिचा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा करतात. त्या वाढदिवसाच्या गिफ्टमधून मिळालेलं एक पझल तिला जीवनाचा मक्सद मिळवून देत.पझल सोडवतांना तिची असणारी बुद्धीची कुवत तिला मिळालेला पार्टनरच जाणू शकतो. तिला  कुठल्याच गोष्टीसाठी नवऱ्याची आडकाठी नसते. पण , तिची बुद्धीची भूक भागवणार एक साधन तिला गवसत.
       दिवाणखाना, स्वैपाकघर,आणि झोपण्याच्या खोली व्यतिरिक्त आणखीही एक खोली असावी , मुलगी, बहीण, पत्नी ,आई, आजी या भूमिका निभावता निभावता मी एक व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व काय हा प्रश्न प्रत्येकीनं स्वत:ला विचारला पाहिजे. खरतर, या तीनही खोल्यांमध्ये स्त्रीच अस्तित्व भरून राहिलंय. तिच्याशिवाय या तीनही खोल्यांना अर्थ नाही. पण....तिन चौथ्या खोलीचां विचार करावा. जी फक्त तिच्यासाठी असते. मी पणा जपण्यासाठी ही चौथी खोली. खोलीचा कधी शब्दश: अर्थ घ्या तर कधी त्याचा अर्थ मनाची खोली, अवकाश असा घ्या.एक कोपराच म्हणा ना.पण ती विवक्षित जागा स्त्रीला अत्यंत आवश्यक असते. हा चौथा कमरा असतो स्वत:ला जाणून घेण्यासाठी. स्वत;तले गुण-दोष जाणण्यासाठी , आपण जगाच्या व्यवहारात कुठे आहोत, हे अजमावण्यासाठी. तिने स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी .ही चौथा कमराची संकल्पना अमृता प्रीतम यांची. कुटुंबाला बरोबर घेऊन जाताना स्त्री , बाकीच्यांच्या आयुष्याचा इतकां विचार करते की, ती स्वत:च अस्तित्व विसरते.आणि जर कधी आलीच भानावर तर, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. म्हणूनच, कविवर्य पाडगावकर म्हणतात ते खर आहे .
छेडणार जर होतो आपण गीत नवे तर,
 हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर,
निकट असूनही श्वासापुरते दूर असावे,
जवळपणातही पंखाना आकाश दिसावे.

        --------------------सविता नाबर






फक्त लढ म्हणा!

   

       जनक हा दुसरीतला मुलगा. त्याच्या पाठी इतके व्याप त्याच्या आई वडिलांनी लावले होते की त्याला अक्षरश: श्वास घ्यायला फुरसत नव्हती. जनक हा सर्वसामान्य मुलांसारखाच पण त्याच्या दुर्दैवाने की सुदैवाने माहीत नाही अनेक अ‍ॅक्टिव्हिटीजचे ओझे त्याच्यावर आईने लादले होते. शारीरिक ओझ्याबरोबरच ते ओझं मानसिकही होते. त्याची प्रगति आईच्या काळजीचा विषय होता. खरंतर तो चांगले मार्क्स मिळवत होता. पण त्याची आई त्याच्या शालेय प्रगति व्यतिरिक्त त्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करत होती. सकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडलेला जनक दुपारी ४ वाजता घरी आला की त्यानंतर त्याचे कराटे क्लासेस, शामक डावर डान्स क्लास,गिटार हे सगळे क्लासेस संपल्यावर संध्याकाळी ७ वाजता दमून भागून घरी येणार .घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा त्याला क्लासना जुंपले होते. या सगळ्यांमधे प्रावीण्य मिळवणे त्याच्या आईच्या दृष्टीने पर्वणी होती. पण एवढ्याशा जीवाला इतके कशासाठी राबवायचे ? जनकचा भाऊ सुजय हा मानसिकरीत्या अपंग होता. त्याची उणीव भरुन काढण्यासाठी हा दुप्पट व्याप जनकच्या माथी मारला होता. आर्य विद्या मंदिराच्या ओपन हाऊसमधे जनकला घेऊन त्याची आई माझ्याकडे आली ती त्याला एकदा परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून. समुपदेशनाची गरज जनकला नसून त्याच्या आईला होती. एकाला कमी मिळालय म्हणून त्याची वाजावट दुसर्‍यावर काढण्याची काही गरज नाही. पर्यायाने जनकसारख्या कोवळ्या फुलाला अकाली भार पडल्याने तो कोमेजण्याची शक्यता आहे. तिला समजावून सांगितल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या.
       मी डॉक्टर तर माझ्या मुलानेही डॉक्टरच व्हावे. म्हणजे माझे हॉस्पिटल तो चालवू शकेल. माझे मूल सीए होईल, सॉफ्टवेयर इंजिनीअर होईल ,पैसा खोर्‍याने ओढेल. माझ्या मुलाने किंवा मुलीने अमुक एक व्यवसायच केला पाहिजे. असा निर्णय त्याच्यावर लादला जातो. त्याची क्षमता नसतानाही त्याच्यावर ठराविक व्यवसायाचे ओझे लादले जाते. आमच्यावेळी आम्हाला हे मिळाले नाही म्हणून आम्ही तुम्हाला एवढे देतो आहोत. हम दो हमारा एकच्या जमान्यात सर्व सुखे हात जोडून मुलांपुढे उभी असतात. प्रसंगी भरपूर डोनेशन देऊन एखाद्या कॉलेजला प्रवेश घेतला जातो. भलेही आपल्या पाल्याला त्या विषयात रस आहे की नाही याचा विचारही न करता आई वडील मुलांचे करियर करवण्याच्या मागे लागलेले असतात. आयुष्याचे ईप्सित फक्त पैसा मिळवणे, चैन करणे आहे का याचा विचार पालकांनी स्वत:च्या मनात आधी रुजवायला पाहिजे. नुकताच लागलेला दहावीचा निकाल बरेच काही सांगून गेला. इच्छा ,आवड आणि क्षमता नसताना पाल्यांना त्यांना नको असलेल्या साइडला जाणे भाग पडते. शैक्षणिक स्पर्धेला तोंड देताना मुलांची दमछाक होतेय. शैक्षणिक गुणवत्ता हीच खरी बुद्धिमता आहे का?   
          मुलांना आजकाल फुलणे फारसे माहीतच नाही असे झाले आहे. मैदानी खेळ कमी झाले. याची जागा कॉम्प्युटर गेम्सनी घेतली , टीव्हीसारख्या मनोरंजनाच्या माध्यमानेही मुलांच्या भावनांशी खेळणे चालू केले. स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली. पाश्चात्यांच्या अनुकरणामधे त्यांच्या प्रमाणे राहणी, खाणे पिणे  ,वागणे बोलणे घेतले पण त्यांचा स्वावलंबन हा गुण घेणे आपण विसरलो. मुलांचा बुध्यांक कदाचित वाढला पण भावनांक मात्र कमी झाला.
        एका प्रसंगात एक गोड गोजिरा मुलगा जोशात येऊन आपल्या वडिलांना प्रेमळ सूचना देतोय. बाबा आपली गाडी फास्ट घ्या. पाठीमागच्या सगळ्या गाड्या पुढे गेल्यासुद्धा. वडील म्हणतात , जाऊदे बाकीच्या गाड्या पुढे गेल्यातर . आपण आपल्या स्पीडने जाव , काही प्रॉब्लेम यायला नको. हुशार बालक तत्परतेने उत्तरते, माझ्या स्टडीच्या बाबतीतही तुम्हाला हेच सांगायचे आहे. अमका पुढे गेला म्हणून माझ्यावर रागावू नका. मी माझ्या कुवतीप्रमाणे आणि मला जमेल तसे शिकणार. फक्त मी जे काही करीन ते उत्तम करीन . तुम्ही पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा. हा आत्मविश्वास आजच्या पिढीमधे यायला हवा.


                      ..................सविता नाबर    

गुरुविणा कोण दाखविल वाट

    

           सहा सात वर्षांची माझी एक छोटी मैत्रीण आहे. ती आणि तिच्यापेक्षा पाच वर्षानी मोठी तिची ताई दोघी एकत्रच शाळेत जातात. पण काहीवेळा ताईला आपले प्रश्न सोडवायला या छोटीची ढाल करावी लागते. छोटी मात्र बिनधास्त आणि मुद्देसूद उत्तरे देऊन समोरच्याला गारद करते. शाळेत किंवा रिक्षात कोणी ताईला त्रास देत असेल तर माझ्या ताईला असे चालणार नाही म्हणून धमकावते. तार्किक दृष्ट्या अतिशय योग्य आणि हजरजबाबी बोलणे असल्यामुळे तिच्याशी व्यवस्थितच बोलावे लागते. तिची माझी भेट झाली तेव्हापासून मी तिचा हा गुण उचलायचा प्रयत्न करतेय. हो ,कुणाचाही चांगला गुण घ्यायला वयाची अट कशाला लागते? त्याबाबतीत ती खरोखरच गुरु आहे म्हणायला हरकत नाही. जाता जाता आपल्या आजूबाजूच्या माणसांमधे असणारे गुण बघून नकळत त्यांचे अनुकरण करत असतो. त्यावेळेपुरती ती व्यक्ति गुरुच असते.
    जन्माला आल्यानंतर काही काळ आपल्यासमोर सर्वात मोठा आदर्श असतो. आपले अस्तित्व फक्त एकाच व्यक्तिभोवती निगडीत असते. ते म्हणजे आई. आई जे काही करते ते मुलाच्या दृष्टीने पूर्ण सत्य असते. आणि तीच पूर्व दिशा असते. नंतर थोड्याशा कळत्या नकळत्या वयात मोठी बहीण किंवा भाऊ हे आदर्श असतात. मुलगे वडिलांचे आणि मुली आईचे अनुकरण करतात. त्यांच्याही नकळत. त्यांचे वागणे हीच खरी वागण्या बोलण्याची रीत हा समज डोक्यात पक्का बसतो. त्याच दरम्यान आयुष्यात खर्‍या अर्थाने गुरूचा किंवा शिक्षकाचा प्रवेश होतो आणि आपली अवस्था गुरुविणा कोण दाखविल वाट अशी होऊन जाते. गुरुने काहीही संगितले की ती काळ्या दगडावरची रेघ असते. अनुकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल हे योग्य की अयोग्य हे मात्र ठरवायला, स्वत:च गुरु व्हावे लागते. यावेळी लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कारच कामी येतात.  
     शाळा कॉलेजमध्ये मला चांगले गुरु मिळाले. त्यांच्यामुळे मनावर सुसंस्कार झाले. वाचनाची गोडी लागण्याचे श्रेय तर पुर्णपणे वडिलांनाच जाते. त्यांच्यामुळे घरात अनेक पुस्तके यायची , संग्रही असायची आणि मी त्याचा फडशा पडत असे. गाण्याचा गळा नसला तरी लहानपणापासून वडिलांमुळे गाण्याचा कान तयार झाला. त्यांच्यामुळे मला तबल्याच्या क्षेत्रात यावेसे वाटले. तबला शिकवताना कै. केशवराव धर्माधिकारी सरांनी विद्या कधीच हातची राखली नाही. पं. विभव नागेशकरांमुळे तबल्याचा सराव कसा जीव तोडून करावा हे शिकायला मिळाले. किंबहुना सराव म्हणजे काय याची थोडीशी झलक बघायला मिळाली. गानयोगिनी पंडिता धोंडुताई कुलकर्णी यांच्याकडे मी गाण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले नाही पण त्यांचे माझे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. त्यांच्या वारंवार भेटीत गुरुविषयीचा आदर नेहमीच त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओतप्रोत भरून वाहायचा. त्यांचे प्रेमळ आणि तितकेच गाण्याच्या बाबतीत कुठलाही वावगेपणा खपवून न घेणारे, शेवटपर्यंत कार्यरत रहाणारे व्यक्तिमत्व फारच विलोभनीय होते. सांताक्रुझच्या योगा इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा असणारे ऋषितुल्य डॉक्टर जयदेव आणि श्रीमती हंसाजी यांनी तर माझा आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सम्यक दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करणारा माझा नवरा, छोट्या गावातून येऊन स्वत:ला अत्यंत सुयोग्य रीतीने विकसित करणारी माझी मैत्रीण या सगळया व्यक्तींनी माझे आयुष्य अतिशय समृद्ध केले. त्यांच्या कडून योग्य ते गुण घ्यायचा मी प्रयत्न केला. अंगी किती बाणले, माहीत नाही.
         खरे तर एकलव्याला गुरु द्रोणाचार्यानी प्रत्यक्ष शिक्षण दिलेच नव्हते. पण त्याने गुरूचा पुतळा उभा करून स्वयंप्रेरित होऊन शिक्षण घेतले. मनोमन गुरु मानून स्वत:च स्वत:ला शिकवले. गुरु विद्या देण्यासाठी, कला शिकवण्यासाठी कधी प्रत्यक्ष हजर असतो, नसतो. पण आपण काय ,कसे घ्यायचे हे आपणच ठरवायचे. शेवटी आपणच आपला गुरु आणि प्रकाश असतो. कारण हा गुरु आहे म्हणून सांगणारे मन आपलेच असते. त्याच्याकडून योग्य ते शीक म्हणून आपणच आपल्या मनाला बजावायचे असते. मनासारखा दूसरा गुरु शोधून तरी सापडेल काय?
  
                ..............सविता नाबर