Wednesday, 15 June 2016

प्रसंगी अखंडीत कार्य करीत राहावे......

   

        कदा एक माणूस निर्हेतुकपणे रस्त्याने चालला होता. एक दगड त्याच्या दिशेने भिरभिरत आला आणि त्याच्या पायच्या अंगठ्याला जोरात लागला. त्याचा अंगठा रक्ताने माखला. चिडून त्याने तो दगड उचलला आणि भिरकावला. पण त्याने भिरकावलेला दगड जवळच्या घराच्या खिडकीवर आपटला त्यामुळे खिडकीची काच फुटली. त्या घराचा मालक त्याच्याशी तावातावाने भंडायला आला. म्हणजे या सगळ्या भांडणाचे मूळ त्या माणसाच्या निरुद्योगीपणामुळे झाले. यासाठी कार्यमग्न रहाणे आवश्यक आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला रितेपण येता कामा नये.
     जेव्हा एखादा गायक, चित्रकार, शिल्पकार, व्यावसायिक आपल्या कलेमध्ये, व्यवसायात निमग्न असतो, तेव्हा आपले काम सोडून दुसर्‍या गोष्टीचा विचार करायलाही त्याला वेळ नसतो. हात रिकामे रहात नाहीत, त्यामुळे डोके रिकामे रहात नाही. रिकाम्या डोक्यात भलतेच विचार येत रहातात. वाचन म्हणजे व्यग्र किंवा कार्यरत राहणे नव्हे. कधी कधी वाचन चालू असताना एकीकडे डोळे अक्षरांवरून फिरत असतात. आणि दुसरीकडे मनात विचारांची मालिका चालू असते. म्हणजे वाचन हे passive आहे. काम अशा प्रकारचे असावे की त्यामध्ये तन आणि मनाने गुंतून जावे. आजूबाजूच्या जगाचे भान नसावे. काम हे काम न राहाता आनंदाचे निधान असावे. कुठल्याही कार्यातली मनाची गुंतवणूक ही फार मोठी असते.
     लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते. एका माणसाला म्हणे एक भूत प्रसन्न होते. काही वर माग असे म्हटल्यावर तो म्हणतो माझे कुठलेही काम तू पूर्ण करायचेस. पण भूत म्हणते एक अट आहे. मला सतत काम संगितले पाहिजे. मी मोकळा असलो की तुला खाणार. तो माणूस सांगेल ते काम भूत झटक्यात करून टाकत असते. त्या माणसाला प्रश्न पडतो, आता याला सांगायचे तरी काय? मोकळे राहिले की खाणार. मग त्या भुताला एक खांब जमिनीत रोवायला सांगतो. जोपर्यंत मी काम सांगत नाही तोपर्यंत या खांबावर खाली वर करत रहा. आपले मन असेच असते. त्याला काही काम नसले की ते नको त्या विचारात गुंतते. मन कुठल्याही कामात मग्न असले की मात्र आपल्याला कशाचीच शुद्ध नसते. मनाला शारीरिक व्यग्रतेची जोड दिली तर उत्तमच.       
       खरेतर लहानपणापासून स्वत;ला कार्यमग्न ठेवण्याकडे माणसाचा कल असतोच. लहान मुलसुद्धा आपल्यामते स्वत;ला कशात तरी गुंतवून ठेवत असते. एखादे किडामुंगी पळत असेल त्यावर हाताने फटाफटा मारून आSS SS करत आपल्या पराक्रमाकडे दुसर्‍यांचे लक्ष वेधत असते. चार ते आठ वयोगटातली मुले वेळ जायचे काही साधन नसेल तर सतत आईच्या पाठीमागे भुणभूण लावतात. आईचा पदर धरून, मला काहीतरी खेळायला दे असा धोशा लावलेला असतो. अशावेळी त्या मुलाला हे करू नको, ते करू नको असे सांगण्यापेक्षा काहीतरी करायला देणे आवश्यक असते.
     योगा इन्स्टिट्यूट मुंबई इथे मी जेव्हा प्रशिक्षण घेत होते, तेव्हा इन्स्टिट्यूटच्या डीन देसाई मॅडम या नेहमी कार्यमग्न असल्याचे आम्ही पाहात होतो. कुणीही बोलायला आले तरी त्या गप्पांमध्ये कधीच वेळ काढत नसत. सतत कामात व्यस्त असत. आलेल्या व्यक्तिलाच काहीतरी काम सांगत. स्वत: कार्यमग्न राहून दुसर्‍यालाही व्यग्र ठेवण्याची किमया त्यांना सहज साधली होती. दु:खाच्या वेळी कामच माणसाच्या मदतीला धावून येते. अशावेळी मोकळा वेळ त्रासदायकच वाटतो. रिकाम्या मनात भलभलते विचार येतात. त्यापेक्षा मन काही कारणाने व्यग्र ठेवणे कधीही हितकर असते. ज्याला फुरसतीच्या वेळात खरोखर आनंद मिळवायचा असतो, त्याला कामातून प्रथम समाधान मिळाले पाहिजे.
       मध्यंतरी आलेली व्ही आर एस ची लाट बर्‍याच जणांना निराशेच्या अंधारात लोटून गेली. त्यातून जे सावरले ते तरले. पण जे त्यातच गुरफाटले त्यांना दिशाहीनतेमुळे पुढे काय करावे हे सुचेना आणि भविष्यातला प्रकाश नाहीसा झाला. वयाची पन्नास पंचावन्न वर्ष झाली की आपल्याकडे निवृत्तीची भाषा तोंडी यायला लागते. ही निवृत्ती शारीरिक असते. पण मानसिकरित्या नको इतका जीव संसारात गुंतलेला असतो. वयाच्या सत्तरी , पंचाहत्तरीतही पाश्चात्य देशातली माणसं अगदी फिट अँड फाईन असतात. पुर्णपणे स्वावलंबी. म्हणून लगेच वयस्क लोकांनी शारीरिक कष्टाची काम केली पाहिजेत असं नाही. पण मन अशा गोष्टीमधे गुंतवून ठेवाव की जेणेकरून तब्बेतीची कुरकुर डोक वर काढणार नाही.
      निम ग्रामीण भागात औद्योगिक विकास कमी झालेला असतो त्यामुळे लोकांना भरपूर वेळ गप्पा मारायला असतो. त्यामुळे त्यांचा कल काही सर्जनशील काम करण्यापेक्षा वेळ कसा घालवावा याकडे जास्त असतो. रिकामे मन हे सैतानाचे घर असते ही म्हण तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे कामात व्यस्त रहाणे ही माणसाची गरज आहे. कामाच्या ध्यासामुळे तो परिपूर्ण होतो. माणसाच्या आयुष्यातील कार्य वगळल्यास बाकी शून्यच उरेल.
         ..............................सविता नाबर  





Published in Maharashtra Times, Kolhapur edition on 15th june 2016



Wednesday, 1 June 2016

कामाची कटिबद्धता

  

          स ऐकले आहे की पं. कुमार गंधर्व मैफिली आधी अर्धा तास तंबोरा लावायचे. आणि तो चांगला लागला की मैफिलीसाठी कॅनव्हास तयार झाला रागाचे सुंदर चित्र काढायला तयार झाला असे म्हणायचे. चांगला व्यायाम, छान झोप, संतुलित आहार, प्रसन्न मन तयार असेल तर आपलाही कॅनव्हास तयार आहे असे म्हणायला पाहिजे. त्या कॅनव्हासवर आपल्या आवडत्या कामाचे अप्रतिम, मनमोहक चित्र काढायला कसे छान वाटते.
   जेव्हा कामाचे व्यवस्थित नियोजन असते तेव्हा आयुष्याला एक शिस्त लागते. एखादी घटना, प्रसंग, समारंभ, सहल या सगळ्याच गोष्टींना नियोजन आवश्यक असते. नियोजन नसेल तर तुमचे उद्दीष्ट डळमळीत होते. ट्रेन जशी रुळांच्या ट्रॅकवरुन सुरळीत जात असते. जर काही प्लॅनिंग नसेल तर ओबडधोबड रस्त्यावरून चालताना, खाच खळग्यातून वाट काढताना त्रास होतोच. डांबरी रस्ता गुळगुळीत असतो. त्रास होत नाही. तसेच नियोजनाचे आहे. नियोजनावर कधी कधी बाह्य घटकांचाही परिणाम होत असतो. त्यामुळे नियोजन जरासे इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. तो तर नियोजनाचा एक भागच म्हणता येईल. यावरून एक विनोद आठवला. मुंबईला लोकल वीस पंचवीस मिनिटे उशिरा आल्यावर एक व्यक्ति दुसर्‍याला वैतागून म्हणतो, या इंडिकेटरचा उपयोग काय मग? दूसरा तितक्याच शांतपणे म्हणतो, ट्रेन वेळेच्या किती उशिरा येते हे तरी समजते ना! विनोदाचा भाग सोडला तर नियोजनाचेही तसेच आहे. वेळेच्या व्यवस्थापनाचा समग्र विचार करताना तीन गोष्टींचा विचार महत्वाचा. एक म्हणजे ध्येय. आयुष्यात काय करायचे आहे याची स्पष्टता. दुसरी गोष्ट म्हणजे काम करायची शैली. तुम्ही हळुबाई आहात की गतिमान. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराचे घड्याळ समजून घेऊन त्यानुसार नियोजन करणे. केव्हा कोणती गोष्ट आपल्याला चांगली जमते हे ठरवणे.
    आपल्या छोट्या मोठ्या उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवणे अत्यंत गरजेचे असते. लहान सहान गोष्टींसाठी फार वेळ न देता लांबच्या आणि महत्वाच्या उद्दिष्टांसाठी जास्त वेळ देणे श्रेयस्कर असते. दैनंदिन कामानासुद्धा तितकेच महत्व आहे. रोजची जी काही कामे असतील ती वेळच्यावेळी करण्याने आयुष्याला एक शिस्त लागते. अग्रक्रमाने कोणती कामे करायची ते ठरवता येते. सोमवार ते शनिवार आपण काम करतो म्हणून रविवारचे महत्व आहे. कामाच्या वेळापत्रकामुळे सुट्टीचे महत्व असते. विद्यार्थी दशेत अभ्यास करताना एकदम परीक्षेच्या वेळी रात्रंदिवस जागून करण्यापेक्षा रोजच्या रोज जर केला तर परीक्षेच्या वेळी मनावर ताण येत नाही. तो किती करतो यापेक्षा कसा करतो यावर परीक्षेतले यश अवलंबून असते.  
      नियोजन म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. ती मनाला असलेली शिस्त असते. कामाच्या व्यवस्थापनात काही गोष्टी निश्चित आहेत. झोप, जेवण, आपली नित्यकर्मे, वर्तमानपत्र वाचणे यासाठी ठराविक वेळ द्यावाच लागतो. उरलेल्या वेळेपैकी बसवायचे असते अभ्यास, स्वयंपाक, घरच्या लोकांबरोबर गप्पा, कामासाठी प्रवास (मुंबईसारख्या ठिकाणी ऑफिससाठीही प्रवास आवश्यक असतो) मीटिंग, मित्रांची वाट पहाणे, टी.व्ही.पहाणे, मोबाईलवर बोलणे, व्हाट्सपवर चॅट करणे. यामध्ये कामाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. स्वत:कडे तटस्थपणे पहायला थोडासा वेळ द्यायला हवा. आपण कुठे चुकतोय का? आपली दिशा बरोबर आहे ना? आपण कामांचा प्राधान्यक्रम ठरवलाय का? असे प्रश्न स्वत:ला विचारायला संधि द्यायला पाहिजे. नियोजनाच्या बाबतीत घरातली स्त्री मग ती गृहिणी असो किंवा करियर वुमन असो, तिचे नियोजन अगदी परफेक्ट असते.     
    एकदा एक लावी पक्षीण शेताजवळच्या घरट्यात पिलांसह रहात होती. शेत पिकायला आले तेव्हा शेतकरी झाडाखाली येऊन बसला आणि स्वत:शीच म्हणाला, संध्याकाळी जाऊन शेतमजुर ठरवतो. आणि पीक कापून घेतो.” पिले घाबरली. आईला म्हणाली, “शेतकरी उद्याच पीक कापणार आहे तेव्हा आपण ही जागा सोडली पाहिजे. पिल्लांना आई म्हणाली, “घाबरण्याचे काही कारण नाही. उद्या काय होते ते पहा.” सर्वांचीच शेते पिकल्यामुळे शेतकर्‍याला मजूर मिळाले नाही. तो हताश होऊन झाडाखाली बसला. “ उद्या नातेवाईक, मित्रांना बोलवतो. आणि पीक कापून घेतो. पिल्ले पुन्हा आईला म्हणाली, “आता मात्र या शेतातला दाण्यांचा मोह सोडून दुसरीकडे गेले पाहिजे.” पक्षिण म्हणाली, “उद्याही शेत कापले जाणार नाही. बाळांनो घाबरू नका.”  दुसर्‍या दिवशी शेतकरी पुन्हा निराशेने झाडाखाली बसला. म्हणाला, “ नातेवाईक, मित्र कुणी मदतीला आले नाही, इतरांच्या मदतीचे काही खरे नाही. उद्या माझ्या बायको आणि मुलाना बोलवतो आणि पीक कापायला घेतो. लावी पक्षिण पिलाना म्हणाली, “आता मात्र आपले काही खरे नाही. दुसर्‍यावर भरवसा न ठेवता शेतकरी दादा उद्या स्वत:च पीक कापणार आहे. आता हे शेत सोडून आपल्याला दुसरीकडे गेले पाहिजे.” प्रयत्न स्वत:च केल्याशिवाय उद्दीष्ट साध्य होत नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. शिस्त पाळण्यामध्ये किंवा कामाचे नियोजन करण्यामध्ये दुसर्‍यावर अवलंबून रहाणे कितपत श्रेयस्कर आहे हे महत्वाचे ठरते. नाहीतर सागळाच कामाचा डोलारा कोसळतो. स्वत;च्या कामाशी बांधील रहाण्यासाठी, नियोजनातून कटिबद्ध राहुया. 
       ...............................सविता नाबर 

Published in Maharashtra Times Kolhapur edition as on 1st june 2016




Wednesday, 25 May 2016

लक्ष्मण रेषा संयमाची

 

        कदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले.  आलटून पालटून प्रत्येकाने थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला. पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलवू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला, क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला.
 जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई. नंतर बलराम जागे झाले, बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलरामही क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. आता पहार्‍याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण त्यांनी शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहिले. पिशाच्च अजून संतापले, मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण शांत होते.   एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसजसा पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. त्यांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते. माणूस बुद्धीचा उपयोग करून संयम पाळू शकतो. एकदा राग आला की तो काहीही करतो. क्रोधामुळे माणसाच्या शरीराचे नुकसान तर होतेच. पण त्याबरोबर मानसिक दुबळेपणा येतो. राग आला की तुम्ही जर तोंड बंद ठेवले तर समोरच्याचे काही चालूच शकत नाही. तुमचा राग वाढणार नाही. आणि दोन हातांनी टाळी वाजत असल्याने, एकाने तोंड बंद ठेवले की दुसर्‍याला आपोआपच गप्प बसावे लागते.
      ही खरेतर अनुभव घेण्याची गोष्ट आहे. विकारांच्या आणि भावनावेगाच्या कचाट्यात न सापडता त्यांना बळी न पडता मन शांत ठेवणे ही तशी सोपी गोष्ट नाही. पण ती प्रयत्नाने शक्य आहे. कारण सर्वसामान्य माणसावर या विकारांचा आणि भावनांचा इतका प्रचंड पगडा असतो की त्यातून सहजासहजी सुटका होत नाही. किंबहुना आपण भावनेच्या विळख्यात सापडलो आहोत हेच मुळी माणसाला समजत नाही.
      बोलणे, खाणे, यासाठी तोंडावर नियंत्रण पाहिजे. या सगळ्या मोहाचे, भावनांचे मूळ आहे मन. एकदा का मनावर काबू ठेवला की बाकी सर्व मग सोपे होऊन जाते. कुठलीही गोष्ट मर्यादेत करणे म्हणजे संयम. कित्येक दोष असे आहेत की माणसाने त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय त्याला यशाच्या पायर्‍या चढता येत नाहीत. त्यातला एक आहे क्रोध. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसची पत्नी खूप कजाग होती. पत्नीचे कठोर बोलणे ऐकताना सॉक्रेटिस आपले ओठ दाताखाली घट्ट दाबून धरत असे. ज्याला संयम पाळता येतो तोच क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतो. जिभेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवला तर बरेच काही शक्य होते.
      एक सामान्य, कापडाचा दुकानदार होता. एकदा त्याच्या दुकानात एका मोठ्या कापड गिरणीचा मालक आला. त्याने त्या दुकानदाराला कापडाचे शंभर दोनशे नमुने दाखवायला लावले. दुकानदार शांतपणे संयम पाळून सर्व नमुने दाखवत राहिला. एवढे सर्व होऊन त्याने फक्त एकाच नमुन्याचे अर्धा मीटर कापड विकत घेतले. पण अशा ग्राहकामुळे दुकानदार नाराज न होता त्याने त्याचे आभार मानले. ती बडी आसामी काही वेळाने पुन्हा त्याच्या दुकानात आली. संयम पाळल्याबद्दल त्याने दुकानदाराची स्तुति केली. त्याने आपल्या कापड गिरणीचा एकमेव विक्रेता म्हणून त्याची निवड केली. लहानशा दुकानाचा मालक असलेला हा दुकानदार बघता बघता कोट्याधीश झाला. त्याच्या यशाचे रहस्य होते त्याच्या शांतपणात आणि संयमात. ज्याच्याकडे आत्मनियंत्रण आहे तो नेहमी कृतिशील असतो. त्याची कल्पनाशक्ति नेहमी ताजी आणि तरल राहते. स्वत:वर नियंत्रण असल्यामुळे मत्सर, सुड या भावना मनात आल्या तरी त्यावर मात करता येते.
     संकटे थोड्याच काळासाठी असतात. एकदा एक गृहस्थ पगार झाल्यावर घरी येत असताना कोणीतरी त्यांचे  पाकीट मारले. आता घरभाडे, किराणा, मुलांची फी, कर्जाचे हफ्ते सगळे भागवायचे कसे? हे विचार त्यांच्या मनात येत होते. घरी येत असतानाच त्यांनी मनाचा निश्चय केला. मौन पाळूनच त्यांनी घरात प्रवेश केला. पत्नीने विचारले केव्हा मिळणार पगार? त्यांनी सांगितले, मिळेल काही दिवसानी. एका मित्राकडून, ऑफिसमधल्या कुणाकडून पैसे घेतले. असे करत किराणा, मुलांची फी, घरभाडे भागवले. चेहर्‍यावर काळजीची रेषही उमटू न देता पुढच्या महिन्याच्या एक तारखेला जेव्हा पगार झाला तेव्हा त्यांनी पाकीट मारले गेल्याची गोष्ट पत्नीला सांगितली. तुम्ही मला संगितले नाही! ती म्हणाली. “संगितले असते तर काळजी करण्याशिवाय तुम्हाला काहीच करता आले नसते. जे झाले त्याचे दु;ख करून काहीच उपयोग नव्हता.” अडचण मनात ठेऊन त्यांनी वेळ मारून नेली होती.
    आजकाल तरुण मुलांना दिसेल ती वस्तु ताबडतोब हवी असते. कुठल्याच मोहावर मात करायची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यासाठी धीर धरण्याची किंवा संयम पाळण्याची त्यांना सवय नाही अशावेळी मनाची समजूत घालणे आवश्यक असते. मन तर आपल्याच ताब्यात असते. हो म्हटले तरी तयार असते. नाही म्हटले तर गप्प बसते. त्याला संयमाचे वळण लावणे जरूरी असते.  
   -------------------सविता नाबर        

  Published in Maharashtra Times on 25th May 2016