Wednesday, 13 April 2016

तुझे आहे तुजपाशी

  

          “न बोलणार्‍याचे सोने खपत नाही, पण बोलणार्‍याची मातीही खपते” पासष्टाव्या कलेबाबत म्हणजेच जाहिरातीबद्दल असे म्हटले जाते. ही बडबड विनाकारण नसून आपले उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग असतो. आजकाल या बोलण्याला पर्यायाने जाहिरातीला खूप महत्व आले आहे. ही जाहिरात कधी होते? तुमचे उत्पादन तेवढे चांगले आहे याची ग्वाही देण्यासाठी. स्वत:वरचा विश्वास हा असाच स्वत:बद्दल ग्वाही देणारा असला पाहिजे. जेवढा आपला आत्मविश्वास दांडगा तेवढी आपली सर्जनशीलता मोठी आणि आयुष्यातले यशही मोठे. यश मिळवण्यासाठी आपल्यातल्या आवडीला वेळेच्या प्रमाणबद्ध चौकटीत बसवले पाहिजे. आपल्या जीवनाचे सुंदरसे शिल्प तयार होण्यासाठी आवश्यक असते आपली आवड , आपला कल ओळखणे आणि त्याबद्दल वाटणारा विश्वास. त्यासाठी वेळेचा साचा असणे अपरिहार्य असतेच असते. त्याशिवाय त्याला आखीव रेखीवपणा येत नाही. पण कधी कधी वेळेच्या साच्यात न बसवताही सुंदर शिल्प तयार करता येते तेव्हा लागते जिगर, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जबरदस्त मनीषा. आपल्या मधल्या राजहंसाला शोधायला थोडेसे अंतर्मुख व्हायला पाहिजे. प्रत्येकात तो असतो. पण त्याचा प्रकार, पोत समजला पाहिजे.
      जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांचे पिग्मलियन नाटक, त्याचे पुलंनी केलेले मराठी रूपांतर, “ती फुलराणी” नाटक आजच्या तरुण पिढीने पाहिले किंवा वाचले असेल. त्यातली नायिका फुले विकणारी मंजु, तिला स्वत:च्या आतमध्ये काय सामर्थ्य आहे याची जाणीवच नसते. पण जेव्हा प्राध्यापक तिला शिकवतो, तिची भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा तिला तो क्षण गवसतो. त्या क्षणी मी कुणीतरी आहे याची तिला जाणीव होते. तिच्यात आत्मविश्वास जागृत होतो. आपल्यामध्ये दुसर्‍या कोणाही व्यक्तीत नसलेले गुण असू शकतात. फक्त ते आपल्याला जाणवले पाहिजेत. कधी ते परिस्थिती जाणवून देते, तर कधी संपर्कातली व्यक्ति. निद्रिस्त कलेला, गुणाला जागृत होण्यासाठी कशी आणि कधी संधि मिळेल हे सांगता येत नाही.
    रामशास्त्री प्रभुणे पेशव्यांचे न्यायमूर्ती का आणि कसे झाले हा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. भिकबाळीने त्यांच्यातल्या विद्वत्तेला जागृत केले. निसर्गाने प्रत्येकात काहीतरी असे बीज पेरले आहे, ज्याचे रोप वाढले की मानवी मनाला, समाजाला आनंद होतो. ते आपल्यातून शोधून मात्र आपल्यालाच काढायचे असते. डॉक्टर वि. ना. श्रीखंडे, प्रख्यात सर्जन पण त्यांच्या बोलण्यामध्ये दोष होता. कुणासमोर बोलायचे तर ते तोतरत. मग बोलायला जीभ धजावणार तरी कशी? पण त्या दोषावर त्यांनी मात तर केलीच पण ते इतके मोठे निष्णात सर्जन झाले की त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेळ आणि संधि दिली पाहिजे. मी कोण आहे हे स्वत:ला जाणवणे महत्वाचे. जो स्वत:ला ओळखतो त्याच्या जीवनाचा प्रवास सोपा होतो. स्वत्वाची ओळख पटायला वयाची काहीच अट नसते. किंबहुना वयाच्या कोणत्या टप्प्यावर स्वत्वाची जाणीव होईल हे सांगता येत नाही.
      करियर करणे म्हणजे तरी काय? आपला स्वभावधर्म, कल ओळखून, मनाला आनंद देणारी जीवनशैली निवडणे. ते निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असते. पैसा मिळवणे म्हणजे सर्वस्व नव्हे. त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहण्यापेक्षा आपल्याला स्वत:ला काय पाहिजे हे समजले पाहिजे. स्वत:चा स्वत:वर विश्वास असला की लोकांचा आपोआपच बसतो.
     एकदा एक नवविवाहिता तिच्या आईकडे आली आणि आपल्याला संसारात किती कष्ट पडतात , किती धडपड करावी लागते याचा पाढा वाचायला लागली. आईने तिला उदाहरण दिले, उकळत्या पाण्यात थोडावेळ गाजर ठेवले, अंडे ठेवले आणि कॉफीच्या बिया टाकल्या तर परिणाम त्या तीन्हीवर काय दिसतो ते पहा. घट्ट असलेले गाजर शिजून मऊ पडते, तर नाजुक असणारे अंडे उकळत्या पाण्याच्या धगीने एकदम घट्ट होते. कॉफीच्या बिया मात्र उकळत्या पाण्याने आपला स्वाद त्या पाण्याला देतात आणि त्याचा रंग व चव बदलतात. परिस्थितीचा आपल्यावर प्रभाव न पाडता आपलाच ठसा आजूबाजूच्या वातावरणावर उमटवतात. आणि सुगंध देतात. कठीण परिस्थितीत कसे वागायचे तू ठरव. परिस्थितीचे आकलन व्हायला आपल्या कामी येतो तो आत्मविश्वास !! तो तर आपल्याजवळच असतो. !!
        ..................................सविता नाबर

     

  published in Maharashtra Times, Kop ed. on 13thJan 2016

लक्ष्यवेध

   

      विवारची सुंदर, प्रसन्न सकाळ, सगळे कोल्हापूर शहर गर्द धुक्याच्या दुलईत लपेटलेले. शिवाजी विद्यापीठापासून ते टाउन हॉल पर्यन्त सगळीकडे पांढर्‍या पारदर्शी ओढणीसारखे धुकेच धुके. थोड्याच वेळात साडे नऊ दहाच्या सुमारास रंग बहारची मैफल सुरू झाली. आणि वातावरणातला आल्हाददायक गारवा कोवळ्या उन्हाची शाल घेऊन रसिक दर्दींच्या उबेला आला. चित्र, शिल्प, संगीत या तिन्ही कलांचा त्रिवेणी संगम अनुभवयाला करवीर रसिक जातीने हजर होता. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे हा प्रश्न तिथे त्याक्षणी कुणीही स्वत:ला विचारला असता तर नक्कीच, त्याचे उत्तर मिळाले असते. शिल्पकार प्लास्टर ऑफ पॅरिसचा हा एवढा गोळा घेऊन शिल्प कोरण्यात दंग होते. तर चित्रकार आपल्या चित्र चितारण्यात मग्न. शेजारी गुजरी तोडीची सुरेल मैफल. एकाचवेळी दृकश्राव्य आनंद घेताना आपल्या पंचेंद्रियाना मिळणारे अतुलनीय समाधान काय असते हे कुणी आपल्यासारखा भाग्यवानच जाणे !
      हे म्हणजे तुम्हाला Beating Around The Bush वाटू शकेल. पण माझ्या विषयाकडे येताना मला रंगबहारच्या मैफलीचा उल्लेख करणे अपरिहार्य वाटले. कारण प्रत्येक कलाकार आपआपल्या कलेत मग्न होता. तन्मयतेने आपल्या कलेची साधना करण्यात तल्लीन झाला होता. शिल्प आकाराला येताना, चित्रातले स्केच काढताना , रंग भरताना , स्वरांचा लगाव लागताना त्या कलेशी तद्रूप झाल्याची खूण दिसत होती. आपल्या आवडत्या कलेत कलाकार प्राण ओतत होता. हे कसे? प्रत्येक कलाकाराने विशिष्ट ध्येय ठरवले होते. तेही आपला आवडत्या क्षेत्रात काम करण्याचे. जेव्हा आपला व्यवसाय, आपले काम आणि आपली आवड एकच असते तेव्हा तन मनाने आपण त्या कामाशी एकरूप होऊ शकतो. पण आयुष्यात ध्येय ठरवणे महत्वाचे. शुद्ध शालेय शिक्षण आणि पुढे करियर म्हणजे पैसा मिळवणे हेच उद्दीष्ट कशासाठी?
    राही सरनोबत किंवा अंजली भागवत जेव्हा लक्ष्यवेध करतात तेव्हा त्यांनाच विचारलं पाहिजे एकाग्रतेचे महत्व. आयुष्यात असेच वन पोइंटेडनेस म्हणजेच एका बिन्दुवर मन केन्द्रित हवे म्हणजे ते काम शंभर टक्के साध्य होते. जेव्हा गुरु द्रोणाचार्यानी आपल्या शिष्यांना पक्ष्याचा डोळा भेदण्याचे काम सोपवले, तेव्हा त्यांना आपले लक्ष्य सोडून बाकीचे काय दिसते आहे असे विचारले, तेव्हा प्रत्येकाने आपआपल्या परी वेगवेगळी उत्तरे दिली. कोणी म्हणाले आकाश दिसते, तर कुणाला झाडाच्या फांद्या दिसत होत्या. कुणाला पक्षी दिसत होता. फक्त अर्जुनालाच पक्ष्याचा डोळा दिसत होता. जे साधायचे आहे त्यावर मन पुर्णपणे एकाग्र झाले नाही तर मनाच्या सैर भैर अवस्थेत किंवा विचारांच्या फापट पसार्‍यात ध्येय गाठणार कसे?
      एखादे काम हातात घेतले की त्याचा ध्यास असल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही. थॉमस अल्वा एडिसन याने जेव्हा विजेचा बल्ब शोधला तेव्हा त्याचे नऊशे नव्याणव प्रयोग असफल झाले. तेव्हा कुठे हजारावा प्रयोग यशस्वी झाला. परंतु त्यासाठी तेवढ्या वेळा प्रयोग करताना त्याने किती एकाग्र चित्ताने काम केले असेल ! तहान भूक विसरून, देहाचे चोचले बाजूला सारून जेव्हा त्याने त्या प्रयोगाला आपले भान हरपून, मन केन्द्रित केले तेव्हाच तो काही करू शकला. तुमची बुद्धी सर्वात जास्त कोणत्या विषयात चालते हे तुम्हाला निरीक्षण करून, अभ्यास करून ठरवावे लागते. स्वत:चे निरीक्षण केल्यावर तुमची खरी आवड कळते.
     जेव्हा आयुष्याचे उद्दीष्ट ठरवतो तेव्हा कामांचा प्राधान्यक्रम ठरवणेसुद्धा तेवढेच महत्वाचे असते. म्हणजेच महत्वाचे काम प्रथम आणि त्यानंतर येतात त्यापेक्षा गौण कामे. आपल्या ध्येयासाठी जास्त वेळ आणि अग्रक्रम देणे महत्वाचे. आपले ध्येय गाठण्यासाठी वॉरन बफेट याने तीन अत्यंत साध्या सोप्या पायर्‍या सांगितल्या आहेत. त्याचा खाजगी विमानचालक फ्लिन्ट याला त्याने सांगितल्या त्या तुम्हा आम्हालाही उपयुक्त आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आठवडाभरात पूर्ण करावयाच्या आपल्या ध्येयांची यादी करा. त्या गोष्टी वीस पंचवीस असू शकतील. दुसरी पायरी म्हणजे, पुन्हा एकवार त्या यादीकडे पहा त्यातल्या अत्यंत महत्वाच्या पाच गोष्टी ठरवा, त्याच्या भोवती वर्तुळ करा. पुन्हा विचार करा. आणि तिसर्‍या पायरीला त्या पाच महत्वाच्या गोष्टीच करायच्या मनापासून ठरवा आणि त्यासाठी वेळ द्या. अनावश्यक गोष्टी करण्यासाठी जो तुमचा वेळ जाणार आहे तो नक्कीच वाचेल. म्हणजेच उरलेल्या गोष्टी आपण ठरवतो त्या फक्त वेळ खाणार्‍या असतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नसते.
   शिकार्‍याने एकाचवेळी दोन सावज टिपायचे ठरवले तर शक्य आहे का? दोन्हीही हातातून जाणार. एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर मन केन्द्रित केले तर एक ना धड भाराभार चिंध्या अशी गत होते त्यापेक्षा एकावेळी एकच पुर्णपणे मन लावून केली तर त्यामध्ये तुमचे कौशल्य वाढते.
                 ........................सविता नाबर

    
 published in Maharashtra Times, Kop ed. on 20th Jan 2016

आपुला संवाद आपणासि

   
    कदा एका लाकूड तोड्याला त्याच्या योग्यतेचे काम मिळाले. त्याला चांगली मजुरी मिळणार होती ती त्याच्या कामगिरीप्रमाणे. म्हणजे जेवढे त्याचे काम जास्त, तेवढा त्याला पगारही जास्त मिळणार. त्याच्या मालकाने त्याला कुठल्या जागेवर काम करायचे हे दाखवले. त्याला चांगली कुर्‍हाडही दिली. सर्वसामान्य नोकराप्रमाणे आपण जास्त काम केले तर मालक खुश होणार या अपेक्षेने पहिल्या दिवशी त्या लाकूडतोड्याने अठरा झाडे तोडली. मालक खुश झाला. वा! असाच प्रयत्न चालू ठेव. या मालकाच्या शब्दांनी त्याला स्फुरण चढले. दुसर्‍या दिवशीही त्याने मन लावून काम केले पण तो फक्त पंधराच झाडे तोडू शकला. तिसर्‍या दिवशी त्याने आणखीन कसून काम केले. पण त्याने बाराच झाडे तोडली. दिवसेंदिवस तो जास्तीत जास्त प्रयत्न करत होता. पण त्याला परिणामी यश मात्र कमी कमी मिळत होते. त्याला शंका आली की आपण रोज आपली थोडी थोडी शक्ति गमावत आहोत. तो मालकाजवळ गेला आणि त्याला त्याने विचारले, मला समजत नाही असे का होते आहे. मालक म्हणाला तुझ्या कुर्‍हाडीला तू कधी धार केली होतीस? क्षणभर तो बुचकळ्यात पडला. धार कशी करणार? मला तेवढा वेळच मिळाला नाही. मी तर झाड तोडण्याच्या माझ्या कामातच व्यस्त होतो. लाकूड तोड्याला त्याच्या कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कारण मालकाने सांगितले. पण आपल्याला आपली कार्यक्षमता काय आहे हे कसे कळणार? 
    स्वत:ची कौशल्ये अबाधित राखण्यासाठी, किंबहुना त्यांना वारंवार धार करण्यासाठी स्वत;ला पारखणे, निरीक्षण करणे गरजेचे असते. शालेय वयात मी विश्राम बेडेकरांचे एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र वाचले तेव्हा तो आणि मी ही एकाच व्यक्तीची दोन मने, त्यांच्यातला संवाद वाचताना ते नावीन्यपूर्ण वाटले होते. “मी त्याला म्हटले , त्याने मला असे संगितले.” अशा संवादानी त्यांनी स्वत:चे व्यक्तित्व रंगवले आहे. त्यावेळी वेगळेपणाचे वाटलेले ते किती आवश्यक आहे हे आता लक्षात येते. ती दोन मने नसून आपणच आपल्या मनाशी साधलेला संवाद होता. असा संवाद प्रत्येकाने स्व:शी साधला पाहिजे.
     मन, बुद्धी आणि शरीर ही आपल्याला निसर्गाने बहाल केलेली तीन शस्त्रे आहेत. त्याच्याशी संवाद साधुनच आपले अवघे आयुष्य आनंदमय करायचे. जेव्हा शरीराला कुठेतरी इजा होते, तेव्हा शरीराशी संवाद साधून पाहिलाय? दुखर्‍या भागावर हळुवारपणे फुंकर घालून त्याला मनानेच गोंजारून पहा, तुमची जखम किती लवकर बरी होते ती! कधी मन उदास असेल, निराशेचे मळभ साचले असेल तर मनाला हलकेच आनंदी क्षणांची आठवण करून द्या, बघा किती उत्फुल्ल होतय ते! बुद्धी, ती तर काटेकोर असते, पण तिलाही घासून पुसून लख्ख ठेवली नाही तर तिही गंजून  जाते.
    आपल्याशी संवाद म्हणजे आपण कधी कुठे चुकतोय हेच पहाणे नाही किंवा फक्त आपल्या चुकांचे परिमार्जन करणे नाही. तर वेळोवेळी मनाला, शरीराला आणि बुद्धीलाही त्यांनी केलेल्या कामाचे बक्षीस देणेसुद्धा यामध्ये अंतर्भूत आहे. मन कुठे भरकटत असेल तर बुद्धीने त्याला समजावले पाहिजे, शरीराने भरपूर श्रम केले असतील तर मनाने शाबासकी दिली पाहिजे. बुद्धीच्या कौशल्याला तर मनाने आणि शरीरानेही दाद दिली पाहिजे. श्रमलेल्या शरीराला आणि दमलेल्या मनाला उत्साही वाटायला लावणे म्हणजे संवाद साधणे.
    शरीरानेही बरेच कष्ट केलेले असतात. त्याला आपण भरपूर ताबडवलेले असते, अशा वेळी ते ताजे तवाने व्हावे म्हणून जाणूनबुजून आपण काय करतो? छानसे सरबत, चहा, वेळेवर सकस अन्न दिलेत तर ते तुमच्या मनाला येईल तितके राबायला तयार होते. वेळोवेळी त्रयस्थपणे स्वत:कडे पहाणे फार गरजेचे असते. जगाच्या कोलाहलात आपण आपल्याला सापडतो का? आपले ध्यान बाहेरच इतके असते की स्वत:च्या आतमध्ये डोकावणे जमतच नाही. यासाठीच दिवसाकाठी थोडासा वेळ आपल्यासाठी काढायला हवा. स्वत:शीच संवाद साधण्यासाठी.
     आपल्या बुद्धीला, मनाला धार लावण्यासाठी स्वत:शी वेळोवेळी संवाद साधणे आवश्यक असते. आजच्या गुंतागुंतीच्या, धकाधकीच्या जगात क्षणभर थांबून स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण तो काढला पाहिजे नाहीतर न थांबता नुसते काम करत राहिलात तर आपण काय करतोय आणि कुठे पोचलोय हे कळणारच नाही. म्हणूनच आपण आतापर्यंत काय केले याचा मागोवा घ्यायला, आत्मपरिक्षण करायला वेळ काढला पाहिजे. माझे आज काय चुकले हे आठवण्यापेक्षा आजच्या दिवसात क्रमाने केलेल्या घटना जरी आठवल्या तरी, एक तर स्मरणशक्ती वाढते आणि घटना त्रयस्थपणे पाहताना त्यातल्या चूक, बरोबर हे लक्षात येते. आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन वेळेवर केले नाही तर केलेल्या कामाला काही अर्थच रहाणार नाही.
                  ...................सविता नाबर


 published in Maharashtra Times Kop ed, on 3rd Feb 2016

या ताणाचं काय करायचं ?

   

    हातात एक रबर बॅंड घ्या. एका बॉक्सला तो बसतोय का पहा. मग आणखी थोडा मोठा बॉक्स घ्या. त्याला बसतोय का पहा. एका ठराविक आकारापेक्षा जास्त मोठ्या बॉक्सला तो रबर बॅंड बसत नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तरीही कधी कधी आपण आणखीन ताणतो आणि बॉक्सवर बसवायचा प्रयत्न करतो. तटकन तो तुटतो. वाजवीपेक्षा जास्त ताण झाला की तुटणारच. निर्जीव रबर जिथे ताण सहन करू शकत नाही तिथे शरीर आणि मन ही संवेदनशील आयुध ताण कशी सहन करणार? फक्त ते कुठवर ताणायचे हे आपल्याला कळले पाहिजे. खरेतर कुठलीच गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताणायची नसते. पण आपण सगळ्याच गोष्टींचा अंत पहात असतो.
    ताण तणावाचे व्यक्तिनुरूप, परिस्थितिनुरूप अनंत प्रकार आहेत. प्राप्त परिस्थितीत योग्य तो निर्णय घेणे आणि ताण हलका करणे हे त्या व्यक्तीलाच साधत असते. पण प्रामुख्याने दोन भाग पडणार्‍या तणावाला सगळ्यानाच सामोरे जावे लागते. शारीरिक आणि मानसिक. दोन्ही एकमेकांवर इतके अवलंबून असतात की, जेव्हा शारीरिक ताण आलेला असतो, आपण दमतो तेव्हा मन काही नवीन गोष्टी करायच्या मूडमध्ये नसते. आणि जेव्हा मनाला मरगळ येते तेव्हा शरीर काही करायच्या तयारीत नसते. म्हणून दोन्हीलाही जपणे तितकेच महत्वाचे.
     विद्यार्थी दशेत अभ्यासाचा ताण, तारुण्यात नोकरी, व्यवसायाचा ताण, कधी लोक काय म्हणतील याचा ताण. ज्या गोष्टीचे टेन्शन येणार असते ती टाळण्याकडे कल दिसून येतो. मग आणखीनच अवघड होत जाते. त्यापेक्षा पहिल्या झटक्यालाच ताण येणारी गोष्ट करून टाकली की मन हलके होऊन जाते. हो. टांगती तलवार कशाला ठेवायची? विद्यार्थी असताना रोज नियमित वेळ अभ्यास केला की परीक्षेचे टेन्शन कशाला येणार? मग परीक्षेत आठवेल की नाही याची चिंता करायची नाही. ते काम आपल्या तल्लख मेंदूवर सोडून द्यायचे. अभ्यासाची नोंद तिथे झालेली असते. मेंदू अगदी व्यवस्थित काम करतो. अगदी संगणकापेक्षाही चांगले. ते कधी आणि कसे आठवेल याची तुमच्या मनाला सुतराम कल्पना नसते.  
      आपण एखादी वस्तु शोधत असतो. ती कितीही शोधली तरी सापडत नाही. नेहमीच्या ठिकाणी पाहिली, सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी पाहिली तरी सापडत नाही. झालं, मनावर लगेच ताण येतो. इतकी महत्वाची वस्तु, अशी कशी सापडत नाही? कुठे ठेवलीय काही केल्या आठवत नाही. अशावेळी शांतपणे तो विषय सोडून आपल्या कामाला लागले की काही वेळाने आपोआप ती सापडते. जेवढे एखाद्या गोष्टीच्या मागे टेन्शन घेऊन लागाल तेवढी ती दुर्लभ होत जाते. सहज जाता जाता केली तर पटकन होऊन जाते.  
      बारा चौदा तास काम केल्यानंतर शरीराला थकवा आलेला असतो. मनालाही मरगळ आलेली असते. थोड्याशा ब्रेकने ही मरगळ झटकली जाते. कामाच्या सातत्यात मध्ये मध्ये थोडीशी विश्रांति हवीच. तरच पुढचे काम अधिक जोमाने होऊ शकते. मन पुन्हा ताजे तवाने होते आणि काम हे काम न रहाता ती आवड बनून जाते. केव्हा एकदा अभ्यास उरकून टाकतो असे मनात आले की ती एक उरकण्याची क्रिया होते. त्यात आनंद रहात नाही. आणि उरकणे ताणले जाते, किती ते आपल्याला कधी कधी समजतच नाही. कुठलेच काम मनाविरुद्ध केले की ते चांगले होत नाही. 
         एकदा दोन बुद्ध भिक्षू नदीच्या काठावरून चाललेले असतात. त्यांना एक तरुणी भेटते. त्या दोघांना आणि तिलाही नदी ओलांडून जायचे असते. एक भिक्षू तिला खांद्यावर घेतो. तिघेही नदी ओलांडून पलीकडे येतात. तरुणी आभार मानून निघून जाते. भिक्षू बराच वेळ चालत आपल्या मुक्कामाला पोचता पोचताच ज्याने खांद्यावर तरुणीला घेतलेले असते त्याला दूसरा विचारतो, तू तिला काठावर कसे काय आणलेस? तुझ्या मनाला खूप अपराधी वाटत असेल. तो चमकून विचारणार्‍याकडे पाहतो आणि हसून म्हणतो, मी तिला खांद्यावरून केव्हाच उतरवले. मी विसरलो देखील. पण तू मात्र तिचे ओझे अजूनही तुझ्या खांद्यावरून घेऊन जात आहेस.
        आपल्या मनावरच्या ताण तणावाच असच आहे. आपण नको ते ओझे विनाकारण मनावर बाळगत असतो. यासाठीच मनाशी संवाद साधण्याची गरज असते. शांतपणे मनाशी बोललात तर कसलाच ताण रहात नाही. लहानपणी चतुर बिरबलाची वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट आठवा. भाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली. उत्तर एकच. न फिरवल्यामुळे. एकाच जागी सतत राहिल्याने बाकीच्या भागाला आच लागत नाही. तणाव मनाला स्थितीशील करतो. स्थितीशीलता अशीच शरीराबरोबर मनालाही जडत्व आणते. आणि सर्जनशीलता लोप पावते.   कवि केशवसुतानी म्हटल्याप्रमाणे, प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेदा !!” 
          ..............................सविता नाबर 
   published in Maharashtra times, Kop ed. on 10th Feb 2016