Friday, 15 July 2016

समाधी साधन.........

   

       दोरीवरून चालणारी डोंबार्‍याची पोर सगळ्यांनीच पाहिली असेल, किंवा आगीच्या वर्तुळाकार ज्वाळेतून आरपार जाताना तिच्या शरीराला त्याचा जरासुद्धा स्पर्श होऊ न देता ती शिताफीने सटकते. केवढे कमालीचे एकाग्रचित्त असते तिचे मन! तिचे चित्त किंचितही विचलित झाले तरी प्राणाशी गाठ असते. वय तर जेमतेम सहा सातच असते. ज्या वयात सुखवस्तू मुलांना एकाच ठिकाणी बराच वेळ बसणे किंवा एकाच कृतीवर मन केन्द्रित करणे अवघड असते. मग हे त्या मुलीलाच कसे जमते? यासाठी मनाला एकाग्र करण्याचा सराव आवश्यक आहे. उद्दिष्टाशी मनाची एकरूपता साधून त्यावर बराच काळपर्यंत स्थिर चित्ताने काम करणे अवघड असते. कारण आपल्या मनाला घडी घडी इकडे तिकडे विनाकारण भटकायची सवय लागलेली असते. त्याला हळूहळू आपल्या नियंत्रणात घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या ध्येयाकडे खेचून आणावे लागते.
      या सदरात लक्ष्यवेध हा विषय याआधी मी हाताळला होता. पण तो होता उद्दीष्ट जाणण्यासाठी आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी. मन एकाग्रचित्त असणे याला आपल्या ध्येयाच्या दृष्टीने फार महत्व आहे. एकदा लक्ष्यवेध झाल्यानंतर उद्दिष्टाशी एकरूप होणे खूपच महत्वाचे असते. चार प्रकारे मन एकाग्रचित्त करता येते. डोळे पूर्णपणे उघडे ठेवून, बाह्य गोष्टीवर लक्ष्य केन्द्रित करून. डोळे बंद ठेवून, अंत:चक्षु उघडे ठेवून म्हणजे मनाने, ज्या गोष्टी आपल्याला आनंददायी वाटतात, त्यावर लक्ष्य केन्द्रित करून, ही प्रतिमा सतत आपल्या नजरेसमोर येते आणि अदृश्य होते. त्या प्रतिमेला आपल्याला पुन्हापुन्हा नजरेसमोर आणावे लागते. या प्रकारच्या एकाग्रतेला मनाचे प्रचंड सामर्थ्य लागते. तिसरा एकाग्रतेचा प्रकार म्हणजे आपल्या श्वासावर मन केन्द्रित करणे. आपण श्वास घेतो कसा आणि सोडतो कसा याचे निरीक्षण करणे. डोळे उघडे अथवा बंद ठेवून, दोन्ही हे प्रकारे करता येते. आणि चौथा प्रकार म्हणजे मनातल्या मनात काही मंत्र किंवा श्लोक म्हणणे. आणि ते म्हणत असताना, ते लक्ष्यपूर्वक आपण स्वत:च ऐकणे. मनाची एकाग्रता विकसित करण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो.   
    कुठल्याही जत्रेत, प्रदर्शनात, समारंभात एक स्टॉल हमखास असतोच. तो म्हणजे डार्टचा. पाच सात फुटावर असणार्‍या चक्राकार तबकडीच्या बरोबर मध्यभागी डार्टने नेम साधायचा असतो. किंवा छोट्या बंदुकीने फुगे फोडायचे असले तरी आपले मन त्यावेळी किती एकाग्र असते! नजर आणि मन जराही इकडे तिकडे बघायला तयार नसते. ही असते एकाग्रता. समजा कुणी तुमचे चित्त विचलित करायचा प्रयत्न केला तरीही आपण टस की मस होत नाही.      तुम्ही एखादा खेळ, सामना, मॅच खेळता आहात. त्यावेळी आजूबाजूच्या प्रेक्षकांचा आरडाओरडा, टाळ्या, शिट्या, जल्लोष हे तर सतत कानावर पडत असतेच. शिवाय समोरचा प्रतिस्पर्धी जर तुल्यबळ असेल तर त्याचेही मनावर दडपण असते. खेळात चांगली कामगिरीही करायची असते. या सगळ्या गोष्टींचा एकाच वेळी सामना करत असताना मन एकाग्रचित्त असावे लागते. त्या गोष्टींचे योग्य ते भान ठेवून खेळावे लागते. तरच आपली खेळी चांगली होऊ शकते. एकाग्रता जितकी जास्त तेवढे त्या प्रसंगाचे, घटनेचे स्वरूप समजायला सोपे जाते. त्या प्रसंगातले बारकावे  समजून घेता येते.
     एकदा काही टारगट मुले शाळेत 3 शेळ्या सोडतात. त्यावर नंबर घालतात 1,2 आणि 4. मुले शाळेत शेळ्या शोधायला येतात. त्यांच्याबरोबर शिक्षक, काही पालकही शेळयांचा शोध घेणे चालू करतात. त्यांना एक, दोन आणि चार नंबर घातलेल्या शेळ्या सापडतात. मग सगळ्यांचा मोर्चा वळतो 3 नंबरच्या शेळीकडे. पण ती तर काही केल्या सापडत नाही. कारण तीन नंबरची शेळीच नसते. ते मात्र तीच शेळी दिवसभर शोधत बसतात. सगळ्यांच्या तक्रारी, नातेसंबंध, कामातले समाधान, करियर, पैसा या सगळ्याच्या बाबतीत जे उपलब्ध नाही तेच मनाला सगळ्यात जास्त खटकते. महत्वाचे असते ते आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामुग्री, वेळ, ऊर्जा. त्यामुळे शेळी नंबर तीन ची काळजी करायची नाही.
      काम करताना मन इतके एकाग्र असावे की आपल्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध असता कामा नये. एकाग्रता टिकवता येत नाही म्हणून इतरांना दोष देण्याचे काम आपण करतो. एकदा न्यूटनच्या पत्नीने त्याच्यासाठी दुपारी जेवण ठेवले आणि ती निघून गेली. संशोधनात गढलेल्या न्यूटनला प्रयोगातून बाहेर येण्याचे जेव्हा भान आले, तेव्हा रात्र झाली होती. हा विसरभोळेपणा नसून कामाशी तद्रूप झाल्याचा परिणाम म्हणता येईल. जेव्हा संगीत साधनेत कोणीही मग्न होते, तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचे किंवा कोलाहलाचे भान त्या व्यक्तिला नसते. एकदा लक्ष्य ठरल्यावर त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते. आणि त्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकताना कामाशी एकजीव झाले की आपल्या कामात शंभर टक्के परिपूर्णता येते. आत्मिक समाधान, अचिव्हमेंट, ईश्वरप्राप्ती अशा अनेक संज्ञानी या तपश्चर्येचे वर्णन करता येईल. याची अनुभूति नक्कीच प्रत्येकाने घ्यायला हवी.

           ...................................सविता नाबर   

 Published as on 13th July 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition
       





धरावी परिवर्तनाची वाट

   

     ध्यंतरी एका सेमिनारला हजर रहाण्याचा योग आला. त्यामध्ये त्यांनी कावळेही कसे हुशार झालेत, त्यांच्या मधील बदलाची एक गोष्ट सांगितली. पूर्वीचा तहानलेला कावळा भांड्याच्या तळाशी असलेले पाणी वरपर्यंत म्हणजे त्याच्या चोचीपर्यंत पोहोचण्यासाठी दगड टाकत होता. आणि पाण्याची पातळी वाढवत होता. पण आताचा स्मार्ट कावळा गळक्या नळावर जाऊन त्या नळाला चोच (पक्षी: तोंड) लावतो. आता नुसते हार्ड वर्क नको तर स्मार्ट वर्क पाहिजे ही कामाची नवीन संकल्पना प्रचारात आली. नुसतीच ढोर मेहनत कामाची नाही. आपले काम योग्य दिशेने झाले तरच त्याचे चीज होते हा आजच्या जमान्याचा मूलमंत्र आहे.
      खरं तर माणसाला कोणताही बदल स्वीकारताना खूप जड जात. कारण पहिल्या स्थितीची इतकी सवय झालेली असते की झोपेत उठून करायला सांगितलं तरी नेहमी आपण करत असणारे काम चपखलपणे होत असतं. आणि थोडसं जरी टस की मस झालं तरी आयुष्याची घडी बदलते. त्यामुळे थोडीफार कुरकुर होतेच. स्थितीशीलतेची सवय झाल्याने एका स्थितीतून दुसर्‍या स्थितीत जाताना होणारा बदल त्रास देतोच. रेल्वेचे रूळ बदलताना खडखडाट होणारच.  
        बदलाच सगळ्यात मोठ उदाहरण म्हणजे स्त्री शिक्षण. स्त्रिया दीड शतकापूर्वी शिकत नव्हत्या. त्यावेळी फुले, आगरकराना स्त्री शिक्षणाचं बीज रोवायला बरेच प्रयास पडले. आणि आज आपल्याला त्या शुद्ध बीजापोटी आलेली रसाळ गोमटी फळे बघायला मिळतात. हा बदल घडताना, बर्‍याच जणीना अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासातून जाव लागलं. मानसिकतेत बदल होत असताना, पोशाख, राहणी, विचारसरणी यातही हळूहळू बदल होत गेला. मुलींना फक्त शालेय शिक्षणच नाही तर महाविद्यालयीन शिक्षण मिळत गेल. पुढे नोकरी, करियर करणार्‍या स्त्रिया हा बदल घडत गेला. आज कितीतरी स्त्रियांमुळे त्यांच्या व्यवसायाचे नाव झाले, त्यांच्या कंपन्यांचे नाव देशभरातच नाही तर जगभरात झाले.
       फार मोठी व्याप्ती असलेल्या या विषयाला गवसणी घालणे कठीण आहे. बदल हे सगळ्याच क्षेत्रात होत असतात. रेडिओचा शोध लागला, ग्रामोफोन आला, नंतर दूरदर्शन आले, व्हीसीआर, टेप रेकोर्डरचा जमाना येऊन गेला. डीव्हीडी प्लेअर आले तेही दिसेनासे झाले. पेजर तर आता लोकांना आठवतही नसतील. मोबाइल ही चीज नवीन असताना सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखी नव्हती. पण आता मोबाइल मध्ये झालेल्या क्रांतीने सगळ्यांनीच दुनियेला मुठ्ठीमध्ये बंद केलय. बदल हे जीवंत समाजाचे लक्षण आहे. स्थितीशीलता समाजाला पंगु बनवते. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की “हे जीवन म्हणजे बदल राजा, थांबला तो संपला.” पुढची पिढी छापील माध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमात जास्त रमणारी आहे. अनाथांची माय असणारी सिंधुताई सपकाळ कोणे एके काळी शिक्षणाच्या आवडीपोटी वाण सामानाचा कागदही हपापुन वाचत होती आणि घरच्या शिक्षणाच्या विरोधापायी तो गिळून टाकत होती. आज मुले फक्त वाचनाची आवड न जोपासता संगणकासारख्या प्रांतात मोठी भरारी घेत आहेत.
     आजच्या घडीला जी व्यक्ति चालू स्थितीशी जमवून घेऊ शकत नाही ती मागे पडते हे आपण पाहातोच. तिथे स्वत;चा हेका ठेवून चालत नाही. घरात वीज असताना, कोळसा, रॉकेल, लाकूड यांचाच वापर करणार म्हणून होत नाही. जो बदलत्या जगाशी जमवून घेतो तो पुढे जातो आणि स्मार्ट होतो. त्याच्या अंगी आपोआपच आत्मविश्वास येतो. संगणक हा आजच्या घडीला परवलीचा शब्द झाला आहे. त्याच्याशिवाय जगणारा माणूस अडाणी ठरतोय. आताच्या जगात आवश्यक असणारी सॉफ्ट स्किल्स अंगी बाणवणे अत्यंत आवश्यक असते. परस्पर नातेसंबंध जपावे लागतात. त्यासाठी शिष्टाचार अंगात मुरवणेही तेवढेच आवश्यक असते.  
       बदल हा स्वीकारला पाहिजे. नाहीतर दोन बेडकांच्या कथेसारख होईल. एका पाणीभरल्या भांड्यामधे एक बेडूक सोडला. आणि त्या भांड्यातील पाणी गरम करायला ठेवले. पाण्याच्या तापमानाबरोबर तो शांतपणे डुबक्या मारत राहिला. पाणी एवढे तापले की तो ना बाहेर येऊ शकला ना जीवंत राहू शकला. पण दुसर्‍या भांड्यात उकळते पाणी ठेवले. त्यात दूसरा बेडूक टाकला. त्याने टुणकन भांड्याबाहेर उडी मारली. परिस्थिती ओळखून पहिल्या बेडकाने जर बदल केला असता तर तो जीवास मुकला नसता. परिस्थितीनुरूप आपण स्वत:मधे बदल केला नाही तर “धोबी का कुत्ता, ना घरका ना घाटका” अशी स्थिती होते. आपण परिस्थितीशी जमवून घेऊ शकत नाही आणि परिस्थिती मात्र हाताबाहेर जाते. बदलत्या प्रवाहात स्वत:ला बदलण आपल्याच हातात असतं. भविष्यातील बदलाचा, आपल्या तर्कशास्त्राने वेध घेणारा फ्यूचर शॉक”, “पॉवर शिफ्ट”, आणि “थर्ड वेव्ह” या पुस्तकांचा जन्मदाता ऑल्विन टॉफ्लर याचा 27 जूनला मृत्यू झाला. आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी ज्या सगळ्याच क्षेत्रातील बदलाचा पट त्याने लोकांसमोर ठेवला होता, ते बदल आज आपण अनुभवत आहोत.  
      ................................सविता नाबर 


      Published on 13th July 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition

Wednesday, 22 June 2016

अंधारातील प्रकाशकर्ती : हेलन केलर

   

         ज हेलन केलरचा जन्मदिवस . 27 जून 1880 रोजी अमेरिकेच्या आलबामा राज्यात तिचा जन्म झाला. आई केट(कथरीन) अडाम्स आणि वडील आर्थर केलर.  हेलन दोघी बहीणीतली मोठी . शिवाय तिला दोघे मोठे सावत्र भाऊही होते . तिच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती आणि केवळ कापसाच्या उत्पादनावर त्यांचा चरितार्थ चालत होता. प्रथम आर्मी मध्ये असणारे तिचे वडील नंतर एका साप्ताहिकाचे संपादक बनले .      
     तिच्यापेक्षा फक्त चौदा वर्षानी मोठी असलेली तिची अंध शिक्षिका अॅनी सुलीवान, हिने हेलनची या जगाशी ओळख करून दिली. कारण भाषेच्या अभावी ती कुणाशीही काहीच संवाद साधू शकत नव्हती. जन्मली तेव्हा हेलनला ऐकुही येत होत आणि दिसतही होत. पण ती साधारण दीड एक वर्षांची असताना तिला मॅनेंजायटीस सारखा आजार झाला आणि त्यामध्ये तिच्या या दोन्ही संवेदना नाहीशा झाल्या. ती खरतर सहा महिन्याची असताना बोलायला लागली आणि वर्षभराची मुलगी चालायलाही लागली होती.  हेलन त्यांच्या कुकची मुलगी, तिची बालमैत्रीण, मार्था वॉशिंग्टन हिच्याबरोबर काहीबाही संवाद साधत होती. त्या दोघींनी मिळून त्यांच्यापुरतीच खुणांची भाषा विकसित केली होती. त्या आधारे त्या एकमेकींशी संवाद साधत. हेलन या काळात खूप हिंसक होत असे. त्याच प्रमाणे जेव्हा आनंदाने खुश असे तेव्हाही तीच वागणं नियंत्रणा बाहेरच होत. या सगळ्याचा तिच्या मैत्रिणीला आणि आई वडिलांनाही त्रास होत असे. तिच्या नातेवाईकांना वाटायचं तिला सरळ कुठल्यातरी संस्थेत दाखल करावं .
       मुळातच बुद्धिमान असलेली हेलन लाडाने थोडी बिघडली होती. अॅनी सुलीव्हानने आल्यानंतर आठवडा भरातच हेलनच्या घरच्यांचा विश्वास संपादन केला. आणि मुख्य घरात न राहाता ती हेलनला घेऊन घराशेजारच्या आऊट हाऊस मधे दोन आठवडे राहीली. सुलीव्हान हिने प्रथम तिला एक बाहुली भेट दिली आणि डॉल म्हणून तिचा हेलनशी परिचय करून दिला. तेव्हा हेलन उद्विग्न झाली. हेलनला ती हातावर एक एक इंग्लिश अक्षर गिरवून शिकवत होती. डी ओ एल एल . अॅनीने हात पंप चालू करून त्या पाण्याखाली हेलनचा एक हात धरला आणि दुसर्‍या हाताने तिने ड्ब्ल्यु ए टी ई आर लिहिलं. म्हणजे हाताला थंडगार जाणवलेला स्पर्श म्हणजे वॉटर हे तिला कळलं. जेव्हा हातावरचा पाण्याचा स्पर्श तिला सुखावून गेला, तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी जाणून घ्यायला ती उत्सुक झाली. तीन प्रेमाने चुचकारत आणि आंजारून गोंजारून आज्ञा पालनाचे धडे देत शिस्त लावली.
       हेलनन लोकांशी होता होईल तितका संवाद साधून बोलायला सुरुवात केली. ती सुलीव्हान कडून ब्रेल मध्ये लिहायला आणि वाचायला शिकली. मूक बधिरांच्या खुणा ती स्पर्शातून जाणायला शिकली. तिचा बोलण्याचा प्रयत्न काहीसा असफल झाला. पण सार्वजनिक समारंभात ती दुभाषाच्या सहाय्याने आपल बोलणं लोकांपर्यंत पोचवू लागली. तरीही तीन जगासाठी एक शिक्षणतज्ञ ,एक कुशल संघटक म्हणून खूप मोठी कामगिरी केली. अवघ आयुष्य तिन यासाठी वेचल. लोकांचं बोलणं ती ऐकायची. त्यांच्या ओठांवर बोट ठेवून ,ओठांच्या हालचालींवरून ती शब्द जाणून घ्यायची. तिची स्पर्शाची संवेदना अत्यंत तीव्र होती. ब्रेल लिपीमधे ती पारंगत झाली आणि खुणांच्या भाषेमध्येही तेवढीच माहिर झाली. इतकच नव्हे तर टेबलवर हात ठेवला की, बोटांच्या पेरांच्या सहाय्यानं जवळपास कुठेही  वाजणारे संगीत ती अनुभवू शकत होती. तिची कथा आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली होती. सर्वसामान्य जनतेपासून ते प्रसिद्ध साहित्यिक, कलाकारांपर्यंत सगळेच तिला ओळखत होते. तिने याचा योग्य फायदा उठवला. मार्क ट्वेन हा त्यापैकीच एक. हेलनच असामान्य कौशल्य आणि कुशाग्र बुद्धी आलेक्जांडर ग्रहाम बेल आणि मार्क ट्वेन यांनी ताडली होती. 19व्या शतकातील दोन असामान्य व्यक्ति म्हणजे नेपोलियन आणि हेलन अशा शब्दात मार्क ट्वेन याने तिचा गौरव केला होता.
         एक अंध, मुक बधिर मुलगी, तिन तीच जग कस पाहिलं असेल? आणि त्यातून सृजनाची निर्मिती करणे  म्हणजे मोठ जोखमीच काम ! तिन लिखाण केल. 1903 मधे तीच “स्टोरी ऑफ माय लाईफ” हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ते 50 भाषांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. प्रथम ब्रेल टाइप रायटरवर टाइप करून नंतर ती साध्या टाइप रायटरवर टाइप करत असे. तिच्या पासपोर्टवरही तिचा व्यवसाय लेखिका म्हणून लिहिला होता. या टाइप रायटरवरच्या शब्दांच्या माध्यमातून तीन अमेरिकन लोकांशी आणि जगातल्या सर्व लोकांशी संवाद साधला. तीन तिच्या लिखाणातून सत्याचीच कास धरली. कामगारांच्या हक्कांसाठी आणि स्त्रीयांच्या शोषणा विरुद्ध हे हत्यार तीन वापरलं. ती स्त्रीयांसाठी लढा देणारी, कामगारांच्या हितासाठी प्रयत्न करणारी, कट्टर समाजवादी लेखिका होती.
       ती मोठ मोठ्या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात आली  आणि ते लोक तीचे अगदी जिवाभावाचे होऊन गेले. रूझवेल्ट, आइनस्टाईन, एमा गॉडमेन ,चार्ली चॅपलिन, हेन्री फोर्ड, जॉन केनेडी, जो डेव्हिडसन, आयसेनहोवर आणि असे बरेच. जगात सगळीकडे तिला मान मरातब मिळाला. अनेक सत्कार झाले. कित्येक पुरस्कार मिळाले. तिला हार्वर्ड युनिवर्सिटी, बर्लिन युनिव्हार्सिटी, दिल्ली युनिवर्सिटी, यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्या. 1955 मधे, स्वत: प्रेरणास्त्रोत असलेल्या फिल्मसाठी अकादमी अवॉर्ड मिळाले.
      १ जून १९६८ रोजी तिच्या वाढदिनाच्या काही दिवस आधी तिला मृत्यू आला. मृत्यूनंतर तिच्या सहकारी अॅनी सुलीव्हान आणि पॉली थौंप्सन यांच्या शेजारी तिला चिरनिद्रा देण्यात आली.
                             ……………………………………सविता नाबर 

published in Saptahik Sarvakal on 27th June 2016

To Be or Not To Be



       कदा एक धोबी त्याच्या मुलाला घेऊन त्याचे म्हातारे झालेले गाढव विकायला बाजारात चालला होता. मुलगा अर्थातच गाढवावर स्वार झालेला. रस्त्यात धोब्याचे मित्र भेटले, “काय मुलगा आहे! स्वत: गाढवावर बसून चालला आहे आणि वयस्क बाप बिचारा चालतोय” मुलाला हे ऐकून शरम वाटली. तो खाली उतरला. आता बाप गाढवावर बसला. काही अंतर गेल्यावर काही स्त्रियांनी हे दृश्य पाहिले ते म्हणाले, बरोबर गाढव असताना बिचारा मुलगा चालतोय. पुन्हा बाप लेकाने निर्णय बदलला. दोघेही गाढवावर आरुढ झाले. हे ज्या लोकांनी पाहिले ते म्हणाले, “दोघेही बिचार्‍या म्हातार्‍या प्राण्यावर बसलेत. त्यांना जरासुद्धा कशी दया माया नाही.” पुन्हा ते दोघे खाली उतरले आणि गाढवाचे पाय काठीने बांधले आणि त्याला उलटे टांगून दोघेजण खांद्यावर घेऊन निघाले. गाढवाचे ओझे वाहून ते इतके दमले की नदीच्या पूलावरून जाताना एका मोठ्या दगडाला ठेचकाळून पडले. गाढव पुलावरून पाण्यात कोसळले आणि त्याला जलसमाधी मिळाली. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे.
    निर्णय घेताना स्वत:च्या परिस्थितीला अनुसरून घेतला पाहिजे. आपला निर्णय चुकेल म्हणून बरेच जण निर्णय लांबणीवर टाकत असतात. कामात अपयश येईल म्हणून निर्णय घेण्याचे टाळत असतात. जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा आपले डोके शांत ठेवले पाहिजे. बुद्धी समतोल ठेवली पाहिजे. खूप लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून डोके फिरवून घेतात. समोरची व्यक्ति संतापली की जो आपले डोके शांत ठेवतो तो खरा शहाणा माणूस. तोच व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो कारण अशावेळी त्याची बुद्धी समतोल रहाते. समतोल बुद्धीची कसोटी अडचणीच्या परिस्थितीत आणि संकटाच्या वेळी लागते. अशा माणसावर कितीही मोठ्या जबाबदारीचे काम सोपवले तरी तो काम पूर्ण करूनच दाखवतो. महत्वाचे निर्णय घेताना परतीचे दोर उघडे ठेवले म्हणजे फार नुकसान होत नाही. ज्याला एखाद्या प्रश्नांच्या दोन्ही बाजू बरोबर वाटू लागतात. त्याला कुठल्याच बाजूने निर्णय घेता येत नाही.  
       एका फांदीवर तीन पक्षी बसले आहेत. त्यातले दोघेजण फांदीवरून उडायचा विचार करतात. मग फांदीवर किती पक्षी राहातील? बरेच लोक म्हणतात एकच पक्षी राहील. काहीजण म्हणतात कुणीच असणार नाही. कारण ते दोन पक्षी उडल्यावर फांदीच्या हेलकाव्याने उरलेला पक्षीही उडून जाईल. पण तसे बघायला गेले तर यापैकी कोणतेच उत्तर खरे नाही. कारण जोपर्यंत मनाशी घेतलेला निर्णय प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत खरी काहीच हालचाल होत नाही. म्हणून दोन पक्षी नुसते ठरवतात, जोपर्यंत काहीच अॅक्शन घेत नाहीत तोपर्यंत काही घडत नाही. आपल्या आयुष्यातही असेच असते. आपण बर्‍याच गोष्टी मनात ठरवतो, हे करायचे आहे, ते करायचे आहे, पण अॅक्शन होत नाही. कारण निर्णय होत नसतो.
     आयआयएमला हा प्रश्न विचारला गेला होता. काही मुले रेल्वे ट्रॅकवर खेळत असतात. पैकी एक मुलगा ज्यावर गाडी येत नाही अशा वापरत नसलेल्या ट्रॅकवर खेळत असतो. आणि दहा बारा मुले, गाड्यांची नेहमी ये जा चालू असणार्‍या ट्रॅकवर खेळत असतात. लांबून रेल्वे येताना दिसते. सिग्नल तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याक्षणी काय निर्णय घ्याल? जास्त मुले खेळणार्‍या मार्गावरून ट्रेनला जाऊ द्याल की एकच मुलगा खेळतोय त्या मार्गावर गाडी घ्यायला सांगाल? बरेच लोक जो ट्रॅक वापरात नाही त्यावर गाडी घायला सांगतील, कदाचित तुमचाही तोच निर्णय असेल. पण थोडासा विचार केलात तर लक्षात येईल, जी मुले वापरात असणार्‍या ट्रॅकवर खेळताहेत, त्यांना त्यावर गाडी येणार याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ती मुले नक्कीच सावध असणार. ट्रेनचा हॉर्न ऐकताक्षणी ती बाजूला होणार. जो मुलगा पडक्या ट्रॅकवर खेळतोय, त्यावर ट्रेन नक्कीच येणार नाही ही त्याला खात्री आहे. तार्किक दृष्ट्या तो बरोबर आहे. समजा तुम्ही तो खेळत असलेल्या मार्गावर गाडी घेतली तर त्या मुलाचा मृत्यू ठरलेलाच आहे. शिवाय, तो ट्रॅक नदुरुस्त असल्याने त्यावरून गाडी घेतली तर ती सरळ जाणार नाही. अपघात होऊन गाडीतल्या माणसांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे फक्त दहा बारा जणांचा जीव वाचवताना बाकीच्या शेकडो लोकांना तुम्ही मृत्युच्या दावणीला बांधत आहात. अशा प्रकारचे त्वरित निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर बर्‍याच वेळा येत असते आणि आपण दग्ध्यात पडत असतो. अशावेळी थोडा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
     निर्णय घेता न येणे म्हणजे जे परिणाम होतील त्याला तोंड देण्याची तयारी नसणे. जे नुकसान सोसावे लागणार त्याला मानसिक तयारी नसते. म्हणून अशा लोकांना निश्चित निर्णय घेता येत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे. One can not have a cake and eat it also. कोणताही निर्णय घेताना दुसर्‍या एखाद्या गोष्टीची त्याग करण्याची तयारी पाहिजे. प्रश्न लोंबकळत ठेवण्यापेक्षा त्याचा लगेच निकाल लावणे आवश्यक असते.
       .............................सविता नाबर 


Published in Maharashtra Times on 22nd June 2016 in Kolhapur Times